esakal | जपान आणि संधी : हिरागाना, काताकाना, कांजी!
sakal

बोलून बातमी शोधा

Japan-Language

अनेक लोक मला विचारतात की, मी जपानी भाषा शिकायला कशी सुरुवात केली, तेव्हा मला कुणी मार्गदर्शन केले होते? मी डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला असताना फावला वेळ योग्य रीतीने कसा वापरायचा याचा विचार करत होते. त्याचवेळी मैत्रिणीबरोबर पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमध्ये गेले होते. जपानी भाषेची लिपी चित्रमय आहे हे एका नोटीस बोर्डवर पहिले आणि विचार केला, की माझी चित्रकलेची आवडही भाषा शिकताना पूर्ण होईल बहुतेक.

जपान आणि संधी : हिरागाना, काताकाना, कांजी!

sakal_logo
By
सुजाता कोळेकर

अनेक लोक मला विचारतात की, मी जपानी भाषा शिकायला कशी सुरुवात केली, तेव्हा मला कुणी मार्गदर्शन केले होते? मी डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला असताना फावला वेळ योग्य रीतीने कसा वापरायचा याचा विचार करत होते. त्याचवेळी मैत्रिणीबरोबर पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमध्ये गेले होते. जपानी भाषेची लिपी चित्रमय आहे हे एका नोटीस बोर्डवर पहिले आणि विचार केला, की माझी चित्रकलेची आवडही भाषा शिकताना पूर्ण होईल बहुतेक.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यावेळी या भाषेमुळे मला जपानला जाण्याची संधी मिळेल किंवा नोकरीमध्ये विशेष काही करता येईल, असा विचार मनात मुळीच आला नव्हता. भाषा ही स्वच्छंदपणे शिकायला हवी, म्हणजे तिची गोडी निर्माण होते. मी भाषा शिकायला सुरुवात केल्यानंतरही बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कारणाने व्यत्यय आला, परंतु जमेल तसे मी शिकत राहिले.

जपानी भाषेमध्ये तीन लिपी आहेत
हिरागाना 

यामध्ये मूळचे जपानी भाषेतील शब्द लिहिले जातात.

काताकाना 
यामध्ये जपानला जे परदेशी शब्द आहेत ते लिहिले जातात. म्हणजे मराठीमध्ये जसे टेबल, टीव्ही  शब्द आहेत तसे. या दोन्ही लिपीमध्ये ४६ अक्षरे आहेत आणि तीही सुंदर आहेत. सुंदर म्हणजे ही अक्षरे काढताना आपण असा विचार केला की आपल्या हातात ब्रश आहे तर कॅलिग्राफी केल्यासारखा अनुभव नक्की मिळतो. हिरागाना आणि काताकाना हे सुरुवातीलाच शिकावे लागते. 

कांजी 
याला मुळातच चित्रलिपी असे म्हणतात. ही चित्रे काढायलाही आणि अर्थ लावायलाही मजा येते. मजेबरोबर ही अक्षरे लक्षात ठेवायला थोडे कठीण जाते परंतु एकाच अक्षरात बराच अर्थ असतो आणि ही गंमत समजून घेतल्यास भाषेमधील रुची वाढत जाते. साधारण १५० कांजी या बेसिक म्हणजे एन-५ लेव्हलसाठी शिकाव्या लागतात.

काही जण खूप विचार करतात की ही भाषा शिकून कशा प्रकारची नोकरी मिळेल, पगारात किती वाढ होईल वगैरे. मी इतकेच म्हणेन ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.’  काही विद्यार्थी विचारतात की, जपानी भाषा यू-ट्यूब, व्हॉटस्ॲप अशा माध्यमांतून शिकता येऊ शकते का? भाषा ही मुळातच संवादाने शिकता येते. भाषा लिहिता वाचता आली आणि बोलता नाही आल्यास त्याचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे कोणतीही भाषा वर्गातच शिकावी, मग तो वर्ग ऑनलाइन असेल किंवा अगदी शिक्षकांसमोर बसून असेल. भाषा शिकताना केलेल्या चुका शिक्षक समजून सांगतात तेव्हा खूप काही शिकायला मिळते आणि ती गोष्ट आयुष्यभर लक्षात राहते. त्याचबरोबर वर्गमित्रांच्या सोबत केलेल्या गमतीजमती याही बरेच काही शिकवून जातात.

जपानी भाषेचे व्याकरण मराठी भाषेसारखेच आहे आणि ते जुळवून घेताना वर्गात खूप मस्त गोष्टी घडतात आणि या आठवणी म्हणजे आयुष्यभराचा ठेवा असतो. या गोष्टी अगदी ऑनलाइन, स्काईप, गुगल मीट अशा प्रकारच्या वर्गातही घडू शकतात. त्याबरोबर भाषा शिकणारे समविचारी मित्र-मैत्रिणी भेटतात ही जमेची बाजू आहे. जपानी भाषेमध्ये खूप संधी आहेतच, परंतु आधी आवडीने भाषा शिकायला सुरुवात करायला हवी. त्याची सुरुवात एन-५ लेव्हलने करावी लागते.

Edited By - Prashant Patil