मनाचा आनंदी सूर्योदय...

रमेश सूद
Saturday, 16 November 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

व्यक्तिमत्त्व विकास - रमेश सूद, कोच, ट्रेनर, स्टोरी टेलर
दररोजचा सूर्योदय नवीन असतो. आपल्या मनात मात्र आदल्या दिवशीच्या नकोशा आठवणींची रात्र रेंगाळत असते. त्या दिवशी असेच झाले. मी उगवत्या सूर्याकडे पाहत होतो. उगवतीचे ते रंग मंत्रमुग्ध करत होते. पूर्व दिशेचे संपूर्ण आकाशच सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजळून निघाले होते.

अशा, स्वच्छ, प्रसन्न वातावरणात मी श्‍वासोच्छ्वास करत होतो. मी श्‍वास आत घेतल्यावर माझे हृदय म्हणत होते- आयुष्य खूप सुंदर आहे. तो सोडल्यावर ते मी आनंदी आहे, असेही सांगत होते. अशातच माझ्या मनात नकोशा विचारांनी प्रवेश केला. ‘नाही, तू आनंदी राहू शकत नाहीस. काल संध्याकाळची घटना तू कशी विसरू शकतोस? तुझ्या मित्राने काल किती चमत्कारिक प्रतिक्रिया दिली. त्यामुळे तुला आनंदी, उत्साही वाटण्याऐवजी राग यायला हवा. दु:ख वाटायला हवे.’ माझ्या मनाने आदल्या दिवशीच्या संध्याकाळच्या वेदना पुन्हा जागृत केल्या. आपल्या सुप्त मनाला कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय एक प्रकारचा मानसिक कचरा बाहेर टाकण्याची विचित्र सवय असते. मला तो साफ करण्याची गरज होती. त्यामुळे मी पुन्हा जागृत मनाकडे वळलो.

माझ्या हृदयाला मी पुनःपुन्हा सांगायला लावले- आयुष्य सुंदर आहे. मी आनंदी आहे. हा नवीन दिवस आहे. आयुष्य सुंदर आहे. मी आनंदी आहे. मला पुन्हा आनंदी, उत्साही वाटू लागले. या वारंवारच्या स्वयंसूचनेमुळे माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकले. सभोवतालची प्रत्येक वस्तू हसत आहे, असेही वाटू लागले. मी सकाळचा फेरफटका घेत होतो. मी चालत असताना ओक वृक्षाची पुढे आलेली फांदी जणू आशीर्वाद देत होती. मी भारावून गेलो. एखाद्या आजोबासारख्या वाटणाऱ्या त्या जुन्या वृक्षाला मी मिठीच मारली.

त्यानंतर मी वळलो. थोड्या वेळापूर्वी मला अस्वस्थ करणारी वेदनेची सावली आता अंधुक झाली होती. माझ्यापासून दूर जात होती. ती वितळत होती, एखाद्या वाफेप्रमाणे तिचे बाष्पीभवन होत होते, तसे मला स्वतंत्र, हलकेहलके वाटत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article ramesh sud edu supplement sakal pune today