बालक-पालक : आईच्या जवळी, घड्याळ कसले…

दारंखिडक्यांमध्ये किंचितही फट न ठेवता, गोधडी आणि दोन दोन चादरी पांघरून दोन्ही मुलं गुडूप झोपून गेली होती
बालक-पालक : आईच्या जवळी, घड्याळ कसले…
बालक-पालक : आईच्या जवळी, घड्याळ कसले…sakal media

अवघ्या परिसराने मस्त धुक्याची चादर पांघरली होती. दारंखिडक्यांमध्ये किंचितही फट न ठेवता, गोधडी आणि दोन दोन चादरी पांघरून दोन्ही मुलं गुडूप झोपून गेली होती. त्यांना थंडी वाजू नये, म्हणून आईनंच रात्री त्यांच्या अंगावर आणखी एक पांघरूण घातलं होतं. आता मात्र शाळेसाठी मुलांना उठवायचं होतं.

‘‘चला, उठा! साडेसात वाजले!’’ आईनं गजर केला. मुलांना उठवण्यासाठीचा घड्याळाचा गजर वाजून वाजून आधीच धारातीर्थी पडल्याने आईला स्वतः मैदानात उतरावं लागलं होतं.

‘‘अरे, साडेसात वाजले, आठची शाळा असते तुमची, किती उशीर!’’ असं म्हणत आईनं दोघांनाही प्रेमानं हाका मारल्या. तरीही मुलांची हालचाल दिसेना, तेव्हा तिला ब्रह्मास्त्र उगारावंच लागलं. तिनं दोघांची पांघरुणं काढून त्यांना उठून बसवलं. मुलं बसल्या बसल्या पेंगायला लागली. आता मात्र आईचा संयम संपला. तिनं सरळ दोघांना उठवून उभं केलं आणि तोंड धुवायला बेसिनकडे धाडलं.

‘‘झोपू देत बिचाऱ्यांना!’’ बाबांनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला, पण आईनं डोळे वटारल्यावर त्यांचाही नाइलाज झाला.

‘‘आवरा, पावणेआठ वाजत आले!’’ आईनं पुन्हा गजर केला.

‘‘म्हणजे सव्वासात वाजले असणार!’’ दादानं धाकटीच्या कानात सांगितलं. शाळेसाठी उठवायचं असलं, की आई घड्याळाचे काटे पुढे करून ठेवते किंवा पुढची वेळ सांगते, हे आता मुलांना माहीत झालं होतं. अर्थात, आई समोरच कमरेवर हात घेऊन उभी असल्यामुळं त्यांना पटापट आवरणं भागच होतं.

‘‘एवढ्या लवकर कशाला उठवतेस गं त्यांना?’’ मुलांना ऐकू जाणार नाही, अशा बेतानं बाबांनी विचारलं.

‘‘पुढचं आवरायलाही दोघं अर्धा तास लावतील आणि शाळा भरता भरता कशीबशी तिथे पोहोचतील. अजिबात त्यांच्यावर दया दाखवायची गरज नाहीये!’’ आईनं स्पष्ट सांगितलं. बाबांना आता बोलण्यासारखं काही राहिलं नव्हतं. त्यांनी मुलांना शाळेत सोडायला जायची तयारी केली.

दिवस मजेत गेला, मुलं शाळेतून आली, अभ्यास झाला आणि संध्याकाळी खाली खेळायलाही गेली.

‘‘चला, साडेआठ वाजले, घरी या आता!’’ आईनं खिडकीतून हाका मारल्या. पहिल्या हाकेचा काही परिणाम झाला नाहीच. दोन तीनदा हाका मारल्यावर, ‘आता घरी आला नाहीत, तर बघा!’ असा इशारा दिल्यावरच थोडाफार परिणाम झाला.

मुलं थोड्या वेळानं घरी आली, तेव्हा सव्वाआठ वाजलेले होते.

‘‘काय गं आई...! आत्ता कुठे सव्वाआठ वाजलेत! आम्ही लपाछपी खेळत होतो.... अजून थोडावेळ खेळलो असतो ना! तू कुठल्या घड्याळातली वेळ सांगतेस, कुणास ठाऊक!’’ मुलं पुन्हा कुरकुरली.

‘‘असं सांगितलं नसतं, तर तुम्ही जेवायलाही वेळेवर आलाच नसतात!’’ आईनं उत्तर दिलं आणि सरळ जेवणाची पानं वाढली.

रविवारी एका घरगुती कार्यक्रमाला जायचं होतं. मुलं कधीची आवरून तयार होती. बाबांचंही आवरून झालं होतं.

‘पंधरा मिनिटांत आवरते!’ असं आईनं सांगितलं होतं. मात्र, अर्धा तास झाला, तरी तिचं आवरून झालं नव्हतं. बाबांनी गेल्याच आठवड्यात आणलेली नवीन साडी तिला नेसायची होती.

‘‘बाबा, बघा ना, आईमुळं आपल्याला उशीर होतोय! आपल्याला सहापर्यंत पोहोचायचं होतं ना?’’ मुलं अस्वस्थ झाली होती.

‘‘काळजी करू नका, सहाची वेळ मी आईनं लवकर आवरावं म्हणून सांगितली होती. फंक्शन सात वाजता आहे! आई येईलच आवरून अर्ध्या तासात! तोपर्यंत तुम्ही काहीतरी खेळत बसा बघू!’’ बाबांनी शांतपणे उत्तर दिलं आणि मुलं एकमेकांकडे पाहायला लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com