ऑन एअर - शुभ बोल मेल्या!

आर. जे. संग्राम, ९५ बिग एफ. एम
Thursday, 2 April 2020

सर्वांनी ३१ मार्चपर्यंत कुटुंबीयांशी/रूम मेट्सशी काय गप्पा मारायच्या याचं नियोजन अनेकांनी करून ठेवलं होतं. आता आणखी १४ दिवस नजर कैदेत राहायचं म्हणजे विषय कमी पडणार या भीतीत सुज्ञ मंडळी आहेत. मी तुम्हाला गप्पा मारण्यासाठी काही विषय सुचवतो.

सर्वांनी ३१ मार्चपर्यंत कुटुंबीयांशी/रूम मेट्सशी काय गप्पा मारायच्या याचं नियोजन अनेकांनी करून ठेवलं होतं. आता आणखी १४ दिवस नजर कैदेत राहायचं म्हणजे विषय कमी पडणार या भीतीत सुज्ञ मंडळी आहेत. मी तुम्हाला गप्पा मारण्यासाठी काही विषय सुचवतो.

गेली १५ वर्षं डाएटवर असल्यामुळंच माझं वजन कमी होत नाहीये, असं डॉक्टरांनी मला सांगितलंय. हे त्यांचे शब्द मी मरेपर्यंत विसरणार नाही. डाएट याचा अर्थ डाय- ईटिंग, म्हणजेच खाऊन खाऊन मरा असा होते, असं मोठ्या बहिणीनं ती मेडिकल कॉलेज आणि मी अकरावीत असताना सांगितलं होतं. मोठी भावंडं आयुष्याच्या संध्येत सगळ्यात मोठा आधार बनतात (अर्थात वडिलोपार्जित इस्टेट फार नसेल तर). डोन्ट टेल मी तू असं चक्क रेडिओवर बोललास!’ असा संवाद आमच्याकडं अधूनमधून होतो. मीही ती परंपरा माझ्या धाकट्यांबाबतीत सुरू ठेवलीये. लहान मुलं आणि खास करून भावंडं एका विशिष्ट वयात मृत्यूबद्दल खूप बोलतात. तुमचं वय कितीही असो, दोन मिनिटं मला मोठा भाऊ किंवा बहिण समजा आणि लक्ष देऊन वाचा. आपल्या पालकांची प्रतिक्रिया ‘शुभ बोल मेल्या’ ते ‘बाळा तुला नाही कळायचं,’ किंवा ‘देवाला भेटायला गेले,’ या दोन टोकाच्या असतात. मी आज एका वेगळ्याच विषयाला हात घालणार आहे. भारतात दरवर्षी किती लोक मृत्युमुखी पडतात? कधी विचार केलाय?

दीड लाख रस्त्यावर अपघातात जातात. सगळे अपघात मिळून ४ लाख मृत्यू, २०१६मध्ये २.३ लाख भारतीयांनी आत्महत्या केली, तर दरवर्षी तीस-चाळीस हजार लोकांचा खून होतो. भारतात २०१८मध्ये जवळजवळ ८ लाख बालमृत्यू (५ वर्षाखालील) झाले. किती झाली बेरीज आत्तापर्यंत? वृद्धावस्था आणि आजार, कर्करोग, एड्ससारखे ग्लॅमरस आणि मधुमेह, हृदयविकारासारखे सामान्य हे सगळे राहिलेच की! ‘कोविड १९’ सोडून इतर इन्फ्लुएंझानेही लाखो लोक दर वर्षी मरतातच की! दरवर्षी भारतात सुमारे ९४ लाख मृत्यू होतात. म्हणजे रोजचे २६,०००! तोच आकडा अमेरिकेत २८ लाख आहे. म्हणजे दिवसाला ८ हजार. आकडे आहेत, उन्नीस बीस असणारच. भारताचे ढोबळ आकडेही डेडली आहेत. माझे मित्र सलील कुलकर्णी यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाचा दुसरा भाग म्हणून ‘मरणावर बोलू काही’ काढायचा माझा विचार आहे. पण एखादा लाइव्ह इव्हेंट करायचा म्हणजे खूप मर-मर करावी लागते, असं ऐकलंय.

त्यापेक्षा घरीच बोलूया. आपण यंदाच्या कोरोनात गेलो किंवा वरील नमूद केलेल्या इतर रुटीन साथीत गेलो, तर काय होईल? घरच्यांनी काय करावं, करू नये?  ई-मेल, फोन स्क्रीन लॉक, लॅपटॉप, नेट बँकिंगचे पासवर्ड काय आहेत? मृत्युपत्र कितव्या वर्षी बनवावे? आणि कसे? घरातल्या तरुणांना आणि खास करून महिलांना दुनियादारी जमत नाही, त्यांना कागदपत्र समजणार नाहीत ही भूमिका बदलायला हवी. याची सुरुवात म्हणजे सगळ्यांनी ‘मृत्यू की बात’ केली पाहिजे - कितीही अस्वस्थ वाटलं तरी, कितीही अशुभ वाटलं तरी.

ता. क. - ‘मरणाची गर्दी’ म्हणणं सध्या भलतंच अर्थपूर्ण झालं आहे, पण तो मोह टाळावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article rj sangram on air