करिअर अपडेट : सायबर सुरक्षातज्ज्ञ व्हायचं आहे?

डेटा हे नव्या युगातील सोनं असेल तर त्याच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.
cyber security
cyber securitysakal

- अंकित भार्गव

डेटा हे नव्या युगातील सोनं असेल तर त्याच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. सध्याच्या या डिजिटायझेशनच्या युगामध्ये सायबर सुरक्षा हा विषय केवळ डिजिटल करन्सीपुरता मर्यादित राहिलेला नाही. कोणत्याही कारणामुळे संस्थात्मक किंवा व्यक्तिगत डेटाच्या सुरक्षिततेविषयी तडजोड न करणे हे महत्त्वाचे आहे. नॅसकॉमच्या एका अहवालानुसार भारतामध्ये सायबर सुरक्षातज्ज्ञांची वानवा आहे. भारतामध्ये सद्यःस्थितीत १० लाख सायबर सुरक्षातज्ज्ञांची आवश्यकता आहे.

सायबर सुरक्षातज्ज्ञ बनण्यासाठीची पात्रता

तांत्रिक कौशल्य : सायबर सुरक्षा या विषयाशी संबंधित अनेक सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पायथॉन, जावा, एचटीएमएल, सीप्लसप्लस आणि इतर कोडिंग लँग्वेजेसचे ज्ञान सायबर सुरक्षा क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी फायदेशीर ठरते.

दृष्टिकोन : या क्षेत्रामध्ये काम करताना तपशीलात जाऊन संशोधन करण्याची मनोवृत्ती असावी. यामुळे सायबर सुरक्षातज्ज्ञांना सायबर हल्ल्याविषयी तत्काळ समजावून घेता येते. इतकेच नाही तर अशा प्रकारचा हल्ला पुन्हा झाल्यास त्यापासून डेटा आणि सिस्टीम यांचे संरक्षण कसे करायचे, याविषयीदेखील त्यांच्या संशोधनाच्या आधारे धोरण ठरविता येते.

रोजगाराची उपलब्धता

नेटवर्क सिक्युरिटी इंजिनिअर : नेटवर्कशी संबंधित हार्डवेअर सुरक्षित ठेवणे हे नेटवर्क सिक्युरिटी इंजिनिअरचे काम असते.

सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट : सिस्टीममधील त्रुटी शोधणे आणि सिस्टीमचे व्यवस्थित संचालन करणे हा सायबर सिक्युरिटी अॅनालिस्टच्या कामातील महत्त्वाचा घटक आहे.

सिक्युरिटी आर्किटेक्ट : संस्थेसाठी कॉम्प्युटर नेटवर्क आणि अॅप्लिकेशन सिक्युरिटी डिझाईन करणे हे सिक्युरिटी आर्किटेक्टचे काम असते.

सायबर सिक्युरिटी मॅनेजर : कंपनीमध्ये ‘आयटी’शी संबंधित एखादी समस्या उद्‍भवल्यास किंवा नेटवर्कमध्ये अडचणी उत्पन्न झाल्यास सायबर सिक्युरिटी मॅनेजर त्यांचे व्यवस्थापन करतो आणि कृती आराखड्याची अंमलबजावणी करतो.

चीफ इन्फॉर्मेशन अँड सिक्युरिटी ऑफिसर : संस्थेच्या सुरक्षेमध्ये त्रुटी राहू नयेत यासाठी विविध प्रक्रिया शोधणे, त्यांची अंमलबजावणी करणे आणि त्यांची देखभाल करणे यासाठी चीफ इन्फॉर्मेशन अँड सिक्युरिटी ऑफिसर इतर सहकाऱ्यांसोबत काम करतो. एखादी घटना घडल्यास ते त्याला प्रतिसाद देतात, योग्य ते निकष ठरवतात, व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ न देता सुरक्षाविषयक जोखमीचे विषय हाताळून समस्या सोडवतात.

इन्फर्मेशन सिक्युरिटी मॅनेजर : इन्फर्मेशन सिस्टीम सायबर हल्ल्यांना बळी पडतात ती कारणे शोधण्याचे काम इन्फर्मेशन सिक्युरिटी मॅनेजर करतात. कंपनीचा डेटा, कॉम्प्युटर आणि नेटवर्क यांमधील सायबरशी संबंधित धोके ओळखून त्यांचे निराकरण करणे हे इन्फर्मेशन सिक्युरिटी मॅनेजरचे काम असते.

अॅप्लिकेशन सिक्युरिटी इंजिनिअर : अॅप्लिकेशन सिक्युरिटी इंजिनिअर संस्थेचे अंतर्गत आणि बाह्य अॅप्लिकेशन व्यवस्थित चालेल याची काळजी घेतो. अॅप्लिकेशन सिक्युरिटी इंजिनिअरला अझ्युअर किंवा एडब्ल्यूएस यांसारख्या थर्ड पार्टी अॅप्लिकेशन्सच्या सुरक्षितता, त्यांच्या डेटाची गोपनीयता इत्यादी बाबतींत सखोल माहिती असते.

एथिकल हॅकर्स : एथिकल हॅकर्स हे नेटवर्क, सिस्टीम आणि अॅप्लिकेशनला टेस्ट करून त्यातील त्रुटी दूर करतात.

इन्सिडेंट मॅनेजर : संस्थेमधील सुरक्षाविषयक मुद्दे हाताळण्यासाठी योग्य मनुष्यबळ आणि संसाधने यांची पूर्तता करण्याचे काम इन्सिडेंट मॅनेजर करतो. एखादी दुर्घटना घडल्यास तो टीम तयार करून त्या घटनेच्या परिणामांची पूर्ण जबाबदारी घेतो.

क्लाउड सिक्युरिटी इंजिनिअर : हा संस्थेसाठी क्लाउड बेस्ड नेटवर्क आणि सिस्टीम विकसित करतो, त्यांची देखभाल करतो. तसेच त्या वेळोवेळी अद्ययावत केल्या जातील याची काळजी घेतो. तो संस्थेतील संपूर्ण क्लाउड कॉम्प्युटिंग यंत्रणा, महत्त्वाच्या पायाभूत सुविधा, प्लॅटफॉर्म आणि सॉफ्टवेअर हाताळतो.

या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध असल्या तरी, सायबर सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण स्वत:चे मूल्यमापन केले पाहिजे. डिजिटायजेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापरामुळे डेटाच्या निर्मितीमध्ये अनेक पटीने वाढ झाली आहे. सायबर सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यामुळे आर्थिक संपन्नतेबरोबर या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन ट्रेंड्स, आणि कार्यपद्धती शिकता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com