‘एआय’ अंतर्भूत संगणक प्रणाली बनवताना... 

‘एआय’ अंतर्भूत संगणक प्रणाली बनवताना... 

‘एआय’चा वापर एकदा व्यवहार्यतेच्या कसोटीवर उतरल्यावर आपल्याला तालीम संचांची जुळवाजुळव सुरू करावी लागते. या संदर्भातील माहिती अनेकदा विविध माहिती कुंभांमध्ये साठवलेली असते; ती तेथून एकत्र करावी लागते. काही वेळेला या माहितीवर संगणक आज्ञावलीद्वारे प्रक्रिया करून तालीम संचातील उदाहरणासाठीची गुणवैशिष्ट्ये तयार करून घ्यावी लागतात. मला हे नमूद करायला गंमत वाटते की, जवळपास एआय प्रकल्पातील ८५% वेळ हा माहिती गोळा करणे, त्यातून अपेक्षित गुणवैशिष्ययुक्त तालीम संच तयार करणे अशा कामांवर खर्च होतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सर्वसाधारणपणे पहिला तालीम संच तयार झाला, की लगेच सुरुवातीचे ‘एआय’ मॉडेल किंवा प्रारूप बनवून घेणे इष्ट! असे केल्याने आपल्याला प्रारूपाच्या अचूकतेबद्दल माहिती मिळते. आपल्याला अपेक्षित अचूकता मिळाल्यास असे प्रारूप आपल्याला लवकर वापरात आणता येते, अन्यथा या अनुभवावरून पुढची दिशा ठरविता येते. यामध्ये तालीम संचामध्ये जास्तीच्या उदाहरणांचा समावेश करणे, व्यवसाय कार्यक्षेत्र तज्ज्ञांबरोबर चर्चा करून अधिक उपयुक्त अशा गुणवैशिष्ट्यांचा समावेश करता येईल का, हे तपासून पाहणे आणि त्यासंदर्भातील पावले, इतर प्रारूप स्वरूपे वापरणे किंवा प्रारूपाची क्लिष्टता कमी-जास्त करणे यांचा समावेश असतो. प्रारूप नीटपणे चालले नाही, तर खूपदा अजून मोठ्या तालीम संचही मागणी केली जाते; असे सरसकटपणे करणे शहाणपणाचे नाही. आपण घेतलेले प्रारूप सक्षम नसल्यास अधिकच्या उदाहरणांचा नीटपणे फायदा उचलता येत नाही. अशा निर्णयांमुळे आपण अधिक उदाहरणे मिळवण्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करतो आणि त्याचा अजिबात उपयोग होत नाही. त्यामुळे प्रारूप तयार झाल्यावर ते अचूकपणे काम करते का आणि नसल्यास त्याची नेमकी अडचण आहे ते समजून घेतले पाहिजे, एकतर आपल्याला तालीम संचामधील उदाहरणे कमी पडत असावीत किंवा प्रारूपांमध्ये माहितीतील क्लिष्टता सामावण्यासाठी सुयोग्य क्षमता नसते. एकदा यातील एका पर्यायाने निदान झाल्यावर मग त्यानुसार पुढची पावले टाकता येतात. उत्तम प्रशिक्षित ‘एआय’ व्यावसायिकाची खरी पारख या पायरीवर करता येते. या पायरीवर तुलनेने अननुभवी लोक आपल्याला अधिकचा तालीम संच हवा असे सरसकटपणे सांगून टाकतात. आणि वर चर्चिल्याप्रमाणे असे करणे सर्वकाळ योग्य ठरत नाही. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अशा प्रकारे तयार झालेले प्रारूप आपल्याला व्यावसायिक गरजेसाठी कार्यक्षमपणे वापरता येते. मग अशी प्रारूपे कालातीत असतात का? एकदा प्रारूप बनवले आणि त्यातील पदांची उकल केली की, ती निरंतर चालतात का? त्याच्यामधील अडचणी किंवा त्यांचा कमी होणारी कार्यक्षमता कशी जोखायची? आणि मग त्यांची डागडुजी करून त्यानं अद्ययावत कसे ठेवावे? या सर्व प्रश्नांचा विचार पुढच्या लेखात करूया. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com