
पुणे, ता. १९ : ‘महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी’ (अमृत) आणि ‘महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पुणे जिल्हा’ (एससीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी ‘अमृत-आयात व निर्यात प्रशिक्षण योजना’ आणि ‘अमृत सूर्यमित्र (सौर) प्रशिक्षण योजनेंतर्गत मोफत निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत खुल्या प्रवर्गातील बारावी पास विद्यार्थ्यांना २४ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड होणार असून, २५ जानेवारीपासून प्रशिक्षणवर्गाला सुरुवात होणार आहे. ही योजना पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी असल्याचे अमृत आणि ‘एससीईडी’द्वारे सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अमृत संस्थेच्या संकेतस्थळावर आपला प्रवेश अर्ज भरता येणार आहे.