
राज्यात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘एमएएच एमबीए/एमएमएस सीईटी’ परीक्षा शनिवारी झाली.
MBA CET Exam : एमबीएच्या सीईटी परीक्षेत तांत्रिक अडचणींमुळे गोंधळ
पुणे - राज्यात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘एमएएच एमबीए/एमएमएस सीईटी’ परीक्षा शनिवारी झाली. परंतु या परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन असणे, परीक्षेचा नियोजित कालावधी मागे-पुढे होणे, नियोजित वेळेपूर्वीच परीक्षेचे सर्व्हर बंद होणे, अशा असंख्य तांत्रिक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला.
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता ‘एमएएच एमबीए/एमएमएस सीईटी’ परीक्षा शनिवारी झाली. सीईटी सेलतर्फे एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शनिवारी (ता.२५) आणि रविवारी (ता.२६) सीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा सकाळी नऊ ते साडे अकरा आणि दुपारी दोन ते साडे चार अशा सत्रात होत आहे. राज्यातील एक लाख ३१ हजार ३५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
सीईटी सेलमार्फत १९१ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. दरम्यान, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना सर्व्हर अचानकपणे बंद पडणे, परीक्षा वेळेपूर्वीच संपणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागले. या तांत्रिक अडचणींमुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षेतील पेपर सोडविण्यासाठी १५० मिनिटे, तर काही विद्यार्थ्यांना १७० ते १७५ मिनिटे मिळाली. परिणामी विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, राज्यातील १९१ परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू झालेली असून १९ केंद्रावर काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे परीक्षा उशिरा घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण सीईटी सेलने ट्विटरद्वारे दिले आहे. परीक्षा देण्यापासून कोणीही पात्र उमेदवार वंचित राहणार नाही, सुधारित वेळेबाबतचा तपशील सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सीईटी सेल ट्विटरद्वारे जाहीर केलेल्या निवेदनाद्वारे केले आहे.
या परीक्षेदरम्यान राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेतील या तांत्रिक अडचणींबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.