लष्कराच्या विधी विभागात अधिकारी पद मुलाखतींसाठी ऑनलाइन प्रक्रियेला सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online interview Process

लष्कराच्या विधी विभागात अधिकारी पदासाठी सैन्यदलाद्वारे आयोजित 'जेएजी' प्रवेश प्रक्रिये अंतर्गत सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (एसएसबी) मुलाखतींसाठी तारखा निवडण्याची ऑनलाइन प्रक्रियेला सुरवात.

लष्कराच्या विधी विभागात अधिकारी पद मुलाखतींसाठी ऑनलाइन प्रक्रियेला सुरवात

पुणे - लष्कराच्या विधी विभागात अधिकारी पदासाठी सैन्यदलाद्वारे आयोजित 'जज एडवोकेट जनरल'च्या (जेएजी) प्रवेश प्रक्रिये अंतर्गत सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (एसएसबी) मुलाखतींसाठी तारखा निवडण्याची ऑनलाइन प्रक्रियेला सुरवात झाली आहे. ही प्रक्रिया केवळ महिला उमेदवारांसाठी असून येत्या सोमवारपर्यंत (ता. ७) उमेदवारांना तारखा निवडता येणार आहे. अशी सूचना सैन्यदलातर्फे देण्यात आली आहे.

जेएजी-३० या अभ्यासक्रमाची सुरवात एप्रिल २०२३ पासून होणार आहे. यासाठी लेखी परीक्षा नसून थेट एसएसबीद्वारे उमेदवारांना निवडण्यात येते. तर यामध्ये केवळ विधीची पदवी असलेल्या उमेदवारांना सहभाग घेता येतो. यासाठी पदवी परीक्षेत ५५ टक्के आणि वयोमर्यादा २७ वर्षे ठेवण्यात आली आहे. यामध्ये महिला उमेदवारांसाठी केवळ दोन जागा राखीव ठेवण्यात आल्या असून एसएसबी प्रक्रिया उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ४९ आठवड्यांसाठी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (ओटीए) येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रवेश प्रक्रिये अंतर्गत उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून पदवीच्या गुणवत्तेच्या आधारावर कट ऑफ जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार जे उमेदवार जेएसीसाठी पात्र ठरले आहेत त्यांच एसएसबीसाठी तारखा निवडता येणार आहेत. ही प्रक्रिया ऑनलाइन असून उमेदवारांना यासाठी www.joinindianarmy.nic.in या सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल. तारीख निवडण्यासाठी ७ नोव्हेंबरपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.