करिअर अपडेट : कंपनीची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

career update

भविष्यात तुम्ही कोणत्या कंपनीची निवड करणार? पुढचं पाऊल टाकण्याआधी व्यवस्थित माहिती घ्या. सध्या अमेरिका मंदीच्या कालखंडाला सामोरी जात आहे.

करिअर अपडेट : कंपनीची निवड

- अंकित भार्गव

भविष्यात तुम्ही कोणत्या कंपनीची निवड करणार? पुढचं पाऊल टाकण्याआधी व्यवस्थित माहिती घ्या. सध्या अमेरिका मंदीच्या कालखंडाला सामोरी जात आहे आणि त्यामुळेच अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्यात आली आहे. एकूणच आर्थिक आघाडीवर काहीशी सामसूम आहे. अगदी अमेरिकेइतकी नसली, तरी भारतालादेखील या परिस्थितीची थोडीफार झळ बसलेलीच आहे. आतापर्यंत भारतातील ४५ हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. मंदी सुरूच आहे.

फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर, ॲमेझॉन, गुगल, बायजुज्, गो-मेकॅनिक, ओयो अशा अनेक कंपन्या कर्मचारीकपात करण्याच्या तयारीत आहेत, तर ॲपलसारख्या कंपन्या अपरिहार्यतेमुळे आर्थिक बाबतीत कपातीचं धोरण लागू करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण मुलाखतीला जाण्यासाठी किंवा करिअर म्हणून एखादी कंपनी कोणत्या निकषांवर निवडणार? तसे पाहता यासाठी अनेक निकष असले तरी कार्यसंस्कृती, बिझनेस मॉडेल (नफा आणि कंपनीची गंगाजळी), आर्थिक श्रेणी आणि उत्पादन/सेवा या निकषांचे महत्त्व अधिक आहे. एखाद्या आस्थापनेमध्ये मुलाखतीसाठी जाताना उपरोक्त मुद्द्यांसंदर्भातील काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला याबाबतीत कितपत जोखीम आहे हे समजू शकते. ‘कंपनी आपल्याला किती मानधन देणार आहे’ केवळ एवढ्याच निकषावर एखादा निर्णय घेणे ही काही फारशी शहाणपणाची गोष्ट नाही.

कार्यसंस्कृती

गुगलवर कंपनीचे नाव आणि कर्मचारीकपात (<Company name> + <firing>) ही माहिती शोधा. त्या कंपनीमध्ये ‘हायर अँड फायर’ हे धोरण अवलंबले जाते का? हे जाणून घेण्यासाठी लेखांचा शोध घ्या. कंपनीने यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या उन्नतीसाठी या कोणत्या ‘ग्रोथ पाथ’ची अंमलबजावणी केली आहे? किंवा या पदासाठी भविष्यामध्ये कोणता ‘ग्रोथ पाथ’ निश्चित केला आहे? याबाबत विचारणा करा. अशा प्रकारचा ‘करिअर पाथ’ निश्चित नसलेल्या कंपनीमध्ये तुम्हाला अतिरिक्त ठरवले जाऊन बिकट परिस्थितीमध्ये बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

बिझनेस मॉडेल

कंपनीच्या महसूलासंदर्भात माहिती घ्या. संबंधित क्षेत्रामध्ये सध्या कोणते ट्रेंड्स सुरू आहेत याचा स्वत: अभ्यास करा. उदाहरणार्थ, सध्या बहुतांश ‘एडटेक’ कंपन्या कोरोना साथीच्या कालखंडामध्ये भरती करून घेतलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. अद्याप देयके न मिळाल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बिकट होत आहे.

फंडिंग स्टेज (आर्थिक स्थिती)

तुम्ही एखाद्या स्वयं-अर्थसहाय्यित नसलेल्या स्टार्टअपमध्ये मुलाखतीसाठी जाणार असाल, तर तो स्टार्टअप प्री-सीड, सीड, सिरीज ए, बी, सी किंवा आयपीओ स्टेज यांपैकी नेमक्या कोणत्या श्रेणीमध्ये आहे, हे समजून घेणे आवश्यक ठरते. प्रत्येक पुढच्या टप्प्यानुसार बिझनेस मॉडेल अधिक परिपक्व होत जाते. त्याला बाजारपेठेमधून अधिमान्यता मिळते. त्यामुळेच त्यामध्ये जोखीम कमी असते. ती आस्थापना नफ्यात असेल, तर २० टक्क्यांपेक्षा अधिक ईबीआयटीडीए टक्केवारी असलेल्या आस्थापनेसंदर्भात जोखीम कमी असते.

उत्पादन/सेवा

क्षेत्राचा विचार करता उत्पादन/सेवा मंदीच्या झळांमध्ये टिकून राहणारी असावी. सामान्यत: खात्रीने महसूल देणाऱ्या ‘हाय कॅपेक्स’ श्रेणीतील कंपन्या या तात्कालिक किंवा ट्रान्जॅक्शनवर आधारित उत्पादन/सेवा देणाऱ्या कंपन्यांपेक्षा कमी जोखमीच्या असतात. ‘मॅस्लो हायरारकी’च्या आधारे उत्पादन किंवा सेवा हे आवश्यकता(किमान जोखीम), आवड(अधिक जोखीम) किंवा इच्छा(सर्वाधिक जोखीम) यांपैकी कोणत्या श्रेणीमध्ये येते याचे मूल्यमापन करा. तसेच स्पर्धा हादेखील एक महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या क्षेत्रामध्ये मक्तेदारी असेल तर गुंतागुंतीच्या बाजारपेठेच्या तुलनेत जोखीम कमी असते.

तुमचा ‘करिअर पाथ’ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या नोकरी/व्यवसायाशी संबंधित ध्येय गाठताना अनपेक्षित अडथळे न येणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. ज्यामध्ये जोखीम नसते, असा कुठलाच निर्णय नसतो; परंतु पुरेशी माहिती न घेता घेतलेला चुकीचा निर्णय पश्चात्ताप आणि त्याबरोबर येणारा मानसिक ताण यांना आमंत्रण देणारा ठरतो.

टॅग्स :companyeducationjobCareer