एनडीए निवड प्रक्रिया

Career
Career

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक 
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधील प्रवेशासाठी यूपीएससी-केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे ‘एनडीए’ परीक्षा वर्षभरातून दोन वेळा, एनडीए-१ एप्रिलमध्ये व एनडीए-२ नोव्हेंबरमध्ये घेतली जाते. ‘एनडीए’ची प्रवेश परीक्षा भारतीय लष्कर, नौदल व हवाईदलात रुजू होणाऱ्या इच्छुक उमेदवाराचे प्रवेशद्वार आहे. प्रथम किमान पात्रता गुणांसह पात्रता प्रवेश परीक्षेतून निवड व्हावी लागते व त्यानंतर एसएसबी-सर्व्हिस सिलेक्शन बोर्डास सामोरे जावे लागते.

एनडीए प्रवेश परीक्षा
वर्षातून दोनदा देशपातळीवर सुमारे ४० शहरांमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी राज्यातील मुंबई व नागपूर या परीक्षा केंद्रांचा समावेश असतो. परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येते.  

या परीक्षेसाठी दोन पेपर असतात. पहिला पेपर गणित विषयाचा १२० प्रश्‍नांचा, प्रत्येकी अडीच गुण असा तीनशे गुणांचा असून, दुसरा पेपर जनरल अॅबिलिटी टेस्ट-सामान्य क्षमता तपासणीचा, दीडशे प्रश्‍न, प्रत्येकी चार गुण असा सहाशे गुणांचा असतो. एकूण दोन्हीही पेपर ९०० गुणांचे असतात. 

दोन्ही पेपरसाठी प्रत्येकी अडीच तासांचा वेळ असतो. संपूर्ण परीक्षा ही बहुपर्यायी म्हणजेच चार पर्याय एक निवडा अशी असते. चुकीच्या उत्तरास प्रत्येक प्रश्‍नाच्या मार्कापैकी एकूण मार्कापैकी एक तृतीयांश गुण वजा केले जातात. 

गणित विषयासाठी अकरावी, बारावीचा अभ्यासक्रम; तर सामान्य क्षमता अध्ययन या पेपरमध्ये इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना व चालू घडामोडी इत्यादी विषय समाविष्ट असतात. 

देशभरातून सुमारे ४ ते साडेचार लाख विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिल्यानंतर त्यापैकी सुमारे पाच ते सहा लाख विद्यार्थ्यांना एसएसबी मुलाखतीसाठी निवडले जाते. एनडीए-१ साठी २०१९चा कट ऑफ ९०० पैकी ३४२, एनडीए-२ चा २०१८चा कट ऑफ ९०० पैकी ३२५ होता. प्रत्येक पेपरमध्ये कमीत कमी २५ टक्के गुण मिळवावेच लागतात. 

एसएसबी मुलाखत
सर्व्हिस सिलेक्शन बोर्डातर्फे घेण्यात येणारी ही मुलाखत दोन टप्प्यांत घेतली जाते. केवळ पहिला टप्पा पार करणारे विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यात भाग घेऊ शकतात. मुलाखत कालावधी सर्वसाधारणपणे पाच दिवस चालतो. 

एसएसबी- पहिला टप्पा - मुलाखतीच्या पहिल्याच दिवशी उमेदवारांना ओआयआरटी- ऑफिसर इंटेलिजन्स रेटींग टेस्ट आणि पीपीडीटी- पिक्चर पर्सेप्शन अॅण्ड डिस्क्रीप्शन टेस्ट क्लिअर करावी लागते. थोडक्यात ही स्क्रीनिंग टेस्ट असून यात बुद्धिमत्ता चाचणी, दिलेल्या चित्रावरून गोष्ट लिहिणे, त्यावर गटचर्चा करणे याचा समावेश असतो. या टप्प्यात अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी पुढील निवड प्रक्रियेतून बाहेर पडतात.

एसएसबी- दुसरा टप्पा - 
दुसऱ्या टप्प्यात वैयक्तिक मुलाखत, गटचर्चा व मानसशास्त्रीय चाचण्या यांचा समावेश असतो. चार दिवस चालणाऱ्या चाचण्यांमध्ये मुलाखत अधिकारी (आयओ) गटचाचणी अधिकारी (जीटीओ) आणि मानसशास्त्रज्ञ यांच्यातर्फे उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन केले जाते. या सर्व परीक्षेत सर्वांगिणदृष्ट्या उमेदवाराच्या कामगिरीचा विचार केल्यानंतरच परीक्षकाकडून गुण दिले जातात.

मानसशास्त्रीयमध्ये चित्रावरून गोष्ट लिहिणे, शब्दांवरून वाक्य तयार करणे, परिस्थितीतून मार्ग कसा काढणार ते लिहिणे व लेखी चाचणीचा समावेश असतो.

ग्रुप चर्चेत विविध सांघिक व वैयक्तिक चाचण्या, गटचर्चांचा समावेश असतो. वैयक्तिक चाचणीत दिलेल्या विषयावरून भाषण करणे. जमिनीवरील अडथळे पार करण्याचा समावेश असतो. - मुलाखतीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची काटेकोरपणे वैद्यकीय तपासणी सैनिकी रुग्णालयात केली जाते. ही प्रक्रिया देखील आठवडाभर चालते. 

लेखी परीक्षा व मुलाखतीच्या एकत्र गुणांच्या आधारावर राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता यादी तयार करण्यात येते. वैद्यकीय चाचणीत पात्र ठरलेल्या व बारावी उत्तीर्ण झालेल्या तरुणांना त्यांच्या गुणवत्ता यादीतील स्थानांनुसार आणि उपलब्ध होणाऱ्या जागांच्या आधारे प्रवेश दिला जातो. 

एनडीए २०१९चा अंतिम कट ऑफ १८०० पैकी ७०४, एनडीए२०१८-२ परीक्षेचा अंतिम कट ऑफ १८०० पैकी ६८८ होता.एनडीए -२ २०१९ ही लष्करासाठी १४४ वा कोर्स व नेव्हल अॅकॅडमीचा १०६ कोर्स असेल. एनडीए-१- २०२०चे ऑनलाइन अर्ज ८ ते २८ जानेवारी २०२०मध्ये उपलब्ध होत असून परीक्षा १९ एप्रिल रोजी होणार आहे. एनडीए २०२०-२ चे अर्ज १० ते २३ जून २०२० दरम्यान उपलब्ध राहणार असून परीक्षा ६ सप्टेंबर २०२० रोजी घेतली जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com