
12 वी पास असलेल्या विद्यार्थ्यांना CISF मध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालीय.
CISF मध्ये नोकरीची मोठी संधी; महिन्याला मिळणार 'इतका' पगार
CISF Constable Recruitment 2022 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं (CISF) कॉन्स्टेबल फायरमन (CISF Constable) पदांसाठी पात्र उमेदवारांच्या भरतीकरिता अधिसूचना जारी केलीय. इच्छुक उमेदवार cisfrectt.in या अधिकृत वेबसाइटवर तपशीलवार सूचना पाहू शकतात. भरतीसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया 29 जानेवारी 2022 पासून सुरू झाली असून अर्ज नोंदवण्याची अंतिम तारीख 4 मार्च 2022 आहे. दरम्यान, उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सादर करणं आवश्यक आहे.
या भरती मोहिमेद्वारे एकूण 1149 कॉन्स्टेबलच्या (Central Industrial Security Force) जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी 12 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय 18 ते 23 वर्षे दरम्यान असावं. शेवटी निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर 3 अंतर्गत 21,700/- ते 69,100 रुपये मासिक पगारासह नियुक्त केलं जाईल. तर, उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क देखील भरावे लागेल. मात्र, यात आरक्षित श्रेणीसाठी सूट देण्यात आलीय.
दरम्यान, उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, वैद्यकीय चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक चाचणी आणि दस्तऐवज पडताळणी (DV) या आधारे केली जाईल. ज्या उमेदवारांना CISF कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेतील सर्व आवश्यक माहिती तपासावी आणि अर्ज करावा, असंही स्पष्ट करण्यात आलंय.