तालीम संच तयार करण्यातील व्यवसायसंधी

आशिष तेंडुलकर
Thursday, 27 February 2020

तालीम संच आपल्याला एखाद्या चित्रातील किंवा छायाचित्रातील गोष्टी शोधण्याच्या कामात, संगणकाला पर्यवेक्षी शिक्षण देण्यात फार मोलाची मदत करतो. अशी अजून उदाहरणे तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा आणि पाहा, की तालीम संच बनवण्यासाठी काय काय करावे लागेल.

मागील भागामध्ये आपण पर्यवेक्षी शिक्षण या साधन शिक्षणाच्या शाखेविषयी चर्चा केली होती. या शाखेमध्ये तालीम संचाला महत्त्व आहे. आता हे तालीम संच कोण आणि कसे तयार करतो. हे आपण या लेखात पाहूया. सर्वप्रथम आपण एक उदाहरण घेऊ : समजा आपल्याला संगणकाला भारतीय पत्त्यांची फोड करायला शिकवायचे आहे. म्हणजे भारतीय पत्ता दिला की त्यातून पिनकोड, गाव किंवा शहराचे नाव, उपनगर, रस्त्याचे नाव, सदनिकेचे नाव आणि क्रमांक संगणकाच्या माध्यमातून आपोआप वेगळे होतील. आता हा पत्ता : आर्यभट-पिंगळा, ९ अ/१२, काशीबाई खिलारे मार्ग, एरंडवणे, पुणे-४११  ००४ असा काहीसा वेगळा होईल : इमारतीचे नाव : आर्यभट-पिंगळा, क्रमांक : ९ अ/१२, रस्त्याचे नाव : काशीबाई  खिलारे मार्ग,  भागाचे नाव : एरंडवणे, शहराचे नाव : पुणे आणि पिनकोड : ४११ ००४. आता या कामात संगणकाला तयार करण्यासाठी आपल्याला तालीम संच बनवायची गरज पडते. पत्त्यांचे विविध नमुने घेऊन ते वेगवेगळ्या भागांत सुटे करावे लागतील. त्यातून मग तालीम संच तयार होईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पत्त्यांचे विविध नमुने आंतरजालाच्या माध्यमातून गोळा करता येतील. हेच काम एखादी व्यापारी संस्था करत असल्यास त्यांच्या ग्राहकांच्या माहिती कुंभातून ही माहिती सहज उपलब्ध होऊ शकेल. एकदा का पुरेसे पत्ते गोळा झाले की, त्यातील भाग वेगळे करण्याचे काम करावे लागते. हे काम मनुष्यबळाच्या माध्यमातून करावे लागते. एव्हाना आपल्या लक्षात आलेच असेल, की अशी कामे संगणकाचे प्राथमिक ज्ञान असलेली व्यक्ती सहज करू शकेल. उत्तम तालीम संचाची उपलब्धता हा पर्यवेक्षी शिक्षणातील महत्त्वाचा घटक आहे. या कामामध्ये संगणकाची प्राथमिक माहिती आणि पर्यवेक्षी शिक्षणातून करावयाच्या कामाची ओळख असणे आवश्यक आहे. तत्सम कामासंबंधी अतिशय सुस्पष्ट माहिती या तालीम संच तयार करणाऱ्या व्यक्तींना तयार करून देण्यात येते. अशा प्रकारच्या तालीम संचकर्त्यानी साधन शिक्षणामध्ये फार मोलाची भूमिका बजावली आहे.  

दुसरे उदाहरण म्हणून चित्रातील गोष्टी ओळखण्यामध्ये संगणकाला तरबेज करायचे असल्यास आपल्याला खूप चित्रे आणि त्यातील वस्तू तालीम संचकारांकडून तयार करून घ्याव्या लागतील. असा तालीम संच आपल्याला एखाद्या चित्रातील किंवा छायाचित्रातील गोष्टी शोधण्याच्या कामात, संगणकाला पर्यवेक्षी शिक्षण देण्यात फार मोलाची मदत करतो. अशी अजून उदाहरणे तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा आणि पाहा, की तालीम संच बनवण्यासाठी काय काय करावे लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashish Tendulkar article

Tags
टॉपिकस
Topic Tags: