Innovation-Hub
Innovation-Hub

नवं काही : इनोव्हेशनचा ‘नकाशा’ साकारताना...

देशपातळीवर हॅकेथॉन आयोजित करण्याबद्दल आम्ही मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संवाद साधत होतो. त्यांनी केवळ तीन-चार मिनिटांतच हॅकेथॉनशी संबंधित काही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतरचा इतिहास ज्ञातच आहे.

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच) जगातील सर्वांत मोठी हॅकेथॉन बनली. ते जगातील सर्वांत मोठे खुले इनोव्हेशनही ठरले. आता यात लाखो विद्यार्थी, हजारो ख्यातनाम संस्था सहभागी होत आहेत. एसआयएचमुळे देशातील प्रत्येक भागात हॅकेथॉनची सुरुवात झाली. मात्र जीवशास्त्र, औषधनिर्माण शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी काहीही केले नसल्याची खंत वाटत होती. या युवाशक्तीचा कसा वापर करता येईल, हा प्रश्न मी स्वत:लाच विचारत होतो.  

मानवी नकाशाचा प्रयोग
एप्रिल २०१७ रोजी मी ‘मानव : ह्युमन ॲटलास इनिशिएटिव्ह’बद्दल विचार केला. तोपर्यंत जगभरातील मानवी जीवशास्त्र संशोधकांनी या विषयावरील ६० लाखांहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले. मात्र, कुणीही ते गुगल मॅपप्रमाणे मॉडेल बनविण्यासाठी पद्धतशीरपणे गोळा केले नव्हते. व्यापक ते सूक्ष्म पातळीवरील माहिती जोडून मानवी शरीराचा नकाशा तयार करण्याचा प्रयत्नही कुणी केला नव्हता. मी पुन्हा यासंदर्भात डॉ. आनंद देशपांडे यांच्याशी चर्चा केली. त्यांना मला पाठिंबा देत सविस्तर अहवाल बनविण्याची तयारी सुरू करण्याचा सल्ला दिला. उत्साहाच्या भरात मी जैवतंत्रज्ञान विभागाचे तत्कालीन सचिव डॉ. विजयराघवन यांना त्याच रात्री २०-३० ओळींचा एसएमएस पाठवला. त्यात संकल्पना स्पष्ट करतानाच सादरीकरणासाठी वेळ देण्याची विनंतीही केली. डॉ. विजयराघवन यांनी मला तत्काळ प्रतिसाद दिला व सादरीकरणासाठी दिल्लीला बोलावले. सध्या ‘मानव’ या प्रकल्पाला जैवतंत्रज्ञान विभाग निधी देत असून, सध्याचे सचिव डॉ. रेणू स्वरूप यांचा सक्रिय पाठिंबा लाभला आहे.

पर्सिस्टिंट सिस्टिम्सही या प्रकल्पात मोठी गुंतवणूक करत आहे. याशिवाय ३० संशोधकांचा गटही आयटी प्लॅटफॉर्म बांधण्यावर काम करतोय. पद्धतशीररीत्या मानवी जीवशास्त्रीय माहिती गोळा करण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा उपयोग केला जाईल. मानवी शरीराचा नकाशा बनविण्यासाठी ही माहिती गोळा केली जाईल. ही उदाहरणे मी कोणी महान आहे, हे सांगण्यासाठी सांगितली नाहीत, तर आपली मोठा विचार करण्याची आणि काही धोका पत्करण्याची तयारी असल्यास मोठे प्रकल्प साकारू शकतात, हा संदेश देतो आहे. जागतिक क्षितिजावर भारताला ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था म्हणून उदयास यायचे असल्यास आपण आपल्या प्राध्यापकांना उच्च ध्येये ठेवायला शिकविले पाहिजे आणि कुलगुरूंची भूमिकाही यासंदर्भात महत्त्वाची असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com