गुड न्यूज: कोरोनामुळे नोकरी जाणाऱ्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार तीन महिन्यातील पगाराच्या 50 टक्के रक्कम

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 18 September 2020

केंद्र सरकारने कोरोनाच्या या संकटकाळात बेरोजगार झालेल्या औद्योगिक कामगारांसाठी अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेअंतर्गत दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कामगार मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या संकटकाळात ईएसआईसी मध्ये रजिस्टर्ड नोकरी गमावणाऱ्या नोकरदार वर्गाला बेरोजगारी बेनिफिट देत दिलासा दिलेला आहे.

पुणे : जगभर कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यात अनेकांची नोकरी गेली आहे. अशातच सरकारने नोकरी जाणाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या या संकटकाळात बेरोजगार झालेल्या औद्योगिक कामगारांसाठी अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेअंतर्गत दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

कामगार मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या या कालावधीमध्ये ईएसआईसीमध्ये रजिस्टर्ड नोकरी गमावणाऱ्या नोकरदार लोकांना बेरोजगारी बेनिफिट देत दिलासा दिलेला आहे. बेनिफिट घेण्याची तारीख आता वाढवली असून 30 जून 2021 पर्यंत करण्यात आलेली आहे. यामध्ये ईएसआयसीमध्ये रजिस्टर्ड कामगारांना 50 टक्के अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट दिले जाणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे 42 लाख कामगारांना या कोरोनाच्या दिवसात फायदा मिळणार आहे.

सरकारच्या अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेअंतर्गत रोजगार गमावणाऱ्यांना आता सरकारकडून मदत मिळत आहे. हा एक प्रकारचा बेरोजगारी भत्ता आहे. ज्याचा लाभ हा फक्त त्याच कर्मचाऱ्यांना मिळत आहे. ज्यांना ESI योजनेअंतर्गत कव्हर आहे आणि ज्याच्या मासिक पगारातून ESI योगदान कापले जात  होते. सरकारी नियमांनुसार, या योजनेमार्फत आता तीन महिन्यातील पगाराच्या 50 टक्के रक्कम दिली जाणार आहे. सरकारच्या या घेतलेल्या निर्णयामुळे 42 लाख कामगारांना फायदा मिळणार आहे. 24 मार्च ते 30 जून 2021 या कालावधीमध्ये नोकरी गेलेल्यांना हा फायदा होणार आहे. याअगोदर ही तारीख 24 मार्च ते 31 डिसेंबर 2020 होती. दम्यान 24 मार्चच्या आधीच ज्यांची नोकरी गेलेली आहे अशा लोकांना अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेच्या मुख्य अटी लागू होणार आहे.

कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे देशातील अर्थव्यवस्था डळमळीत होत चालली आहे. अनेकांवर संकट कोसळले आहे. त्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार, देशातील 12 कोटी लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रुपात बेरोजगार झालेले आहेत. तसेच कारखान्यांमध्ये काम करणाऱ्यांची संख्या 1.9 कोटी आहे. केवळ जुलै महिन्यात 50 लाख लोकं बेरोजगार झाले आहेत. अशावेळी फॅक्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांची नोकरी गेलेली आहे. त्यातच सरकारकडून या लोकांना एक आनंदाची बातमी मिळत आहे.

यांना मिळणार नाही फायदा... 

जर सुरवातीपासून एक व्यक्ती ESIC योजनेचे लाभधारक असतील. परंतु जर एखाद्या चुकीच्या व्यवहारामुळे त्या व्यक्तीला कंपनीमधून काढून टाकले असेल, तर त्या व्यक्तीवर फौजदारी खटला दाखल असणार आहे. नाहीतर संबधित व्यक्तीने निवृत्तीच्या तारखेच्या आधी स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेतली असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

योजनेच्या अटी... 
 
- या विमाधारक व्यक्तीने त्यांची नोकरी जाण्याअगोदर कमीतकमी 2 वर्षे नोकरी करणे गरजेचे आहे. तसेच ESI योगदान कमीत कमी 78 दिवस केलेले असणे गरजेचे आहे.

- जर तुमची नोकरी गेली असेल तर नोकरी गेल्याच्या तारखेच्या 30 दिवसानंतर या रकमेसाठी क्लेम करावा लागणार आहे. सुरवातीला हा कालावधी 90 दिवस होता.

- तसेच याकरिता क्लेम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना नियोक्ता किंवा तुमच्या कंपनीकडे जाण्याची गरज नसणार आहे. 

- क्लेम थेट ESIC च्या शाखा कार्यालयामध्ये जमा केला जाऊ शकतो आणि शाखा स्तरावरच त्याचे व्हेरिफिकेशन देखील केले जाईल.

- तसेच क्लेमचा फॉर्म ऑनलाइनसुद्धा सबमिट करता येणार आहे. तसेच ESIC वेबसाइटवर जाऊन या योजनेच्या लाभासाठी फॉर्म डाऊनलोड करता येईल. 

- त्यानंतर फॉर्म सबमिट करून 15 दिवसात कर्मचाऱ्यांच्या खात्यात क्लेमची रक्कम पाठवण्यात येणार आहे.

-  तसेच संबधित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आधारचा वापर केला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Corona days, the government has decided to provide relief under the Atal Bimit Vyakti Yojana for job seekers