तालीम कृत्रिम बुद्धिमत्तेची!

आशिष तेंडुलकर
Thursday, 23 January 2020

या भागात आपण कृत्रिम बुद्धिमत्ता नेमकी कशी काम करते, ते पाहूया. 

भविष्य नोकऱ्यांचे...
मागील भागात आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, हे पाहिले. या भागात आपण कृत्रिम बुद्धिमत्ता नेमकी कशी काम करते, ते पाहूया. 

संगणकाला एखाद्या कामामध्ये कृत्रिमरीत्या बुद्धिमान बनविण्यासाठी त्या संदर्भातील उदाहरणे दिली जातात. ही उदाहरणे इनपुट आणि आउटपुट अशा स्वरूपात पुरविली जातात. संगणकाला दोन अंकांची बेरीज शिकवण्यासाठी उदाहरणादाखल आपण अनेक दोन अंक आणि त्यांची बेरीज पुरवितो. वानगीदाखल {१, २।३}, {३, २।५}, {४, ५।९} अशा दोन अंकाच्या जोड्या आणि त्यांची बेरीज पुरविली जाते. अशी अनेक उदाहरणे संगणकाला द्यावी लागतात. या उदाहरण संचास तांत्रिक शब्दावलीमध्ये ‘तालीम विदा’ (training data) असे संबोधले जाते. तालीम विदाची उपलब्धता ही कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी अनिवार्य आहे. थोडक्यात सांगायचे तर ‘विना विदा नाही कृत्रिम बुद्धिमत्ता!’ 

आता आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचे 
एक व्यावहारिक उदाहरण पाहूया :

समजा आपल्याला संगणकाला डेक्कन ते कर्वे पुतळा या प्रवासासाठी किती वेळ लागेल, याचा अंदाज बांधयला शिकवायचे आहे. या प्रवासासाठी लागणार वेळ हा दिवस आणि प्रवासाची वेळ यानुसार बदलतो. सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन वेळेमधील रहदारी आणि शनिवार-रविवारच्या रहदारीचा ढाचा वेगळा असतो. अशा विविधतांमुळे या कामासाठी संगणक आज्ञावली बनविणे जिकिरीचे आहे. कदाचित खूप नियम वापरून अशी आज्ञावली बनविण्याचा प्रयत्न करता येईल, पण ती सर्वकालीन चालेलच याची खात्री देता येणार नाही. अशा वैशिष्ट्यांमुळे हा प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्तेने सोडविण्याच्या साच्यात चपखलपणे बसणारा आहे. 

वेगवेगळ्या वेळी केलेल्या प्रवासावरून आपण त्या प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेचा अंदाज बांधतो. आता या प्रवासाची माहिती दिवस, वेळ आणि प्रवासाला लागलेला वेळ अशा स्वरूपात एकत्र करून संगणकाला तालीम विदाच्या स्वरूपात दिल्यास आपण त्याला वेळेचा अंदाज बांधण्यास शिकवू शकू. असे अंदाज विश्‍वसनीयतेने मांडण्यासाठी तालीम विदा संचामध्ये विविधतापूर्ण उदाहरणे असणे गरजेचे असते. प्रवास वेळेचा अंदाज अचूकतेने वर्तवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे दिवस आणि लागणारा प्रवासाचा वेळ उदाहरणाखातर पुरवावा लागेल. या उदाहरणाविना प्रवास वेळेचे अचूक प्रारूप (मॉडेल) बनविणे फारच आव्हानात्मक असते.  थोडक्यात सांगायचे, तर विविध अनुभवांनी सिद्ध तालीम विदा संच अचूक प्रारूप बनविण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. अशा तालीम संचांविना संगणकाला ठरावीक काम शिकवणे निव्वळ अशक्य आहे. अशा स्वरूपाचे तालीम विदा संच तयार करण्यासाठी खूप रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ashish tendulkar article artificial intelligence