मनाजोगती संधी

डॉ. श्रीराम गीत
Friday, 20 December 2019

‘रियुनियन’ या नावाची एक कविता सध्या फारच व्हायरल झाली आहे. कालमहिमा म्हणा ना, ती सध्या काय करते या ओळींशी, ती एक सुसंगत करिअर कविता आहे. त्यातील मोजके संदर्भ देऊन मी मूळ विषयाकडे वळणार आहे. वर्गाबाहेर अंगठे धरून उभा असणारा आज रुबाबदार आर्मी ऑफिसर झाला आहे, तर गणित न येणारा फॅशन स्टायलिस्ट म्हणून नाव कमावून आहे.

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक
‘रियुनियन’ या नावाची एक कविता सध्या फारच व्हायरल झाली आहे. कालमहिमा म्हणा ना, ती सध्या काय करते या ओळींशी, ती एक सुसंगत करिअर कविता आहे. त्यातील मोजके संदर्भ देऊन मी मूळ विषयाकडे वळणार आहे. वर्गाबाहेर अंगठे धरून उभा असणारा आज रुबाबदार आर्मी ऑफिसर झाला आहे, तर गणित न येणारा फॅशन स्टायलिस्ट म्हणून नाव कमावून आहे. नव्वदीच्या दशकात वयात आलेल्या व सध्या आईबाप म्हणून हे लेख वाचणाऱ्या किंवा शिक्षण, करिअर असे काही दिसले, की त्यावर बारीक नजरेने पाहणाऱ्या ‘जनरेशन वाय’साठी ही कविता फारच नोस्टॅल्जिक ठरत आहे. त्यातले वास्तव थोडेसे समजून घ्यायचे झाले तर? खरे तर नोकरीच्या, शिक्षणाच्या, व्यवसायांच्या पद्धती दर दशकात बदलतच असतात. हा बदल काहींना जाणवतो व त्यानुसार जे स्वतःला बदलू शकतात किंवा नवीन गोष्टी आत्मसात करायचा प्रयत्न करतात, त्यांची ‘करिअर’ या शब्दाच्या दिशेने वाटचाल सुरू होते.

काहींना यश मुठीत पकडता येते, तर अनेकांच्या मुठीतून समुद्राच्या मऊसूत वाळूसारखे ते हातातून निसटून जाते. अशा यशाच्या गोष्टी सांगणाऱ्या कविता तयार होतात. अर्थातच, त्या प्रचंड प्रसिद्धी पावतात, जसे संदीप खरेंच्या ‘दमलेल्या बाबाची कहाणी’चे गाणे सुरू झाले, की प्रेक्षागृहातील सारेच रुमाल ओले होतात. मात्र कार्यक्रम संपला, की पटापट गाड्या काढून उद्याच्या कामाची जुळणी करत पुन्हा आठवडाभर नकोशा कामाला जुंपून घेतले जाते. हिंजवडी, कल्याणीनगर, खराडीचे हे सारे पुन्हा सकाळी वास्तवात आलेले असतात. स्वतःला जाणीवपूर्वक बदलणारे मात्र यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतात. दुर्दैवाने, अशांची संख्या अत्यल्प आहे. किंवा वेगळ्या शब्दांत सांगायचे तर असे सर्व जरी नसले, तरी निदान पंचवीस टक्के आपल्याला आज सेलिब्रिटी म्हणून, पेपरमध्ये फोटो पाहून माहितीचे झाले आहेत. उरलेल्या पंचाहत्तर टक्‍क्‍यांबद्दलची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्नसुद्धा कोणी करायला जात नाही. 

वयाच्या विशीपासून मनाजोगती पायवाट तयार करणे हे महाकठीण काम असले, तर वयाच्या चाळिशीत आवडीच्या कामासाठी सध्याचे सारे सोडून देणे कर्मकठीण असते. नवीन कौशल्ये, नवीन मनोबल, नव्याने ऊर्जा गोळा करूनही करिअर सुरू होते. त्याबद्दल पुढच्या लेखात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: career Opportunity