करिअरचे ‘शब्दांकन’

डॉ. श्रीराम गीत
Saturday, 14 December 2019

स्वप्नांचे शब्दांकन यावरील लेख वाचून मला काही वाचकांचे (पालकांचे) फोन आले. म्हणूनच त्यावरचा खुलासा करतच आजचा लेख सुरू करुयात. पालकांचे प्रश्‍न तीन चार प्रकारचे होते.

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक
स्वप्नांचे शब्दांकन यावरील लेख वाचून मला काही वाचकांचे (पालकांचे) फोन आले. म्हणूनच त्यावरचा खुलासा करतच आजचा लेख सुरू करुयात. पालकांचे प्रश्‍न तीन चार प्रकारचे होते. 

१) आमची मुले असे काही लिहितील काय? 
२) शब्दांकन म्हणजे काय ते स्पष्ट कराल काय? 
३) असे काही लिहायचे म्हणजे निबंध लेखन का? 
४) त्यांनी कोणत्या भाषेत लिहावे? ते खरेखरे सांगत आहेत, हे कसे समजावे? त्यांची स्वप्ने पुन्हा पुन्हा बदलत असतील तर? 

खरे सांगायचे तर असे शब्दांकन शंभर टक्के शक्‍य आहे, मात्र त्याबद्दल मुलांशी पुरेसा संवाद साधणे ही त्याची प्राथमिक गरज आहे. तो न साधताच आता तुला काय करायचे ते लिहून काढ, हा पूर्णतः फसणारा प्रयोग असेल हे नक्की. सणासुदीला, वाढदिवसाला, पार्टीला काय हवे नको याची किंवा मेनुची चर्चा घराघरांतून होते किंवा नवीन कपडे, बूट आणताना होते त्याची कृपया आठवण करून पाहा. तीच पद्धत जरा विस्ताराने, सवड  
काढून, विविध पर्याय समोर मांडून सुरू करा. यश नक्की मिळणार आहे. शब्दांकनाचे फायदे समजावून तर द्या. 

शब्दांकन म्हणजे एकच शब्दात कोण बनायचे याची नोंद नव्हे. क्रिकेटपटू बनायचे अनेकांचे स्वप्न असतेच ना? मग त्यातील तुला काय येते, कोणता खेळाडू आवडतो, त्याने काय काय केले म्हणून तो इथपर्यंत पोचला, कोणत्या प्रकारचा खेळ तुला आवडतो - टी-२०, वनडे, कसोटी, का हाफपिच गल्लीतील टेनिस चेंडूची मॅच इत्यादी. हे निबंध लेखन नक्कीच नाही, ते अपेक्षांचे सुलभ व्यक्तीकरण आहे असे समजा ना. प्रवासाला निघताना तपासण्याच्या किमान गोष्टी म्हणजेच तिकीट, पैसे, पाण्याची बाटली, खाण्याचे पदार्थ, शक्‍यतो कमीत कमी सामान व प्रवास संपल्यावर तिथे जाऊन काय करायचे यावरच्या मनातल्या कल्पना यात गल्लत केल्यास प्रवासाचे उद्दिष्टच निरर्थक ठरते. अगदी तसेच करिअरचे सुद्धा आहे. जमेल ती भाषा, सापडतील ते शब्द मात्र ते त्यांचे स्वतःचे हवेत. स्वतःचे शब्द सापडतात, ते खरेखरेच असतात. निबंध लेखन आईने किंवा बाईंनी पढवलेले असू शकते. स्वप्नेच ती, बदलणारच. बदलली तर त्यासाठीचे शब्दांकन पुन्हा नव्याने केले तर त्याचा उपयोग होणारच की. खरे सांगायचे या पद्धतीत करिअरचे बव्हंशी प्रश्‍न सुटायला नक्की सुरुवात होत असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr shriram git