
दहावी प्रश्नपत्रिका स्वरूपात बदल, कठीण प्रश्नांची संख्या वाढणार
बेळगाव : शैक्षणिक वर्षाला सुरळीतरित्या सुरुवात झाल्यामुळे दहावीच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पुन्हा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पुढील मार्च एप्रिल महिन्यात होणाऱ्या दहावी परीक्षेवेळी कठीण प्रश्नांची संख्या वाढणार आहे. राज्यात कोरोनाचे संकट निर्माण झाल्यामुळे अनेक महिने शाळा बंद होत्या. तसेच अभ्यासक्रम पूर्ण करण्यास देखील अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे शिक्षण खात्याने दहावी परीक्षेच्या स्वरूपात बदल केला होता. तसेच परीक्षेवेळी कठीण प्रश्नांची संख्या कमी करून सोपे प्रश्न वाढविण्यात आले होते. मात्र कोरोनाचे संकट कमी झाल्याने यावर्षी 16 मे पासून शाळांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे यावर्षी दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण होणार असून अभ्यासक्रमात कोणत्याही प्रकारची कपात न करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना चांगला अभ्यास करावा लागणार आहे. गेल्या वर्षी सोप्या प्रश्नांची संख्या 40 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली होती. तसेच फक्त दहा टक्के कठीण प्रश्न होते. तर २०२० - २१ मध्ये ओएमआर सिटवर परीक्षा घेण्यात आली होती. मात्र शैक्षणिक वर्ष पूर्व पदावर आल्याने प्रश्नपत्रिका चे स्वरूप पूर्वीप्रमाणे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण खात्याने पत्रक जाहीर करून याबाबतची माहिती शाळांना दिली आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घेत आतापासूनच परीक्षेच्या तयारीला लागने आवश्यक आहे.
२०२२ - २३ च्या शैक्षणिक वर्षांमध्ये दहावीची प्रश्नपत्रिका पुढील प्रमाणे असणार आहे.
सोपे प्रश्न - ३० टक्के
साधारण प्रश्न - ५० टक्के
कठिण प्रश्न - २० टक्के
कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्यापासून सूट देण्यात आली होती. त्यामुळे दहावी परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना 75 टक्के हजर राहण्याची सक्ती लागू करण्यात आली नव्हती. मात्र यावेळी 75 टक्के पेक्षा अधिक हजेरी असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे. त्यामुळे दांडी बहादर विद्यार्थ्यांची गोची होणार असून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त दिवस शाळेत हजर असणे गरजेचे आहे.
Web Title: Changes 10th Question Paper Format Number Of Difficult Questions Will Increase Belgaum
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..