ऑन एअर : हवा महल

RJ-Sangram
RJ-Sangram

फेसबुकआधी सार्वजनिक कार्यक्रमानंतर ‘हेच का ते रेडिओ जॉकी संग्राम,’ असे प्रसंग यायचे. आता हॉटेलात येतात. 

उद्याच्या उद्याच डाएट सुरू करायचं म्हणून मी बटर चिकनबरोबर बटर नान मागवलेलं असतं. दोन्ही हातांनी नान तोडत, दोन्ही जबड्यांमध्ये मोठमोठाले घास ठोसत असतो. तेवढ्यात वेटरची सावली माझ्या डिशमध्ये पडते. मी वर न बघता डाफरतो, ‘और कांदा लाव, रोटी रिपीट करो आणि ते डाळ फ्राय राइस लवकर आण रे!’ 
‘Yes Sir!’ हे अपेक्षित उत्तर येत नाही. उलट खूप गोड असा बाईचा आवाज असतो - ‘Excuse Me - RJ संग्राम ना?’ 

कांदा, बटर चिकन, नान आणि लोणच्याचा बनवलेला परफेक्ट प्रमाणातला घास न चावताच गिळतो. माझ्या अनेक कौशल्यांपैकी, अचूक घास बनवणं हे एक महत्त्वाचं कौशल्य आहे. 

आवाज पुरुषाचा असता, तर मी भरल्या तोंडानं अर्धभरल्या पोटातल्या भावना, म्हणजे, ‘अहो हो, पण खातोय ना मी!’ या एका लूकमध्येच व्यक्त केल्या असत्या. समाज पुरुषप्रधान असला तरी माझ्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. 

तोंड पुसत पुसत मान वर करून मिश्या सावरत स्माइल देतो. आवाजाएवढ्याच बाईसुद्धा गोड असतात. ‘मी तुम्हाला रोज सकाळी ऐकते! आणि माझा मुलगा तुमचा खूप मोठा फॅन आहे.’ दोन-तीन टेबल पलीकडं बोट दाखवत बाई माझ्याहून मोठी स्माइल देत म्हणतात. 

लाजत उभा तिचा नवरा आणि त्याच्या मागं लपून माझ्याकडं एकटक बघणारा तिचा मुलगा पाहून माझ्या भुवया उंचावतात. कपाळाला आठ्या पडू नयेत म्हणून माझ्या बॉडीनं घेतलेली ही खबरदारी असते. यालाच शारीरिक हजरजबाबीपणा की काय ते म्हणतात. ही अथांग तपश्‍चर्येनंतर अवगत झालेली कला आहे. तुम्ही रियाजाशिवाय असे करायचा प्रयत्न टाळा. नाहीतर चेहऱ्यावर नुसतेच गोंधळलेले भाव दिसतील. 
बायका मुलाला हातवाऱ्यानं आणि नवऱ्याला डोळ्यांच्या इशाऱ्यानं बोलवतात. दोघंही पुण्यातल्या गल्लीतून वाट काढत येणाऱ्या टू-व्हीलरवाल्यांसारखे टेबल, खुर्च्या, वेटर आणि इतर ग्राहकांना चुकवत येतात. अर्धसंश, ओळख बघू कोण आहे हे? तू रोज सकाळी ऐकतोस ना त्यांना रेडिओवर! 

अर्धसंश - हे त्याचं नाव असावं असा माझा तर्क आहे. ठामपणे सांगता येत नाही. आजकालच्या मराठी मुलांची नावं ही आर्यवर्धक असली, तरी उच्चारवर्धक नाहीत. 
‘हा तुमची हुबेहूब नक्कल करतो. नॉनस्टॉप बडबड करतो. यालासुद्धा रेडिओ जॉकी बनवायचंय. तुमचा गायडन्स मिळाला तर खूप बरं होईल. तुम्ही क्लासेस वगैरे घेता का? ये बेटा अंकलबरोबर फोटो काढूया. सर प्लीज हा, एक फोटो.’ मी काही बोलायच्या आत ती आपल्या त्या प्याद्यानं रेडिओच्या या राजाला चेक देते. 

‘याला काय काय तयारी करायला हवी, क्वालिफिकेशन काय लागतील, क्लासेस कुठं लावायचे, खरंच यात करिअर करता येईल का, हा पार्टटाइम असतं की फुलटाइम जॉब असतो, तुमची स्क्रिप्ट तुम्हीच लिहिता का टीम असते? सर, प्लीज तुमचा नंबर मिळंल का, म्हणजे आपण आरामात बोलू... तुमच्या डिनरमध्ये डिस्टर्ब नको व्हायला....’ 

पुन्हा माझ्या बटर चिकन साधनेच्या वेळेत बाधा येऊ नये म्हणून या सदरात मी या सगळ्या प्रश्‍नांची उत्तर द्यायचं ठरवलं आहे. 

होय, हे काम पार्टटाम नसून, पूर्णवेळ पीएफ, ग्रच्युईटी, पगारी सुट्ट्या, अटेन्डन्स आदी असलेली कॉर्पोरेट नोकरी आणि करिअर आहे! कुठल्याही रेडिओ स्टेशनचा (चॅनेल) आवाज किंवा चेहरा माझ्यासारखे रेडिओ जॉकी असले, तरी पडद्यामागची टीम तितकीच महत्त्वाची असते. सेल्स, मार्केटिंग, अकाउंट्‍स, ॲडमिन, एचआर, हाउसकीपिंग आणि क्रिएटिव्हमधले कॉपीरायटर, प्रोमो प्रोड्यूसर, शो प्रोड्यूसर, प्रोग्रॅमिंग हेड आणि अर्थात रेडिओ जॉकी अशी अख्खी यंत्रणा मिळून तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. 

येत्या काही दिवसांत आपण या सगळ्या प्रोफाइलची चर्चा करणार आहोत. तोपर्यंत तुमचे प्रश्‍न, शंका, प्रतिक्रिया आणि बटर चिकनच्या रेसिप्या मला फेसबुक https://www.facebook.com/RJMahaSangram/ वर मेसेज करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com