करिअरच्या वाटा : बारावीनंतर काय, जाणून घ्या 

प्रमोद चौधरी
Friday, 20 March 2020

 

सद्यस्थितीत प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र झालेल्या असल्याने प्रत्येक पालकाची काळजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आपल्या पाल्यास कोणत्या दिशेने घेऊन गेल्यास त्याचे करिअर घडेल, असा विचार पालक करताना दिसत आहेत. योग्य मार्गदर्शन करणारे समुपदेशन केंद्र नसल्याने चिंतेमध्ये अधिकच भर पडताना दिसत आहे. 

नांदेड : आज अवतीभोवतीचे जग हे झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे बारावीनंतर काय? असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसह पालकांनाही सतावत चालला आहे. बदलत्या प्रवाहात आपला पाल्य टिकून राहील का? त्यासाठी कोणता अभ्यासक्रम निवडावा लागेल, असे असंख्य प्रश्‍न पालकांना पडत आहेत. परंतु, पालक आणि विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. eSakal.com वर क्लिक करा आणि बारावीनंतर कोणकोणते अभ्यासक्रम आहेत, त्याची माहिती जाणून घ्या.

खरं तर करिअरची निवड करताना आपली आवड व पालकांची भूमिका या दोन गोष्टी महत्त्वपूर्ण असतात. आज विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी अनेक क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत. परंतु, आज प्रत्येकाला वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी यासारख्या क्षेत्रांमध्येच करिअर करण्याची इच्छा आहे. परंतु, या दोनच क्षेत्रांमध्ये सर्वांना करिअर करणे शक्य नाही. या दोन क्षेत्रांव्यतिरिक्तही अनेक क्षेत्रांमध्ये विद्यार्थी आपली करिअर करू शकता. अशा क्षेत्रांची माहिती आपण जाणून घेऊ या.

  • वैद्यकीय क्षेत्र : सर्व आरोग्यविज्ञान अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षा द्यावी लागते. 
  • एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस : हे अभ्यासक्रम पाच वर्षे सहा महिन्याचे असून पूर्ण केल्यानंतर स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय किंवा रुग्णालयातही नोकरीची संधी असते. 
  • बीडीएस : हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असून पुढे एमडीएस हा अभ्यासक्रमही करता येतो. 
  • बीएससी इन नर्सिंग : हा चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रुग्णालयात नर्स म्हणून नोकरीची संधी आहे. 
  • बीव्हीएससी अँड एएच : हा अभ्यासक्रम पाच वर्षाचा असून पूर्ण केल्यानंतर जनावरांचे रुग्णालय, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरीची संधी आहे. स्वतःचा व्यवसायही करू शकता. 
  • डिफार्म : हा भ्यासक्रम तीन वर्षांचा असून औषधनिर्मिती कारखान्यात नोकरीची संधी असते. 
  • बीफार्म : चार वर्षांचा अभ्यासक्रम असून औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्थेमध्ये नोकरीची संधी आहे.
  • अभियांत्रिकी क्षेत्र : या क्षेत्रात इयत्ता दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. तर बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. यासाठी ‘सीईटी’ परीक्षा द्यावी लागते. ‘आयआयटी’ प्रवेशासाठी ‘जेईई’ ही प्रवेश परीक्षा घेतली जाते.
  • कृषीक्षेत्र : बारावीनंतर कृषिक्षेत्रामध्ये ॲग्रीकल्चर, फॉरेस्ट्री, फिशरीज, फूड सायन्स आदींचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो.
  • औषध निर्माण शास्त्र : बारावीनंतर ‘डी.फार्मसी’ हा दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम आहे. यात औषध उत्पादन, संधोधन आदीमध्ये करिअर करता येते. त्यानंतर बी.फार्म ही पदवीही घेता येते. 

याशिवाय पशुवैद्यकशास्त्र, आर्किटेक्चर, पॅरामेडिकल, बायोटेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट, मनोरंजन, संरक्षण दल यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या अनेक संधी आहेत. याचबरोबर बारावीनंतर बीबीए, बीसीए, बीसीएस यासारख्या अभ्यासक्रमांतूनही संगणकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध आहे.

पालकांनी चिंता करू नये
आपल्या पाल्यास कोणत्या दिशेने घेऊन गेल्यास त्याचे करिअर घडेल, असा विचार पालकांना सतावत असतो. वास्तविक पाहता बारावी कॉमर्स केल्यानंतर पुढे त्यात पदवी घेता येते. तसेच ‘सीए’ होण्याचीही संधी उपलब्ध असते. तसेच बारावी सायन्स, आर्ट किंवा कॉमर्स कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण केल्यानंतर एमपीएससी, युपीएससी या स्पर्धा परीक्षा देऊन विद्यार्थ्यांना करिअर करता येते.
- प्रा. सुरेश पोद्दार (शिक्षण तज्ज्ञ, नांदेड)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Career Options For Students After HSc Exams Nanded News