बालक-पालक : ‘आवर’ रे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balak Palak
बालक-पालक : ‘आवर’ रे!

बालक-पालक : ‘आवर’ रे!

‘माझा फोन कुठाय?’ सकाळी ऑफिसला निघालेल्या बाबांना मोबाईल सापडत नव्हता.

‘बाबा, रिंग द्या ना, लगेच सापडेल!’ धाकटीनं सुचवलं. फोन शोधायचा असेल, तर ही आयडिया नेहमी लागू पडायची. मग बाबांनी कॉल करण्याची वाट न बघता धाकटी स्वतःच लॅंडलाइनपाशी गेली. बोटांमध्ये नंबर फीड केल्यासारखी तिनं पटापटा बटणं दाबली आणि बाबांच्या फोनवर रिंग दिली. रिंग बेडवरूनच ऐकू येऊ लागली. बाबांनी ऑफिसला जाण्यासाठी कपडे बदलले, ते बेडवरच टाकले होते. त्याखालीच फोन गेल्यामुळं तो दिसत नव्हता. रिंग वाजल्यावर चटकन सापडला आणि त्यांनी तो पटकन खिशात टाकला.

‘ह्यासाठीच वस्तू जागच्या जागी ठेवायला हव्यात, असं मी सांगत असते,’ आई स्वयंपाक सोडून बाहेर आली आणि तिनं बाबांच्या निमित्तानं मुलांनाही ऐकवलं.

‘पण आम्ही तर सगळ्या वस्तू जागच्या जागीच ठेवत असतो की गं आई!’ धाकटी कुरकुरली. दादानंही तिला साथ दिली.

‘काही जागच्या जागी वगैरे ठेवत नाही. कालच तुमची कंपास, पट्टी, पेन्सिल, कर्कटक, पेनं, वह्या, पुस्तकं, प्रोजेक्ट बुक्स, वगैरे सगळं दाही दिशांना शोधून तुमच्या कपाटात भरून ठेवलंय मी. हातासरशी तुमचं कपाटही लावून टाकलंय,’’ आईनं माहिती दिली.

‘आता उद्या बाबांचं कपाट आणि टेबलही आवरणार आहे मी.’ जाता जाता आईनं ऐकवलं आणि बाबांनी चमकून मुलांकडं बघितलं.

‘अगं, नको, मी आवरेन ना. आणि तसाही जास्त पसारा नाहीये तिथं!’ बाबांनी सांगण्याचा प्रयत्न केला. ‘पसारा’ हा आईचा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळं तिला सगळ्यांच्या शिस्तीबद्दल बोलण्यासाठी निमित्तच मिळालं. घरात कसं सगळं अस्ताव्यस्त असतं, कुठलही वस्तू वेळेवर कधीच सापडत नाही, घर नीट ठेवल्यानं कसे फायदे होतात, पाहुणे आल्यावर घर नीटनेटकं दिसतं वगैरे सगळ्या गोष्टी तिनं ऐकवल्या.

‘आई, हे सगळं तू नेहमी सांगतच असतेस की गं!’ दादानं तक्रार केली.

‘हो, पण त्याचा तुमच्यावर परिणाम होत नाही, म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं लागतं,’ आई म्हणाली.

‘बरं, माझा रुमाल कुठाय? मला उशीर होतोय. संध्याकाळी आल्यावर बोलू,’ बाबांना ऑफिसला लवकर पोहोचायचं होतं.

‘बाबा, रुमालाला मिस कॉल द्या ना!’ धाकटी म्हणाली, पण त्यावर आत्ता हसण्याच्या मनःस्थितीत कुणीच नव्हतं.

‘यासाठीच सगळं आवरायला हवं, असं मी सांगत असते!’ आईनं ऐकवलं आणि कुठूनसा त्यांचा रुमाल शोधून दिला.

बाबा ऑफिसला निघून गेले आणि आईनं मुलांकडं मोर्चा वळवला. ‘तुमचा जो काही पसारा पडलेला आहे, तो आवरल्याशिवाय खाली खेळायला जायचं नाही,’ अशी तंबी दिल्यामुळं दोघांना नाइलाजानं खोलीतला सगळा पसारा आवरावाच लागला. आईनं स्वतः समोर उभं राहून सगळी तपासणी केली, तेव्हाच मुलांना खेळायला जायची सवलत मिळाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा बाबांचा मोबाईल कुठाय, पाकीट कुठाय, रुमाल कुठाय, असा आवाज ऐकू आला आणि घरात आदल्या दिवशीचाच प्रसंग उभा राहिला.

‘असं कसं सगळं सापडत नाहीये? कालच तर सगळं कपाट, टेबल, अख्खी खोली आवरून ठेवलेय मी!’’ आईनं अत्यंत अभिमानानं सांगितलं.

‘हो, सगळं नीट आवरून ठेवलं आहेस ते दिसतंय!’

‘मग?’

‘म्हणूनच सापडत नाहीये!’’ बाबा म्हणाले.

कंबरेवर हात घेऊन रागानं बघणाऱ्या आईची नजर टाळून, तिच्याकडं पाठ करून त्यांनी मुलांकडं बघून डोळे मिचकावले आणि ते बाहेरच्या खोलीकडं वळले.

loading image
go to top