स्वप्नांचे ‘शब्दांकन’ करताना...

डॉ. श्रीराम गीत
Saturday, 7 December 2019

स्वप्ने पाहावीत काय? जरूर पाहावीत. मात्र, नेमक्‍या शब्दांत उतरवता येत नाही, अशा स्वप्नांच्या मागे किती लागायचे हा सुज्ञ, शहाणपणाचा, वास्तवाचा विचार करावाच लागतो. मग याआधीच्या लेखात विभागणी केलेल्या प्रत्येकाने आपल्या स्वप्नांचे शब्दांकन सुरू केले तर? म्हणजेच तो/ ती काहीच सांगत नाही, त्याला माहीतच नाही, तो ठरवतच नाही अशा विद्यार्थ्याला काय शिकायचे, याचे शब्दात रूपांतर करायला सांगितले तर? सहज शक्‍य नसले तरी प्रयत्नपूर्वक नक्की जमते.

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक
स्वप्ने पाहावीत काय? जरूर पाहावीत. मात्र, नेमक्‍या शब्दांत उतरवता येत नाही, अशा स्वप्नांच्या मागे किती लागायचे हा सुज्ञ, शहाणपणाचा, वास्तवाचा विचार करावाच लागतो. मग याआधीच्या लेखात विभागणी केलेल्या प्रत्येकाने आपल्या स्वप्नांचे शब्दांकन सुरू केले तर? म्हणजेच तो/ ती काहीच सांगत नाही, त्याला माहीतच नाही, तो ठरवतच नाही अशा विद्यार्थ्याला काय शिकायचे, याचे शब्दात रूपांतर करायला सांगितले तर? सहज शक्‍य नसले तरी प्रयत्नपूर्वक नक्की जमते. सध्याचा प्रत्येक विषय आठव व त्या विषयाचा अभ्यास आवडीने करशील का, तो विषय अजिबात नको आहे तुला? याचे नेमके उत्तर प्रत्येक विद्यार्थी देऊ शकतो, नव्हे नक्कीच देतो. काहींचे इतिहास-भूगोलाशी वाकडे असते, काहींना गणिताची भीतीच वाटते, कोणाला सायन्स आवडते तर काहींना भाषा छान व सोप्या वाटतात. अगदी हाच प्रकार दुसऱ्या गटातील पालकांना मदतीला येतो. आम्ही सांगतो ते पटतच नाही, आवडत नाही व मुले ऐकतच नाहीत, याची कारणे तुम्ही सुचवत असलेल्या रस्त्यातील विषयांच्या अडसराची असतील तर त्याचा उलगडा होऊ शकतो. उरलेल्या दहा टक्‍क्‍यांसंदर्भात स्वप्नांचे शब्दांकन मुले करू शकतात. पुरेसा वाव द्या एवढीच गरज असते. तुला काय शिकावेसे वाटते? कोण बनावेसे वाटते? काय काम करायला आवडेल? ते कुठे करायला आवडेल? यातील प्रत्येक प्रश्‍नाचा विचार करून किमान तीन पर्याय कागदावर उतरवले तर?

किंबहुना अचानक किंवा प्रयत्नपूर्वक ८०-९० टक्के मार्क हाती आलेल्या प्रत्येकाला हे सहज शक्‍य असते. एवढेच नव्हे, तर चुकीची शाखा निवडून बारावी किंवा पदवी घेतला विद्यार्थीसुद्धा त्या त्या टप्प्यावर या साऱ्या प्रश्‍नांचा नीट विचार करून वाटचालीला पुन्हा नवीन दिशा देऊ शकतो. कदाचित एखाद्या टप्प्यापर्यंत पाहिलेले स्वप्न आता आवाक्‍यात नाही, हे तरी कळून नवा विचार सुरू होतो किंवा दुसरे जास्त चांगले वाटू शकते. साध्या शब्दात सांगायचे तर यश चोप्रा किंवा करण जोहरचा सिनेमा पाहून तसे आयुष्यात काही घडत नसते हे कळू लागते. राहता राहिला सारे-सारे करू शकणाऱ्यांचा.

त्यांनी एक ते तीनऐवजी दहापर्यंतचे पर्याय क्रमाने लिहावेत. पण, पर्यायांबद्दल किमान पानभर पुरेशी माहिती गोळा करून त्याचे नेमके शब्दांकन जमेल, झेपेल, आवडेल त्यावर थोडातरी विचार करावा अन्‌ निर्णय घ्यावा... असे शब्दांकन का याबद्दल पुढच्या लेखात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: career article by dr shriram git