ऑन एअर : तुम्हाला RJ व्हायचंय?

RJ
RJ

कुठलाही मोठा निर्णय घेताना किंवा ध्येय ठरवताना आधी पुढील प्रश्‍नांची उत्तरं देणं महत्त्वाचं ठरतं -

का? कशासाठी? कोणासाठी? कधी? कुठे? कोणाबरोबर? 
ध्येय कुठलंही असो - प्रश्‍न हेच. अगदी नोटाबंदी, नसबंदी, नशाबंदीपासून रविवारी बाहेर खायला जावं की नाही, पर्यंतचे सगळेच निर्णय या भिंगातून बघितल्यास नंतर प्रचंड ऊर्जा, वेळ, पैसा वाचू शकतो. 

ही उत्तरं मिळाल्यावर पुढच्या प्रश्‍नांकडं वळावं - कसं? अनेकदा आपण थेट ‘कसं’वर लक्ष केंद्रित करतो आणि बाकीच्या प्रश्‍नांची उत्तरं महत्त्वाची नाहीत किंवा आधीच दिलेली आहेत, असं गृहीत धरतो. मात्र, चिंतनाअभावी ही उत्तरं उथळ राहतात/असतात.

RJgiri करायच्या प्रेरणेचे प्रकार
1) त्यात काय!

‘नुसत बोलायचं तर असतं. त्यात काय एवढं?’
काम प्रचंड सोपं आहे आणि बरोबर ग्लॅमरही आहे! असं समजून आलात तर मोठा अपेक्षाभंग होईल. इतर क्षेत्रांपेक्षा मीडियामध्ये ग्लॅमर, सेलिब्रिटी फॅक्टर वगेरे थोडा जास्त आहे, पण म्हणजे काय काम सोपं असतं असं नाही.

टीव्हीवर तेंडुलकरची बॅटिंग सुरू असते. ओव्हरभर धोपटल्यामुळं बोलर स्वतः आपली ओव्हर कधी ‘ओव्हर’ होती आहे, याची वाट बघत असतो. शेवटच्या बॉलवर सचिन सुंदर कव्हर ड्राइव्ह मारून ४ धावा मिळवतो आणि स्ट्राइक गमावून बसतो. आपल्याला त्याच्यासारखी नाही, मात्र एखाद्या रणजी बॅट्समन एवढी तरी बॅटिंग नक्कीच येते, हा आत्मविश्‍वास असतो; पण यात दोष आपला नसून सचिनचा आहे. तो इतक्या सहज खेळतो की बघणाऱ्याला ते सोपं वाटतं. अवघड गोष्ट इतक्या सफाईनं करायला तपश्‍चर्या लागते.

2) बोल बेबी बोल!
‘आमची आर्यू खूप बडबड करते. अगदी नॉन स्टॉप!’
बडबड : चांगला RJ हा एक मोठा गैरसमज आहे. मी तासाला ४ वेळा बोलतो. प्रत्येकी दीड ते दोन मिनिटे. म्हणजे साधारण ४ तासांच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त २८ मिनिटे. त्यात तुमचे कॉल्स, तज्ज्ञ आणि तारकांच्या मुलाखती, म्हणजे मी स्वतः १५ मिनिटे बोलतो. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती पोचवणं आणि समोरच्याला बोलत करणं, हे कौशल्य महत्त्वाचं!

3) आवाज कोणाचा?
‘माझा आवाज चांगला, गोड/बच्चन टाइप आहे!’
जितका चांगला आवाज तितका यशस्वी RJ. हे म्हणजे जितका देखणा माणूस तेवढाच यशस्वी अभिनेता असं म्हण्यासारखं आहे. खूपच अप्रतिम, वेगळा आवाज असला तर तो तुमच्या जमेची बाजू होतो, पण इतरांपेक्षा, केवळ १० टक्के जास्त. इतर म्हणजे ज्यांचे आवाज साधारण आहेत, अजिबात ऐकूच नयेत, असे नाहीत. आवाजाच्या गुणवत्तेपेक्षा तुम्ही तो कसा वापरताय - फेक, चढ-उतार, अस्खलितपणा? तुमच्या आवाजात (म्हणजे तुमच्यातच!) आत्मविश्‍वास आहे का? 
आणि शेवटी, तुम्ही कसं म्हणताय यापेक्षा काय म्हणताय हे महत्त्वाचं, हे जरी अनेक वेळा लौकिकदृष्ट्या खरं नसलं तरी आपण असं धरून चालूया.
मग नेमकं कुठल्या निकषांवर आपली पात्रता ठरवायची? हे आपण बघूया पुढच्या वेळी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com