Video : यश आणि अपयश

आनंद महाजन
Thursday, 19 March 2020

मुलांनी यश कसं मिळवावं, अपयश कसं हाताळावं व विजय कसा मिळवावा हे शिकवण्याची तयारी पालकांनी केली पाहिजे. 

राजेश आणि सुरेश हे दोघे घट्ट मित्र आहेत. ते एकाच सोसायटीत राहतात. एकत्र शाळेला जातात आणि एकाच वर्गात आहेत. वर्गात परीक्षेचा निकाल लागतो. राजेश घरी येऊन जाहीर करतो की त्याला ९५ टक्के गुण मिळाले व तो वर्गात दुसरा आला. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सुरेश घरी येऊन सांगतो की, त्याला काही विषयांचे धडे न समजल्यामुळे परीक्षेत कमी गुण मिळाले. सुरेशचे आईवडील रागावून त्याला म्हणतात, ‘तुझं वर्गात लक्ष नसतं. वर्गात शिक्षक काय शिकवतात याकडंही तुझं लक्ष नाही. अभ्यास कमी केला असशील. राजेशला बघ. त्याला कसे चांगले गुण मिळतात. तू पण त्याच्यासारखा अभ्यास करून चांगले गुण मिळवले पाहिजेत.’

सुरेशशी त्याच्या पालकांचा झालेला संवाद हा बऱ्याच मुलांच्या घरी होत असतो. वर्गात पहिले दहा क्रमांक, ‘ए प्लस’ ग्रेड पटकावणाऱ्या मुलांचे नेहमी कौतुक होते व बाकी मुलांवर चांगले ग्रेड मिळवण्याचे ध्येय सतत बिंबवले जाते. यश कमवण्याची तयारी व भरारी घेण्याचे प्रशिक्षण सर्वांना मिळत असते आणि घरामध्ये या विषयाची चर्चा सतत सुरू असते. अपयश आले, तर या अपयशातून यशाकडं जाण्याची वाटचाल करण्याचं मनोधैर्यदेखील चर्चेत आलं पाहिजे. 

मुलांनी यश कसं मिळवावं, अपयश कसं हाताळावं व विजय कसा मिळवावा हे शिकवण्याची तयारी पालकांनी केली पाहिजे. 

सुरेशसारख्या मुलानं त्याची अडचण जाहीर केल्यास ते पाहूया
सर्वांत आधी मुलाचं कौतुक करावं की, त्यानं स्वतःत कुठं सुधारणा करायच्या हे ओळखलं असून, हिमतीनं त्यानं हा मुद्दा मांडला आहे. 
कौतुक केल्यामुळं मुलाच्या मनातला तणाव कमी होईल. 
अवघड वाटणारे धडे व संकल्पना यांची यादी करावी आणि त्यावर पालकांनी व मुलांनी एकत्र काम करावं. 
इतर मुलांशी तुलना न करता स्वतःला मिळालेल्या ग्रेडपेक्षा चार ते पाच टक्के गुण जास्त मिळवण्याचे ध्येय निश्‍चित करावे. 

उदाहरणार्थ - नुकत्याच झालेल्या परीक्षेत एखाद्या विषयात ६० टक्के गुण पडले असतील, तर पुढच्या परीक्षेत ९० टक्के गुणांचे ध्येय न ठेवता, ६५ ते ७० टक्के गुण मिळाल्यास मुलाचे खूप कौतुक करावे. 
अशी छोटी छोटी आव्हाने मुलांना दिल्यामुळं त्यांचं मनोबल उंचावतं व भरारी घेण्याकडं मनःस्थिती प्रेरित होते. या संकल्पनेला आपण ‘बेबी स्टेप’ म्हणू शकतो. 

‘बेबी स्टेप’ संकल्पनेचे फायदे पाहूया
मुलांना हे लक्षात येते की, माझी समस्या आई-वडिलांसमोर मांडल्यास न ओरडता ती सोडवण्यास मदत होते. 
यामुळं मुलांना पालकांविषयी जवळीक निर्माण होते व ते मनमोकळेपणानं आपल्या समस्येवर चर्चा करतात. 
मुलं कुठल्याही दबावाखाली येत नाहीत आणि खचून जाणं, उदास होण्याची शक्‍यता टाळली जाते. 
त्यांचं व्यक्तिमत्त्व खुलू लागतं. 

मुलांना आपल्यातील क्षमता समजलं नसल्यास...
पालकांनी पुढाकार घेऊन 
मुलांशी खेळीमेळीत चर्चा करावी. 
त्यांच्या शिक्षकांना भेटून 
नेमकी समस्या काय आहे, हे शोधावं. प्रत्येक वेळी समस्या ही 
अभ्यासाशी निगडित असेल, असे नाही.
बऱ्याच वेळा मुद्दा अभ्यासाचा नसून, शाळेमध्ये घडलेल्या एखाद्या प्रसंगामुळं, शिक्षकांच्या धाकामुळं, मित्र-मैत्रिणींची भांडणं (हेवेदावे) यामुळं मुले मानसिकरित्या विचलित असतात. 

म्हणूनच अभ्यासात लक्ष न लागल्यामुळं परीक्षेत मार्क कमी मिळतात. अपेक्षित यशासाठी योग्य कालावधी द्यावाच लागेल. ही प्रगती नेहमीच पटकन साध्य होईल असे गृहित धरू नये. पण सातत्यानं हा प्रयत्न केल्यास काही काळात घवघवीत यश नक्कीच मिळेल. 

All the Best.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anand Mahajan Article Success and failure