बालक-पालक : भांडा सौख्यभरे

‘तुम्ही दोघं भावंडं नाही, वैरी आहात एकमेकांचे. एखाद्या दिवशी आम्ही कुणी घरी नसलो, तर काय कराल, याचा नेम नाही!’’ मुलांच्या भांडणानं हताश झालेली आई दोघांवर आगपाखड करत होती.
Balak Palak
Balak PalakSakal
Summary

‘तुम्ही दोघं भावंडं नाही, वैरी आहात एकमेकांचे. एखाद्या दिवशी आम्ही कुणी घरी नसलो, तर काय कराल, याचा नेम नाही!’’ मुलांच्या भांडणानं हताश झालेली आई दोघांवर आगपाखड करत होती.

‘तुम्ही दोघं भावंडं नाही, वैरी आहात एकमेकांचे. एखाद्या दिवशी आम्ही कुणी घरी नसलो, तर काय कराल, याचा नेम नाही!’’ मुलांच्या भांडणानं हताश झालेली आई दोघांवर आगपाखड करत होती. आज दिवसभर दोघांनी भांडून तिचं डोकं उठवलं होतं. बऱ्याच दिवसांनी तिला असा मोकळा वेळ मिळाला होता, पण त्यातला निम्मा वेळ मुलांची भांडणं सोडवण्यात गेल्यामुळं ती वैतागली होती.

‘तिनं आधी माझ्या कंपासमधली पेन्सिल का घेतली?’’ दादा छोटीची तक्रार करत म्हणाला.

‘नाही गं आई. दादानंच आधी मला चिमटे काढले, माझे केस ओढले. तू त्याला शिक्षा कर!’’ छोटी किरकिरत म्हणाली.

‘खरंच, तुमची भांडणं कशी सोडवावीत, हा माझ्यापुढचा मोठा प्रश्न आहे...!’’ आई हताशपणे म्हणाली. तिला खरंच यावर काही उपाय दिसत नव्हता.

‘तुम्ही दोघांनीही मुलांसमोर वाद घालायचं जरा कमी करा. मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात. तुमचे वाद कमी झाले, तर मुलांनाही समजावून सांगता येईल. मी बोलेन मुलांशी.’’ आजीनं आईला सल्ला दिला.

पुढचे काही दिवस ठीक गेले, आईबाबांनी त्यांचे वादाचे विषय शक्यतो दूरच ठेवले. मुलांसमोर कुठल्याही परिस्थितीत आपले मतभेद उघड करायचे नाहीत, असं ठरवलं. त्यामुळं मुलांची भांडणं कमी होतील, आपल्याला त्यांच्यात मध्यस्थी करावी लागणार नाही, असा आईचा अंदाज होता, पण तसं काही घडताना दिसेना.

एकूणच ‘‘मी घरी नसेन, तर तुमची भांडणं कोण सोडवणार,’’ ह्या आईच्या समस्येचं उत्तर आईला मिळताना काही दिसत नव्हतं. आई अगदीच तिचा मुद्दा सोडेना, तेव्हा ‘‘तू घरी नाहीस असं कधी होणारेय का,’’ असा युक्तिवाद मुलांनी सुरू केला.

एके दिवशी मात्र खरंच तसं घडलं. सोसायटीतल्या एका ओळखीच्या कुटुंबातलं कुणीतरी आजारी होतं, म्हणून आईला धावपळ करावी लागली.

‘त्यांना मदतीची गरज आहे. मी हॉस्पिटलला जातेय. तुम्ही घरात भांडणं करून माझ्या जिवाला घोर लावू नका!’’ असं आईनं मुलांना बजावलं, तरीही बाहेर जाताना तिच्या मनात धाकधूक कायम होती. तिकडे थोडी धावपळ कमी झाल्यावर घरी फोन करून बघू, असं तिनं ठरवलं होतं, पण दवाखान्यातल्या टेन्शनमुळं फोन करायलाही तिला वेळ मिळाला नाही. घरी आल्यावर घराची काय अवस्था झालेली असेल, घरी काय बघायला मिळेल, याचा विचार करतच तिनं दारात पाऊल टाकलं. बघते, तर सगळं घर नीटनेटकं आवरून ठेवलेलं होतं. ती बाहेर पडताना घरात जो थोडा पसारा होता, तोही आवरलेला होता. सगळ्या वस्तू जागच्या जागी होत्या. एवढंच नव्हे, मुलांनी तिच्यासाठी गरमागरम वरणभाताचा कूकरही लावून ठेवला होता. आईला आश्चर्याचा धक्काच बसला.

‘अरे वा! मी नसताना तुम्ही घर डोक्यावर घ्याल, ही भीती होती, तीही आता नाहीशी झाली. शाब्बास. देवापुढे साखरच ठेवते आता.’’ आई त्यांचं कौतुक करत म्हणाली.

‘तू तिला छान सांभाळून घेतलेलं दिसतंय!’’ आई दादाची पाठ थोपटत म्हणाली.

‘त्यानं काय केलंय? मीच गप्प बसले म्हणून.’’

‘नाहीतर काय केलं असतंस गं?’’

‘ते तुला कळलं असतं.’’

‘आत्ता सांग ना...थांब...बघतोच तुझ्याकडं.’’

‘आई गं...! ह्यानं परत माझे केस ओढले. आता मी ह्याला नखं लावणार...!’’ दोघांचे पुन्हा मोठमोठ्याने आवाज ऐकू येऊ लागले आणि आईनं देवासमोर साखर ठेवायचा बेत रद्द करून टाकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com