‘बीबीए/बीसीए’ला ‘सीईटी’ का?

गेल्या काही वर्षांत बीबीए/ बीसीए/ बीएमएससारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे.
cet exam
cet examsakal

- डॉ. श्‍वेता बापट, विभागप्रमुख - बीबीए, बीबीए-आयबी

गेल्या काही वर्षांत बीबीए/ बीसीए/ बीएमएससारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) हा एक परिपूर्ण अभ्यासक्रम आहे. त्याबरोबरच बीबीए (इंटरनॅशनल बिझनेस) आणि बीबीए (कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) असे आणखी दोन अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत.

विशेष म्हणजे, वाणिज्य विभागात येणारा हा अभ्यासक्रम कोणताही विद्यार्थी, म्हणजे कला, वाणिज्य, विज्ञान किंवा अगदी अभियांत्रिकीचा डिप्लोमा झालेला विद्यार्थीसुद्धा करू शकतो. ‘बीबीए’चा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्पेशलायझेशन. विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विशेष निवडण्याची मुभा यामध्ये आहे.

ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट, फायनान्शिअल मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, सेक्टर सर्व्हिस मॅनेजमेंट यांसारखे पर्याय दिले आहेत. यामुळे आपल्या आवडत्या विषयामध्ये अधिक प्रावीण्य मिळवणं सोपं जातं आणि फायदेशीर ठरतं. बीबीए (इंटरनॅशनल बिझनेस) हा अभ्यासक्रम सध्याच्या जागतिकीकरणाच्या धोरणामुळे महत्त्वाचा ठरतो. यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवसाय पद्धती शिकायची संधी विद्यार्थ्यांना मिळते.

बीबीए (कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) अभ्यासक्रम, तांत्रिक आणि व्यवस्थापन संबंधित विषयांच्या संयोजनाने तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि ॲप्लिकेशन्सबद्दल शिक्षण दिले जाते. विविध प्रोग्रामिंग भाषा आणि ‘फ्रेमवर्क’चे ज्ञान देणे हा या अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे.

सीईटी कशासाठी?

काही दिवसांपासून बीबीए, बीएमएस आणि बीसीएच्या प्रवेशासाठी या वर्षी अचानक ‘सीईटी’ का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, हे सर्व अभ्यासक्रम आतापर्यंत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) घेतले जात होते. मात्र, या वर्षापासून हे सर्व अभ्यासक्रम ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या (एआयसीटीई) नियमांखाली असणार आहेत.

एआयसीटीईने पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स/प्रोग्रामच्या (एमसीए/एमबीए) समान धर्तीवर एकसमान गुणवत्ता आणि शैक्षणिक मानके राखण्यासाठी बीबीए, बीएमएस आणि बीसीए अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्थांचे नियमन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बीबीए, बीएमएस आणि बीसीएच्या प्रवेशासाठी सीईटी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांना होणारे फायदे -

उच्च दर्जा : ‘एआयसीटीई’च्या अंतर्गत बीबीए/बीसीए/बीएमएस हे अभ्यासक्रम आल्याने अभ्यासक्रमांचा शैक्षणिक दर्जा वाढण्यात मदत होईल आणि अर्थातच त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.

अद्ययावत अभ्यासक्रम : बदलत्या जगाच्या गरजा पूर्ण करणारे उत्कृष्ट तांत्रिक शिक्षण देण्यावर एआयसीटीई लक्ष केंद्रित करते. वारंवार अभ्यासक्रम अद्ययावत करणाऱ्या संस्था स्थापन केल्या जातात आणि विद्यार्थ्यांना चांगल्या भविष्यासाठी तयार करण्यासाठी विविध संकल्पना अभ्यासक्रमात आणल्या जातात.

उच्च शिक्षणासाठीची पात्रता : उच्च तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी ‘एआयसीटीई’चा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम शिकणे फायद्याचे ठरते. यामुळे पुढील उच्च शिक्षण घेताना निश्‍चित फायदा होतो.

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी : एआयसीटीईने मंजूर केलेल्या अभ्यासक्रमांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक व्यापक, जागतिक दृष्टिकोन प्राप्त होतो. विद्यार्थी जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी अनुकूल आणि सुसज्ज होतात.

प्लेसमेंट पोर्टल : ‘एआयसीटीई’ने ‘प्लेसमेंट पोर्टल’ सुरू केले आहे. यात विविध जिल्ह्यांतील नोकऱ्या वेगळ्या करण्यात आल्या आहेत. तसेच, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या प्लॅटफॉर्मवर आधीच नोंदणी केली आहे. त्यामुळे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो.

शिष्यवृत्ती : तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना एआयसीटीई काही शिष्यवृत्ती आणि फेलोशिप ऑफर करते. एआयसीटीईच्या काही प्रसिद्ध शिष्यवृत्तींमध्ये सक्षम शिष्यवृत्ती, प्रगती शिष्यवृत्ती, पोस्ट ग्रॅजुएट शिष्यवृत्ती, पंतप्रधान विशेष शिष्यवृत्ती आणि राष्ट्रीय डॉक्टरेट फेलोशिपचा समावेश होतो.

एकूणच विचार केला असता एआयसीटीईद्वारे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम पूर्ण केल्यास दर्जेदार शिक्षण, उद्योग प्रासंगिकता, अनुभवी प्राध्यापक, नेटवर्किंग संधी आणि जागतिक मान्यता यांसह अनेक फायदे होतात. व्यवस्थापनाच्या सतत विकसित होत असलेल्या क्षेत्रात यशस्वी करिअर करण्याचा मार्ग मोकळा होतो.

महत्त्वाचे...

सीईटीच्या नोंदणीची मुदत : १८ एप्रिल २०२४

संकेतस्थळ : www.mahacet.org

परीक्षेची तारीख : २७ मे २०२४ ते २९ मे २०२४

(लेखिका कावेरी कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स अँड कॉमर्समध्ये कार्यरत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com