esakal | बालक-पालक : पसाराच पसारा चोहीकडे
sakal

बोलून बातमी शोधा

Balak Palak

बालक-पालक : पसाराच पसारा चोहीकडे

sakal_logo
By
अभिजित पेंढारकर

‘मी चार दिवस गावाला जातेय, तेवढ्यात घरभर पसारा करून ठेवू नका. मी परत येईन, तेव्हा घर आत्ता आहे तसं दिसलं पाहिजे!’ असं बजावून आई बाहेरगावी गेली होती. तिच्या मैत्रिणींबरोबर काहीतरी भेटीगाठींचा कार्यक्रम होता. खरंतर चार दिवस आई घरी नाही, त्यामुळं बाबांकडून सगळे हट्ट पुरवून घेता येतील, याचाच मुलांना आनंद झाला होता, पण आई जाताना तसं दाखवून देणं धोक्याचं होतं. मुलांनी आईला अगदी गहिवरल्या अंतःकरणानं निरोप दिला.

‘चार दिवस काय करायची ती मजा करा, पण घरात पसारा पाडू नका,’ अशी सूचना बाबांनी मुलांना केली. आईला घरात पसारा आवडत नाही, हे त्यांना माहीत होतं. मुलांनाही ही अट सोयीची वाटली.

‘ताई, हा तुझा टॉवेल आहे ना? इथं का टाकलायंस?’’ दुसऱ्याच दिवशी सकाळी घरात युद्ध पेटण्याची लक्षणं दिसू लागली.

‘माझा नाहीये तो. तुझाच असेल, आळश्या!’’ ताई गुरगुरली.

‘माझा असा नाहीये, बघ जरा!’’ धाकटाही हार मानायला तयार नव्हता.

शेवटी बाबांनी मध्यस्थी केली. सोफ्यावर पडलेल्या ओल्या टॉवेलवरून भांडण जुंपलं आहे, हे त्यांच्या लक्षात आलं.

‘कुणाचाही असेना, आपल्याला दिसल्यावर आपण उचलून ठेवायचा रे! भांडता कशाला?’’ बाबांनी कानमंत्र दिला आणि टॉवेल उचलून दांडीवर वाळत घातला.

‘बाबा, हा तुमचाच टॉवेल आहे ना?’’ ताईला बाबांची लबाडी बरोबर लक्षात आली. बाबांनाही आता कबूल करणं भाग होतं. आपण थोडा आळशीपणा केला, हे त्यांनी मान्य केलं. ते पिझ्झा मागवायचं टाळत होते, पण संध्याकाळी त्यांना तो मागवावा लागला.

‘आपण उद्यापासून घरात एक मोठा खोकाच ठेवू. जो काही पसारा असेल, तो उचलून त्या खोक्यात टाकायचा. प्रत्येकानं त्या खोक्यात डोकवायचं, आपला काही पसारा आहे का बघायचं आणि तो आवरून टाकायचा.’’ बाबांनी सूचना केली. दरवेळी आपापला पसारा आवरत बसण्यापेक्षा आणि त्यावरून ओरडा खाण्यापेक्षा हे मुलांना सोयीचं वाटत होतं.

दुसऱ्या दिवसापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. प्रत्येक जण दुसऱ्याचा पसारा अगदी हिरिरीनं उचलून त्या खोक्यात टाकत होता. संध्याकाळी प्रत्येकजण आपापल्या वस्तू जागेवर ठेवत होतं.

चार दिवस मजेत गेले. दोन दिवस बाहेरून डबा आला, एक दिवस पिझ्झा झालाच होता, एक वेळ बाबांनी स्वयंपाकाचा प्रयोग केला, तोही मुलांना आवडला. एके दिवशी मुलांनी उत्साहानं स्वयंपाकघरात लुडबूड केली. चार दिवस संपले आणि आई यायचा दिवस उजाडला.

‘घर नीट ठेवलं आहात ना रे?’’ आईनं निघायच्या आधी गावाहून फोन केल्यावर मुलांना विचारलं.

‘होऽऽऽऽ’’ मुलांनी अगदी उत्साहानं उत्तर दिलं.

आता आल्यावर कुठलीही बोलणी खावी लागणार नाहीत, याचं मुलांना समाधान होतं. मुलांना शिस्तीत ठेवून घरही नीट ठेवल्याबद्दल बाबांना अभिमान वाटत होता. आई यायच्या आधी एकदा मुलांनी एकदा त्या खोक्यातही बघून घेतलं. कुठंच अडचण वाटत नव्हती.

आई आली, तिचं उत्साहात स्वागत झालं. आईचं घराकडं लक्ष गेलं आणि मुलांचं आईच्या चेहऱ्याकडं. तिला कुठेही काहीही पसारा दिसणार नाही, अशी मुलांना खात्री होती.

एवढ्यात आई म्हणाली, ‘‘बाकी सगळं ठीक आहे, पण हा खोका कुणी ठेवलाय इथं? कशाला हा पसारा?’’

loading image