एक ‘आहे’ कार्व्हर

वीणा गवाणकर लिखित ‘एक होता कार्व्हर’ हे मराठी साहित्यातील अजरामर पुस्तक प्रत्येकाने एकदा तरी वाचायलाच हवं.
ek hota carver book
ek hota carver booksakal
Updated on

एखादं पुस्तक आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकू शकतं, याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी वीणा गवाणकर लिखित ‘एक होता कार्व्हर’ हे मराठी साहित्यातील अजरामर पुस्तक प्रत्येकाने एकदा तरी वाचायलाच हवं.

आपण बऱ्याचदा आपल्या अपयशाचं खापर परिस्थितीवर फोडतो, परंतु आपल्यासमोर दोनच पर्याय उपलब्ध असतात. एक म्हणजे नशिबाला आणि परिस्थितीला दोष देत अपयशाला सामोरं जायचं किंवा दुसरा पर्याय म्हणजे कठोर मेहनतीने परिस्थिती अनुकूल करून घेत आपलं उज्ज्वल भवितव्य घडवायचं. यातील दुसरा पर्याय निवडलेल्या एका कृष्णवर्णीय शास्त्रज्ञाचं चरित्र म्हणजे एक होता कार्व्हर!

अमेरिकेत कृष्णवर्णीयांना गुलाम म्हणून वागवलं जात असे आणि त्यांची विक्री केली जात असे. त्या काळात उत्तर अमेरिकेतल्या कुठल्याशा एका पाड्यावर जन्मलेलं एक कृष्णवर्णीय अशक्त पोर. त्याची दोन भावंडं आणि आई यांच्यासह एका दांपत्याने त्यांना विकत घेतलं. त्या मुलाचं नाव त्यांनी जॉर्ज असं ठेवलं.

जन्माला आल्याच्या दुसऱ्या महिन्यापासूनच जॉर्जच्या आयुष्यातील संघर्षाला सुरुवात झाली. परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असली तरीही कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जॉर्जच्या अंगी शिकण्याची जिद्द होती. त्यामुळे अगदी लहान वयापासून स्वकमाईने जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर उच्च शिक्षण पूर्ण करत संशोधन क्षेत्रात अलौकिक कामगिरी केली.

या संपूर्ण जीवन प्रवासात कृष्णवर्णीय असल्याने अनेक प्रसंगात मिळालेली अपमानास्पद वागणूक, शोषण कार्व्हर यांनी अनुभवलं. परंतु, समाजानं केलेल्या अपमानाची आणि अन्यायाची परतफेड कार्व्हर यांनी पुढील अनेक पिढ्यांना उपयोगी ठरेल अशा संशोधनाद्वारे केली. या लोकोत्तर व्यक्तीचं चरित्र, लेखिका वीणा गवाणकर यांनीही तितक्याच समर्थपणे साकारलं आहे. या पुस्तकातील भाषा इतकी ओघवती आहे की, आपण नकळतच चरित्रनायकाबरोबर त्याच्या सुख-दुःखात सहभागी होतो.

कार्व्हर यांनी दारिद्र्याचे दशावतार पाहिले, पण कोणत्याही परिस्थितीत जिद्द सोडली नाही. त्यांनी केलेले कार्य ध्रुव ताऱ्यासारखं आजही अनेकांना जगण्याची वाट दाखवत आहे. समाजानं केलेल्या अन्यायाची परतफेड उपकारानं करणाऱ्या त्यांच्या हृदयाची विशालता आपल्यात येण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवं! कधी आपण स्वतः अपयशानं खचून गेलो तर, ‘ते बघ, तो आहे ना कार्व्हर! त्याच्यासारखंच आपल्यालाही उत्कट जगायचं आहे’, असा आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवं!

(संकलन - रोहित वाळिंबे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com