esakal | संधी करिअरच्या... : अभियांत्रिकी क्षेत्राचे महत्त्व अबाधित
sakal

बोलून बातमी शोधा

संधी करिअरच्या... : अभियांत्रिकी क्षेत्राचे महत्त्व अबाधित

संधी करिअरच्या... : अभियांत्रिकी क्षेत्राचे महत्त्व अबाधित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-विवेक वेलणकर

कोरोना महामारीमुळे जागतिक पातळीवर मंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याने बारावीनंतर अभियांत्रिकी क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत वस्तुस्थितीपेक्षा अफवांमुळे जास्त घबराट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती जाणून घेणे आवश्यक आहे.

अभियांत्रिकीच्या जवळपास सत्तर शाखा उपलब्ध आहेत. त्यातील अनेक शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात भारत पूर्वीपासून महासत्ता आहेच आणि कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग डिजिटायझेशनकडे वळले असल्याने भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना सुगीचे दिवस आले आहेत. नुकतेच विप्रोच्या अझीम प्रेमजींनी पुढील दोन वर्षांत भारतीय आयटी इंडस्ट्री दुपटीने वाढणार असल्याचे अनुमान वर्तवले आहे.

यंदाही कॉम्प्युटर व आयटी अभियांत्रिकी या विषयांमधून अभियांत्रिकी पदवी मिळवलेल्या काही हजार विद्यार्थ्यांना कॅंपस प्लेसमेंटमधून उत्तम पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. करोनामुळे ज्या क्षेत्राला महत्त्व आले, त्या बायो टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग व बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये संधी सातत्याने वाढत आहेत. भारतातून अमेरिका व युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर इंजिनिअरिंग मालाची निर्यात होते. जानेवारी २०२१मध्ये ही निर्यात ५० हजार कोटी रुपयांची होती. भारतातील कॅपिटल गुड्स इंडस्ट्रीची उलाढाल २०२५मध्ये सव्वा लाख कोटी रुपयांची होण्याचा अंदाज आहे. इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री चीनमधून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत आहे आणि त्यातला मोठा भाग भारताकडे येतो आहे. परकीय थेट गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे.

पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात भारत सरकार आणि खासगी गुंतवणूकदार खूप मोठी गुंतवणूक करीत आहेत. या सगळ्याचा थेट परिणाम म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल व सिव्हिल या मूलभूत अभियांत्रिकी शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत. केमिकल इंडस्ट्रीमध्येही चांगली वाढ होताना दिसते आहे, त्यामुळे केमिकल इंजिनिअरिंग शाखेला ही चांगले दिवस आले आहेत. या सगळ्या गोष्टी अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासादायक ठरणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • यापुढील काळात इंडस्ट्री विद्यार्थ्यांकडून अधिकाधिक तांत्रिक ज्ञानाची, तसेच उत्तम कम्युनिकेशन स्कील्सची अपेक्षा ठेवणार आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच इंटर्नशिप, सेमिनार्स, सर्टिफिकेशन्स अशा गोष्टी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम संधी उपलब्ध होणार आहेत.

  • विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेताना ज्या महाविद्यालयांत कॅंपस प्लेसमेंटची चांगली परंपरा आहे, त्या महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

  • सर्वच अभियांत्रिकी शाखांमध्ये गुणवान विद्यार्थ्यांना उत्तम संधी उपलब्ध आहेत, याचे भान ठेवून केवळ एखाद्या शाखेत नोकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे म्हणून आवडत नसूनही त्या शाखेत प्रवेश घेण्याचा अट्टहास करू नये.

  • मूलभूत इंजिनिअरिंग शाखांमध्ये ७०% फिजिक्स व ३०% मॅथेमॅटिक्स शिकावे लागते, हे लक्षात घेऊन बारावीपर्यंत शिकलेल्या फिजिक्समधील कोणता भाग (मेकॅनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल) जास्त आवडला, ते बघून शाखेची निवड करावी ज्यायोगे अभियांत्रिकी शिक्षण आनंददायी व सहजसाध्य होईल.

  • कॉम्प्युटर किंवा आयटी इंजिनिअरिंग करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी एखादी प्रोग्रामिंग भाषा शिकून आपली त्या क्षेत्रातील आवड तपासून घ्यावी.

एकुणातच, अभियांत्रिकी हा विकासाचा व आधुनिक जीवनाचा पाया असल्याने त्यात कालही भरपूर संधी होत्या, आजही आहेत व उद्याही असणार आहेत, हे विद्यार्थी व पालकांनी लक्षात घ्यावे.

loading image
go to top