esakal | ‘सीईटी’नंतरच प्रवेशप्रक्रिया; शिक्षण विभागाचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

CET Exam

‘सीईटी’नंतरच प्रवेशप्रक्रिया; शिक्षण विभागाचे आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्यात येणार आहे. ही परीक्षा अनिवार्य नसली, तरीही ‘सीईटी’ची (CET) कार्यवाही पूर्ण होईपर्यंत राज्यातील कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया राबवू नये, असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर नी दिले आहेत. (Admission process after CET Order school education department)

प्रवेश परीक्षेसाठी अर्ज नोंदणीची कार्यवाही सुरू असताना, दुसरीकडे काही महाविद्यालयांमध्ये प्रवेशाबाबत हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालकांचा गोंधळ उडत आहे. त्यामुळे अखेर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाला परिपत्रकाद्वारे स्पष्टीकरण द्यावे लागले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीची लेखी परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केले. दरम्यान दहावीची परीक्षा रद्द केल्याने निर्माण होणारा अकरावी प्रवेशाचा पेच सोडविण्यासाठी ‘सीईटी’ परीक्षेचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत अकरावी प्रवेशाच्या सीईटी परीक्षेची कार्यवाही सुरू केली आहे. ही परीक्षा २१ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असून राज्य मंडळाने त्यासाठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया २० जुलै रोजी सुरू केली होती.

दरम्यान, तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया गेल्या तीन दिवसांपासून ठप्प आहे. अद्याप ती पूर्ववत करण्यात राज्य मंडळाला यश आली नाही. दरम्यान, अकरावी प्रवेशाबाबत विद्यार्थी-पालकांचा संभ्रम वाढत आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने काढलेले परिपत्रक विद्यार्थी-पालकांना दिलासा देणारे ठरत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय संचालक दिनकर टेमकर म्हणाले, "अकरावी प्रवेशाची ‘सीईटी’ ऐच्छिक आहे. परंतु, ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येतील. या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतरच उर्वरित जागांवर दहावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातील. त्यामुळे सीईटीची कार्यवाही पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणत्याही महाविद्यालयांना अकरावीसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू करता येणार नाही."

loading image
go to top