स्वप्नांचे शब्दांकन

Career
Career

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक
स्वप्नांचे शब्दांकन का करायचे? अगदी सोपे आहे, त्याचे कारण. मोबाईलचे स्वप्न, बाईकचे स्वप्न, घराचे स्वप्न, उद्योग सुरू करण्याचे स्वप्न पाहणारे बव्हंशी काय करतात? बॅंकेचे कर्ज कसे, किती, कोणत्या बॅंकेकडून मिळेल त्याचा विचार करतात ना? मग बॅंकेतले अधिकारी त्यांची अपेक्षा, परतफेड व संदर्भातील साऱ्याची त्यांच्या नजरेतून तपासणी करतात. अपेक्षांमधली रक्कम अवास्तव असेल, तर ते तुम्हाला त्याची रितसर जाणीव करून देतात. योग्य, रास्त व नेमकी मागणी असल्यास चुटकीसरसी कर्ज मान्य होते. तसेच जेव्हा कोणीही विद्यार्थी, व्यक्ती, नोकरदार, करिअर करू इच्छिणाऱ्याने प्रथम स्वतःच्या स्वप्नांचेच शब्दांकन करण्याचा प्रयत्न करावा. इथे आपण उलट्या क्रमाने पाहूयात. म्हणजेच छानशी नोकरी मिळाली आहे. पण पगार ऐकून हवी तशी छोकरी हाती लागत नाहीये, त्याची स्वप्ने नक्कीच भरकटायला लागतात. मोठ्ठा पगार, छानशी पोझिशन याची स्वप्ने पडू लागतात. मात्र याच स्वप्नांचे शब्दांकन केले तर कर्जाच्या अर्जासारखे वास्तव उलगडू लागते.

उदाहरणार्थ, नोकरीला लागून तीनच वर्षे झाली आहेत. एवढ्यात क्वचितच प्रमोशन मिळू शकते. अधिक शिकायचे तर त्याचा खर्च कोण करणार? आहे ती नोकरी बदलायची तर अन्य ठिकाणी मिळणारे काम येते का नाही? अशा अनेक उत्तरांतून रस्ते शोधता येतात किंवा वास्तवाचा उलगडा होत जातो. 

दुसऱ्या गटात पदवीच्या शेवटच्या वर्षातील सारेच मोडतात. काम टाळून, नोकरीतील पगाराचा आकडा ऐकून, आईबाबा म्हणतात म्हणून अजून शिकायचे ठरवणारे अशा नेमक्‍या शब्दांकनातून वास्तवापर्यंत पोचतात. म्हणजेच एम.कॉम., एम.ए., एम.ई., एम.एस्सी, एम.एड. अशा पदव्या आपण का घेणार आहोत किंवा त्यानंतर आपल्या सद्यपरिस्थितीत काही फरक पडणार आहे वा नाही याचा उलगडा होऊ शकतो. मग कदाचित अन्य उपयुक्त पर्यायांचा किंवा थेट नोकरीतून शिकायच्या कौशल्यांचा विचार पटू शकतो. आज वर उल्लेख केलेल्या अनेक द्विपदवीधरांनी आत्मपरीक्षण तर करुन पाहावे. हेच वाक्‍य पालकांनाही तितकेच लागू पडते. 

स्वतःच्या मनाला वेसण घालायची गरज नसते. स्वप्नेपण पाहायचीच असतात, पण मन भरकटून चालणार नसते. अन्‌ दिवास्वप्ने कधीच खरी होत नसतात. म्हणून त्यांना कागदावर थेट नेमके शब्द स्वरूप देणारा करिअरला सुरुवात करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com