esakal | ‘अ’ ऑनलाइनचा : ऑनलाइन शिकवणे परिणामकारक होण्यासाठी...
sakal

बोलून बातमी शोधा

‘अ’ ऑनलाइनचा : ऑनलाइन शिकवणे परिणामकारक होण्यासाठी...

‘अ’ ऑनलाइनचा : ऑनलाइन शिकवणे परिणामकारक होण्यासाठी...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-डॉ. उमेश दे. प्रधान

ऑनलाइन शिकवण्याचा वेळ हा नेहमीच्या तासिकांपेक्षा कमी असावा. मुलांचे काय कुणाचेच लक्ष इतक्या जास्त वेळ टिकून राहू शकत नाही. वर्गातील मुलांचे छोटे गट करून त्यांना सांगा. एकाच वेळेस मोठ्या गटाबरोबर काम करताना तीच तीच मुले बोलत राहातात. मोबाईल गेमचा वापर करून शिकवल्यास ते मुलांना जास्त आवडेल. खेळातून, मनोरंजनातून मुले पटकन आत्मसात करतात. भाषण, संभाषण, वाचन यांसारख्या स्पर्धातून काही विषय शिकवता येतील.

मुलांना काही उपक्रम, प्रकल्प, प्रयोग घरच्या घरी करायला लावा. अशा कृतीयुक्त अध्ययनातून मुलांना विषय चांगल्याप्रकारे समजेल. हे करायला मुलांना अतिशय आवडते. आपल्या अध्यापन शैलीमध्ये पद्धतीत आवश्यक ती भर शिक्षकांनी घालायला हवी. मुलांना आव्हाने स्वीकारायला नेहमीच आवडते.

अडचणी कशा सोडवायच्या?

आपल्या भोवताली असणाऱ्या सामाजिक कार्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा यासाठी उपयोग होऊ शकेल. परिस्थितीचे गांभीर्य सगळ्यांनाच आहे. ऑनलाइन वर्गाची शिस्त मुलांना आणि पालकांना वेळोवेळी समजावून द्या. घरोघरी मुलांच्या संख्येनुसार मोबाईल असेलच असे नाही. त्यामुळे तुमचे वेळापत्रक नीट आखून घ्या. मुलांना कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही असे खेळकर, आनंददायी वातावरण ठेवा तर मुलं तुमचं नक्की ऐकतील.

विद्यार्थ्यांना शिकताना कंटाळा येऊ नये यासाठी काय करावे?

 • शिकवताना भरपूर फोटो, चित्रे, व्हिडिओ, ऑडिओ यांचा वापर करा.

 • वेगळ, पाठ्यपुस्तकाच्या पलीकडचे मुलांना आवडते.

 • शिकवण्याच्या दरम्यान लेखन काम करायला लावले नाही, तर मुले ते नंतरच्या काळात करू शकतात.

 • प्रत्येक तास हा मुलांची उस्तुकता वाढवणारा, विचार करायला, कल्पना करायला लावणारा उत्कंठावर्धक असावा.

 • तोच तोच पणा नको. नावीन्याचा शोध घ्या.

 • उद्या सर काय सांगता आहेत, याचा विचार करून आपली मांडणी करा.

 • आयत्या वेळेस काही करण्यात वेळ घालवू नका. योजना करा.

 • नेहमीचे वर्गात शिकवणे आणि ऑनलाइन शिकवणे यातला फरक लक्षात घेऊन शिकवा.

 • पाठ्यपुस्तकातील आहे तेच सांगण्यापेक्षा नवीन, वेगळे असे काहीतरी ऐकण्यासाठी मुले नेहमीच तयार असतात. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल असे पाहा.

 • विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला, शंका निरसन करून घ्यायला वेळ द्या. केवळ तुम्ही शिकवतच राहून काही होणार नाही.

ऑनलाइन मूल्यमापन कसे असावे?

 • दर आठवड्यात चाचणी ठेवा.

 • एकदम मोठी परीक्षा घेण्याऐवजी छोटे-छोटे भाग केल्यास मुले आनंदाने करतील, त्यांना ताण येणार नाही.

 • प्रश्न उपयोजनात्मक असावेत. कृतीयुक्त मूल्यमापन हे गैरमार्गाला आळा घालणारे होते.

 • काही स्पर्धांमधून मुलांच्या कौशल्य विकसनाची पातळी ओळखता येईल.

 • छोट्या परीक्षा झाल्यानंतर काही प्रशस्तीपत्रक, स्टार किंवा त्यांचे यश साजरे करणारे बक्षीस द्या.

ऑनलाइन अध्यापनासाठीची तंत्रज्ञानविषयक कौशल्ये

ई-मेल अकाउंट उघडणे, ऑनलाइन अध्यापनासाठीच्या प्रोग्रॅमचा उपयोग करणे, त्यावरील विविध सोयींचा उपयोग करता येणे. उदा. व्हाइट बोर्ड, चॅट बॉक्स, हॅंड रेज, मुलांना वेगवेगळ्या गटात विभागता येणे, स्लाइड शेअर, ऑडिओ-व्हिडिओ शेअर, इंटरॲक्टिव्ह प्लॅट्फॉर्म्सचा वापर, पॉवर पॉइंट प्रेझेंन्टेशन तयार करणे, विविध संकेत स्थळांवरून माहिती, फोटो उपलब्ध करून घेणे यांसारखी तंत्रज्ञाने आत्मसात करावी लागतील. प्रश्न विचारा, शंका उपस्थित करा, समस्या सांगा, उत्तरे मिळतील, समाधान मिळेल, उपाय सुचतील. परंतु बोलले मात्र पाहिजे. आपला प्रतिसाद नोंदवला पाहिजे.

loading image
go to top