संधी नोकरीच्या : ‘प्रोजेक्ट्स’मधून रचला यशाचा पाया!

डॉ. शीतलकुमार रवंदळे
Thursday, 3 December 2020

अभियांत्रिकीच्या चार वर्षांच्या शिक्षणादरम्यान अभ्यासक्रमातील एखाद-दुसरा प्रोजेक्ट विद्यार्थी करतात, मात्र नवीन सिंगने लहान-मोठे सुमारे १० चांगले प्रोजेक्ट विद्यार्थिदशेतच केले होते. त्यामुळे उत्तम तांत्रिक ज्ञानाच्या जोरावर त्याची कोअर ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्समध्ये जगभर प्रसिद्ध असलेल्या केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीत कॅम्पस प्लेसमेंटमधून २०१५मध्ये निवड झाली होती.

अभियांत्रिकीच्या चार वर्षांच्या शिक्षणादरम्यान अभ्यासक्रमातील एखाद-दुसरा प्रोजेक्ट विद्यार्थी करतात, मात्र नवीन सिंगने लहान-मोठे सुमारे १० चांगले प्रोजेक्ट विद्यार्थिदशेतच केले होते. त्यामुळे उत्तम तांत्रिक ज्ञानाच्या जोरावर त्याची कोअर ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्समध्ये जगभर प्रसिद्ध असलेल्या केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीत कॅम्पस प्लेसमेंटमधून २०१५मध्ये निवड झाली होती. या सहा महिन्यांच्या प्रशिक्षणात एम्बेडेड प्रोग्रामिंग, इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर, ऑटोसार संगणकप्रणाली, संवादकौशल्य यांसारख्या विषयांत कंपनीने त्याला पारंगत केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवीनला प्रशिक्षणानंतर लगेचच मिसाइल सिस्टिमसारख्या उच्चदर्जाच्या तांत्रिक प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळाली. केपीआयटी कंपनीत असताना एकाच वेळी दोन प्रोजेक्ट केल्यामुळे त्याला ‘गो गेटर अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. नवीनने २०१५ ते २०१९ पर्यंत केपीआयटी टेक्नॉलॉजी या कंपनीत डिझाईन इंजिनिअर म्हणून उत्तम काम केले. आजदेखील तो नामांकित अशा इटन इंडिया इनोव्हेशन सेंटर, पुणे येथे हार्डवेअर डिझाईन इंजिननिअर म्हणून कार्यरत आहे. नेहमीच वेगवेगळे प्रोजेक्ट्स करण्याची आवड असल्यामुळे अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षापासूनच तो रोबोकॉन स्पर्धेकडे आकर्षित झाला. तेव्हापासून शेवटच्या वर्षापर्यंत तो महाविद्यालयातील रोबोकोन टीमचा सदस्य राहिला. अंतिम वर्षात रोबोकॉन टीमचा तो उपकप्तानदेखील होता. 

रोबोकॉनमुळे विकसित कौशल्ये 
व्यवस्थापन कौशल्ये 

  • टीम मॅनेजमेंट 
  • ग्राहकाची व प्रोजेक्टची गरज नीट समजून त्यानुसार उपाय शोधणे. 
  • लीडरशिप
  • काही महिन्यांची मेहनत काही मिनिटांत सादर करणे (रोबोकॉन स्पर्धेमध्ये ७-८ महिने केलेली तयारी ३-४ मिनिटांत रोबोच्या माध्यमातून दाखवावी लागते.)

तांत्रिक कौशल्ये 

  • इलेक्ट्रॉनिक्समधील डिझाइन व डेव्हलपमेंट 
  • प्रोग्रामिंग 
  • सिस्टिम लेव्हलचे ज्ञान
  • अभियांत्रिकीच्या सर्व शाखांचे संलग्नीकरण (मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स व प्रोग्रामिंगचे एकत्रित ज्ञान )
  • अभ्यासक्रमाबाहेरचे वापरण्यात येणारे तांत्रिक ज्ञान

नवीनचे वडील इंडियन आर्मीमध्ये कॅप्टन या पदावर कार्यरत होते. त्याची आई गृहिणी आहे. नवीनचा भाऊ अमेरिकेत सध्या डेटा सायन्स विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. नवीनला तीन बहिणी आहेत त्यातील एक बहीण सीए करत आहे, दुसऱ्या बहिणीचे बीई कॉम्प्युटरमध्ये झाले आहे व ती सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये काम करत आहे, तर तिसरी बहीण सरकारी शाळेमध्ये शिक्षक आहे.

नवीनचे शालेय व माध्यमिक शिक्षण खडकीतील केंद्रीय विद्यालयात झाले, तर पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. नवीन इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षापासूनच विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत होता. त्याने प्रथम वर्षात कॉम्प्रेसड एअर इंजिनचे प्रोटोटाइप बनविले होते. द्वितीय वर्षापासून रोबोकॉन, लॅपटॉप रिपेअरिंग कोर्स यासारख्या अनेक उपक्रमांत तो सहभागी होता. तिसऱ्या वर्षात असताना त्याने त्याच्या ज्युनिअर विद्यार्थ्यांसाठी एम्बेडेड सिस्टिम्स या विषयावर विविध सेशन्स घेतले. इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात त्याने व्हॉलीबॉल खेळामध्ये कॉलेजचे युनिव्हर्सिटी स्तरावर, तर बास्केटबॉल खेळामध्ये इंटरकॉलेज स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी संदेश 
विद्यार्थ्यांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुस्तकी ज्ञानासोबतच विविध तांत्रिक, तसेच अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, याचा विचार तिसऱ्या वर्षात असतानाच करावा. अनेक विषयांचे  थोडे-थोडे ज्ञान मिळवण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी कुठल्यातरी एका विषयामध्ये विशेष प्रावीण्य मिळवणे गरजेचे आहे.

महाविद्यालयांनी हे करावे...
नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश महाविद्यालयीन अभ्यासक्रमात करावा.  उदाहरणार्थ Drone Building, Application Robotics, IoT अशा विविध तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी उपयोग होतो. आज तंत्रज्ञानाच्या जगात इंटिग्रेटेड चिप्सच्या माध्यमातून बऱ्याचशा मानवी तांत्रिक गोष्टींना रोबोटिक्ससारख्या तंत्रज्ञानाने व्यापले आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रोजेक्ट्स व त्यातील सारांश हा पुढील वर्षातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देऊन त्यात त्यांना बदल करून देण्याची संधी देण्यात यावी.

नवीन सिंगच्या भविष्यातील योजना 
आपल्या देशाला आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने एखाद्या तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्याचे त्याचे स्वप्न आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Dr Shitalkumar Ravandale on job Opportunity