esakal | बालक-पालक : नाही उत्साहा तोटा!
sakal

बोलून बातमी शोधा

Balak-Palak
बालक-पालक : नाही उत्साहा तोटा!

बालक-पालक : नाही उत्साहा तोटा!

sakal_logo
By
अभिजित पेंढारकर

‘‘आमच्या लहानपणी दसऱ्याचा दिवस शाळेत फार खास असायचा, बरं का!’’ दसऱ्याची चर्चा निघाली आणि बाबांनी उत्साहानं सांगितलं.

‘‘म्हणजे काय काय असायचं, बाबा?’’ चिऊताईनं चिवचिवाट केला.

‘‘दसऱ्यासाठी बाजारातून फुलं आणायची, पाटीची पूजा करायची, पुस्तकांची पूजा करायची, शस्त्रांना फुलं वाहून, गंध अक्षता लावून त्यांची पूजा करायची, पाटीवर सरस्वतीदेवीची मूर्ती काढायची...’’ सांगता सांगता बाबा आठवणींत रमून गेले.

‘‘हो...टीचरनी आम्हालाही सरस्वतीदेवीची मूर्ती काढायला सांगितलेय पाटीवर. पण बाबा, मला नाही येत चित्र काढता.’’ चिऊताई कुरकुरली.

‘‘अगं, त्यात काय एवढं?’’ बाबा अगदी उत्साहानं म्हणाले.

‘‘आम्ही छान सरस्वतीचं चित्र काढायचो पाटीवर. त्यात मस्त रंग भरायचो खडूने.’’

‘‘तुम्ही स्वतः चित्र काढायचात, बाबा?’’ तिच्या या प्रश्नावर आईला आत किचनमध्ये ठसका का लागला, तिला कळलं नाही.

‘‘अगं, म्हणजे मी स्वतःच, असं नाही. कुणीतरी काढून द्यायचं.’’ बाबांनी खुलासा केला.

‘‘आम्ही तर सरळ रेषांपासून सरस्वती काढायचो.’’ आईसुद्धा आता चर्चेत सहभागी झाली.

‘‘नीट रेषा काढायच्या, मग त्या जोडायच्या आणि त्याची सरस्वती तयार करायची. दाखवेन मी तुला.’’ आईनं वचन दिलं.

दुसऱ्या दिवशी आईनं उत्साहानं पाटीवर तिला सरस्वती दाखवायचा प्रयत्न केला, पण जमत कुठे होतं? बाबा मागे उभं राहून आईची गंमत बघत होते. शेवटी ‘‘आत्ता मला काम आहे, नंतर दाखवते,’’ असं काहीतरी सांगून आईनं वेळ मारून नेली. दुपारी जरा सगळी आवराआवर झाल्यावर स्वतः पाटी घेऊन आतल्या खोलीत ती सरस्वतीची आराधना करत बसली, पण ती काही वश होईना.

‘‘बाबा, तुम्ही तरी दाखवा ना!’’ छोटीनं हट्टच धरला, तेव्हा बाबांच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला. त्यांनी भरपूर प्रयत्न करून बघितले, पण सरस्वतीदेवी काही प्रसन्न व्हायला तयार नव्हती. इंटरनेट, यू ट्यूबचाही आधार घेऊन झाला, पण जसं मनात होतं, तसं चित्र काढायला काही जमेना. शेवटी त्यांनीही नाद सोडून दिला.

‘‘पण मग मी चित्र कसं काढू?’’ छोटी फुरंगटून म्हणाली.

‘‘अगं, शाळेत शिकवतील, तेव्हा शिकून घे आणि काढ!’’ एवढ्याच उत्तरावर तिला समाधान मानावं लागलं.

दसऱ्याच्या आधीचा दिवस उजाडला.

सकाळीच आईला आठवलं, आज लेकीला शाळेत पाटीवर काढलेली मूर्ती दाखवायची आहे. तिला अपराधी वाटायला लागलं. आपण थोडे गाफील राहिलो, दोन दिवसांत तिच्याशी काहीच बोललो नाही, आता मूर्ती काढली नाही म्हणून तिला उगाच ओरडा बसेल, अशी काळजी वाटायला लागली.

‘‘बाळा, उठतेयंस ना शाळेला?’’ अंथरुणातून लेकीला उठवताना आज आईला जास्तच प्रेम दाटून आलं होतं. मुलगी टुणकन उठून बसली.

‘‘आई, अगं, सरस्वतीची मूर्ती...’’ ती अर्धवट काहीतरी बोलली आणि आईचं मन तिला जास्तच खायला लागलं. तेवढ्यात कपाटाच्या ड्रॉवरमधून काहीतरी काढून मुलीनं पुढ्यात धरलं.

‘‘हे बघ!’’

आईनं बघितलं, तर कागदावर छान रंगवलेली सरस्वतीची मूर्ती लक्ष वेधून घेत होती.

‘‘अगं, चित्र प्रिंट करून घेतलं आणि रंगवलं, तरी चालणार होतं. छान झालंय ना?’’ डोळे मिचकावत छोटी म्हणाली.

‘‘अगं, पण तुला ही प्रिंट काढून दिली कुणी?’’ आईची उत्सुकता ताणली गेली होती.

‘‘आजीनं!’’ पटकन उत्तर देऊन छोटी तोंड धुवायला पळाली.

loading image
go to top