‘एम्स’मध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी

हेमचंद्र शिंदे
Wednesday, 25 December 2019

वैद्यकशास्त्रातील सर्व शाखांमधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, अध्यापनपद्धत विकसित व्हावी, तसेच सर्व शाखांचा विस्तार व संशोधन यासाठी देशात प्रथमच १९५६मध्ये ‘एम्स’ (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस/अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था) नवी दिल्ली येथे निर्माण करण्यात आली. स्थापनेपासून २००८ पर्यंत प्रवेश क्षमता फक्त ५० होती. काळाची गरज ओळखून केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने दिल्लीच्या धर्तीवर २०१२मध्ये भोपाळ, पाटणा, जोधपूर, ऋषिकेश, भुवनेश्‍वर, २०१३मध्ये रायबरेली, २०१८मध्ये मंगलागौरी (आंध्र प्रदेश) व नागपूर, २०१९मध्ये भटिंडा, पीबीनगर (तेलंगणा), कल्याणी (पश्‍चिम बंगाल) देवघर (झारखंड) या संस्थांची निर्मिती झाली.

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
वैद्यकशास्त्रातील सर्व शाखांमधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, अध्यापनपद्धत विकसित व्हावी, तसेच सर्व शाखांचा विस्तार व संशोधन यासाठी देशात प्रथमच १९५६मध्ये ‘एम्स’ (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस/अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था) नवी दिल्ली येथे निर्माण करण्यात आली. स्थापनेपासून २००८ पर्यंत प्रवेश क्षमता फक्त ५० होती. काळाची गरज ओळखून केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने दिल्लीच्या धर्तीवर २०१२मध्ये भोपाळ, पाटणा, जोधपूर, ऋषिकेश, भुवनेश्‍वर, २०१३मध्ये रायबरेली, २०१८मध्ये मंगलागौरी (आंध्र प्रदेश) व नागपूर, २०१९मध्ये भटिंडा, पीबीनगर (तेलंगणा), कल्याणी (पश्‍चिम बंगाल) देवघर (झारखंड) या संस्थांची निर्मिती झाली. नवी दिल्लीच्या १०७ जागा व भोपाळ, भुवनेश्‍वर, जोधपूर ऋषिकेश, पाटणा व रायपूर येथील प्रवेश क्षमता १०० असून, उर्वरित संस्थांची प्रवेश क्षमता ५० आहे.या सर्व १५ संस्थांतून सद्यःस्थितीत एकूण १२०७ जागा उपलब्ध होतात. त्यात वाढ होऊ शकते. सर्व १५ संस्थांना इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स दर्जा देण्यात आला आहे. 

प्रवेशासाठीची परीक्षा
या सर्व संस्थांतील प्रवेशासाठी २०१९पर्यंत देशपातळीवर स्वतंत्रपणे प्रवेश परीक्षा घेण्यात येत होती. मात्र २०२० पासून या संस्थांतील प्रवेशासाठी स्वतंत्र परीक्षा न घेता सर्व प्रवेश देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्टरन्स टेस्टमधून (NEET) प्राप्त होणाऱ्या ऑल इंडिया रॅंकनुसार होणार आहेत. या चांगल्या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षेला सामोरे जाण्यापासून सुटका झाली असून, ‘नीट’ या एकाच परीक्षेतील ऑल इंडिया रँकच्या आधारे सर्व देशभरातील शासकीय, खासगी, अभिमत तसेच AIIMS, JIPMAR, AFMC सह सर्वच प्रवेश होणार असल्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुकर होणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार चांगले प्रवेश प्राप्त करण्याची संधी एकत्रित परीक्षेमुळे उपलब्ध होत आहे. 

आरक्षण
सर्व संस्थांमधील जागांसाठी राष्ट्रीय पातळीवरील आरक्षण उपलब्ध आहे. एससी- अनुसूचित जाती १५ टक्के, एसटी- अनुसूचित जमाती ७.५ टक्के, ओबीसी- इतर मागासवर्ग- २७ टक्के, तसेच नव्याने लागू झालेले ईडब्ल्यूएस- आर्थिकदृष्ट्या मागासप्रवर्ग १० टक्के, त्याच बरोबर ५ टक्के अपंग प्रवर्गासाठी समांतर आरक्षण आहे. 

प्रवेश प्रक्रिया 
‘नीट’चा निकाल जाहीर झाल्यानंतर डीजीएचएसअंतर्गत एमसीसी- मेडिकल कौन्सिलिंग कमिटीच्या www.mcc.nic.in संस्थेच्या संकेतस्थळावरून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. यंदा प्रथमच राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेबाबतच्या अद्ययावत नियमावली व माहितीसाठी संकेतस्थळाच्या संपर्कात राहावे. ‘एम्स’च्या माहितीसाठी www.aiims.etu संकेतस्थळावरून माहिती घ्यावी. 

या सर्व संस्थांमधील सर्व जागा जवळपास फ्री सीटसारख्याच असून, प्रवेश घेताना शिक्षणशुल्क १३५० रुपये व वसतिगृह ९९० रुपये व इतर खर्च असे सुमारे पाच हजार रुपये फक्त भरावे लागणार असल्याने या ठिकाणचा प्रवेशही भावी डॉक्टरांसाठी एक सुवर्णसंधी असेल. अर्थातच, ‘नीट’ परीक्षेत प्रवेशासाठी ९५ टक्क्यांहून अधिक जास्त पर्संटाईल स्कोअरची आवश्यकता नक्कीच भासेल. भविष्यात मदुराई, राजकोट, रेवाडी, दरभंगा, सांगसरी, विलासपूर, विजयपूर, अवंतीपुरा या ठिकाणी नवीन एम्स सुरू होणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: admission golden chance in aims