अभिक्षमता चाचणी

अलीकडच्या काळात सर्वसाधारणपणे दहावी झाल्यानंतर कोणत्या क्षेत्रात जीवनकार्य करायचे हे ठरविण्यासाठी अभिक्षमता चाचणी म्हणजेच ‘ॲप्टिट्यूड टेस्ट’ करून घेण्याची पद्धत रूढ झाली आहे.
Aptitude Test
Aptitude Testsakal

अलीकडच्या काळात सर्वसाधारणपणे दहावी झाल्यानंतर कोणत्या क्षेत्रात जीवनकार्य करायचे हे ठरविण्यासाठी अभिक्षमता चाचणी म्हणजेच ‘ॲप्टिट्यूड टेस्ट’ करून घेण्याची पद्धत रूढ झाली आहे. तशी ती इयत्ता दहावी झाल्याशिवाय करूही नये असा प्रघात आहे, कारण तुमच्या क्षमता व कल यांचे बऱ्यापैकी विकसन होण्यासाठी तेवढा वेळ थांबावे लागते.

जीवनकार्याचे इतके विविध मार्ग उपलब्ध झाले आहेत की, आता केवळ दहावीच्या गुणांवरून मार्ग निवडणे कठीण झाले आहे. अलीकडच्या काळात दहावीचे गुण फसवेही झाले आहेत. अभिक्षमता चाचणी तुमची योग्यता तपासते. ती तुमच्याकडे एखाद्या क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक क्षमता व कल आहे की नाही हे तपासते. दहावीचे गुण तुम्ही काय करू शकला आहात हे सांगतात, तर अभिक्षमता चाचणी भविष्यात तुम्ही काय करू शकाल? म्हणजेच तुमची क्षमता सांगते. ती भविष्याभिमुख असते.

चाचणीचे दोन भाग

सर्वसाधारणपणे अभियोग्यता चाचणीमधे दोन भाग असतात. पहिला भाग तुमची क्षमता मोजतो, तर दुसरा भाग तुमच्या वर्तणुकीविषयी असतो. पहिल्या भागात तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बौद्धिक क्षमता तपासल्या जातात. तुम्ही विविध प्रकारच्या माहितीवर किती भराभर प्रक्रिया करू शकता यावर प्रामुख्याने भर असतो.

संख्या, शब्द, चित्रे, भाषा, अवकाश इत्यादी गोष्टींचा उपयोग तुम्ही करू शकता की नाही, तुमची विचार करण्याची, प्रश्न सोडविण्याची, नवनवीन कल्पना सोधण्याची क्षमता कशी आहे? याचा शोध घेण्यासाठी प्रश्न असतात. दुसऱ्या भागात तुमची वर्तणूक तपासली जाते. तुम्ही विशिष्ट परिस्थितीत कसे वागता, तुमची स्वतःबद्दलची प्रतिमा कशी आहे, तुमची मूल्यव्यवस्था कशी आहे?

आदी गोष्टी समजून घेण्यासाठीचे प्रश्न असतात. तुम्ही दिलेल्या उत्तरांवर प्रक्रिया करून तुमची अभिक्षमता शोधली जाते व त्याचे निष्कर्ष सांख्यिकी रूपात व समजायला सोपे जावे म्हणून आलेखरूपातही मांडले जातात. दिलेल्या अहवालाचा अर्थ तुम्हीही लावू शकाल अशी मार्गदर्शक पुस्तिकाही दिलेली असते. याबरोबरच तज्ज्ञ मार्गदर्शकही आपल्याला समजावून सांगतात.

स्वरूप

या अभिक्षमता चाचण्या देताना शालेय परीक्षेसारखी कोणतीही पूर्वतयारी करून जाणे अपेक्षित नसते, पण ही चाचणी देताना काही काळजी मात्र अवश्य घ्यायला हवी. पहिल्या भागात तुमच्या बौद्धिक क्षमता मोजल्या जात असल्याने ज्या वेळी तुम्ही परीक्षा देत आहात, त्या वेळी तुम्ही ताजेतवाने असायला हवे. रात्रभर प्रवास करून, जागरण करून थकलेल्या अवस्थेत परीक्षा दिली तर उत्तरे चुकू शकतात आणि तुमची क्षमता कमी आहे असे दिसेल.

त्यामुळेच चाचणी देताना मन प्रसन्न व तल्लख हवे. बसण्याची जागा, आजूबाजूचे शांत अथवा अशांत वातावरण, लक्ष विचलित करू शकणाऱ्या बाबी या सर्व परिणाम करतात. त्यामुळे जाताजाता ही चाचणी देणे योग्य नाही. दुसऱ्या भागात तुम्हाला तुमच्याविषयी विचारलेले असते.

त्यांची उत्तरे योग्य व प्रामाणिकपणे द्यायला हवीत. आपल्याला आपण कसे असावे असे वाटते त्यापेक्षा आपण काय आहोत हे सांगता आले पाहिजे. ते आपले अचूक प्रतिबिंब असले पाहिजे. त्यासाठीच आत्मपरीक्षण उत्तमरीत्या झालेले असले पाहिजे.

सावध राहा

अलीकडच्या काळात मागणी वाढल्याने खूप जण करिअर मार्गदर्शन क्षेत्रात आले आहेत. ऑनलाइन वेबसाइट्सवरदेखील अशा प्रकारच्या चाचण्या सहज उपलब्ध होतात, पण याबाबत आपण सावध असले पाहिजे. केवळ कमी किंमतीत किंवा फुकटात किंवा सहज उपलब्ध होतात म्हणून त्या देऊन त्यांच्या निर्णयावर अवलंबून राहिलो, तर दिशा पूर्णपणे चुकू शकते. अभियोग्यता चाचण्या तयार करणे सोपी गोष्ट नाही.

त्या तयार करताना अभ्यास तर लागतोच शिवाय त्यांचे विशिष्ट पद्धतीने प्रमाणीकरण करावे लागते. त्यासाठी प्रचंड कष्ट व खर्चही असतो. त्या सातत्याने बदलत राहाव्या लागतात आणि त्या देतानाही विशिष्ट वातावरण असावे लागते. त्यामुळे प्रशिक्षित मानसतज्ज्ञच त्या देऊ शकतात.

ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्था, न्यू फ्लेक्स, करियर सेतू ही अशी काही ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी अतिशय शास्त्रीय पद्धतीने तयार केलेल्या चाचण्याच वापरल्या जातात. त्यानंतरचे समुपदेशनही तज्ज्ञ मार्गदर्शकच करतात. त्यामुळे याबाबत अतिशय सावध असावे लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com