जपान आणि संधी : असा करा जपानमध्ये व्यवसाय

सुजाता कोळेकर
Thursday, 9 July 2020

आपण करत असलेल्या व्यवसायाची संपूर्ण माहिती असावी. मिटिंगमध्ये आधी समोरच्या व्यक्तीची मते शांतपणे ऐकून घ्यावीत. आपल्या बोलण्यातून व्यवसायाशी निगडित असणारा आपला व्यासंग सगळ्यांना लक्षात यावा. व्यवसायाचा दृष्टिकोन नीट सांगता यायला हवा. कोणताही व्यवसाय हा दीर्घकालीन चालेल असाच असावा.

  • व्यावसायिक दृष्टिकोन - आपण करत असलेल्या व्यवसायाची संपूर्ण माहिती असावी. मिटिंगमध्ये आधी समोरच्या व्यक्तीची मते शांतपणे ऐकून घ्यावीत. आपल्या बोलण्यातून व्यवसायाशी निगडित असणारा आपला व्यासंग सगळ्यांना लक्षात यावा. व्यवसायाचा दृष्टिकोन नीट सांगता यायला हवा. कोणताही व्यवसाय हा दीर्घकालीन चालेल असाच असावा. 
  • ग्रुप संस्कृती - जपानमध्ये असे म्हटले जाते की, ‘एक बाण लगेच तुटू शकतो; मात्र १०० बाण एकत्र असतील तर तुटू शकत नाहीत.’ म्हणजेच, कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळवायचे असल्यास चांगली टीम असणे गरजेचे आहे. जपानमध्ये एकटी व्यक्ती व्यवसाय करताना दिसत नाही आणि कोणताही निर्णय घेताना संपूर्ण टीमचा विचार केला जातो.
  • बिझनेस कार्ड - जपानमध्ये बिझनेस कार्डला प्रचंड महत्त्व आहे. बिझनेस कार्डची देवाणघेवाण करताना काही नियम कटाक्षाने पाळावे लागतात. तुमच्या कार्डवर एका बाजूला जपानी भाषेमध्ये माहिती असावी आणि कार्ड देताना तीच बाजू वर असावी. बिझनेस कार्ड हे दोन्ही हातानीच घ्यावे, त्यावरील महत्त्वाच्या गोष्टी वाचून झाल्यावर ते आपल्या बिझनेस कार्डच्या वर ठेवावे, मिटिंग सुरू असताना पूर्ण वेळ ते समोरच ठेवावे. 
  • उत्पादनाची किंवा सेवेची माहिती - आपल्या उत्पादनाची किंवा सेवेची माहिती ही खूप सखोल आणि प्रेरणादायक पद्धतीने मांडलेली असावी. आपले उत्पादन हे कसे टिकावू आहे, ते समजून सांगितलेले असावे. फक्त विक्री व्हावी अशी इच्छा न ठेवता गिऱ्हाइकांबरोबर संबंध खूप दिवस टिकावेत या दृष्टीने प्रयत्न करावा. विक्री किंवा सेवा यापेक्षा संबंध महत्त्वाचे आहेत, असे सादरीकरण असावे.
  • वयाला मान - जपानमध्ये वयाप्रमाणे पद ठरते, त्यामुळे वयाला योग्य मान द्यावा लागतो. निक्केई (NIKKEI  225 INDEX ) सर्व्हेप्रमाणे जपानमधील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे साधारण वय ६२ वर्ष आहे. आपल्या उत्पादनाचे सादरीकरण करताना ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवावी. आपले सादरीकरण सुरू करण्यापूर्वी वयाने मोठ्या असणाऱ्या सर्व व्यक्तींना योग्य अभिवादन करणे आवश्यक आहे.
  • गोपनीयता - जपानमध्ये गोपनीयता खूपच महत्त्वाची आहे. लोकांना हवे असल्यास ते फोनच्या डिरेक्टरीमधून आपले नाव काढून टाकू शकतात. आपण पहिल्या भेटीमध्ये काही वैयक्तिक प्रश्‍न विचारून जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो, असे जपानमध्ये करून चालत नाही. कुठलेही वैयक्तिक प्रश्‍न खूप ओळख झाल्याशिवाय विचारू नये. व्यावसायिक मिटिंगमध्ये अशा प्रकारे प्रश्‍न कधीही विचारू नयेत.
  • चॉपस्टिक मॅनर्सस - व्यावसायिक मिटिंग जेवणाच्या वेळेत असल्यास चॉपस्टिक कशा वापरायचा योग्य अभ्यास करावा.
  • वेशभूषा - योग्य प्रकारचे कपडे परिधान करावेत. 

मी एका सिनिअर मॅनेजमेंटच्या मिटिंगमध्ये असताना एक युरोपीअन डायरेक्टर एअरपोर्टवरून साध्या वेशात मिटिंगमध्ये आले. ते येताच क्षणी आमच्या एच. आर. मॅनेजरने मिटिंग रद्द केली आणि त्यांना कपडे बदलण्यासाठी एक तासाचा वेळ दिला. मॅनेजमेंटमधील सगळ्या लोकांचा वेळ अमूल्य असूनही असा निर्णय घेण्यात आला, याचे एकमेव कारण म्हणजे जपानी लोक हे वेशभूषेला अनन्यसाधारण महत्त्व देतात. 
जपानमध्ये व्यवसाय करायचा असेल किंवा उच्चपदस्थ नोकरी करायची असल्यास वरील सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article sujata kolekar on japan and chance

Tags
टॉपिकस
Topic Tags: