esakal | अभियांत्रिकी प्रवेशानंतर पदवीच्या जागा राहणार रिक्त
sakal

बोलून बातमी शोधा

अभियांत्रिकी

अभियांत्रिकी प्रवेशानंतर पदवीच्या जागा राहणार रिक्त

sakal_logo
By
मंगेश गोमासे - सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सीईटी सेलद्वारे घेण्यात येणारी ‘एमएचसीईटी’ संपलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या निकालानंतर अभियांत्रिकी प्रवेशास सुरवात करण्यात येईल. अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया लांबल्याने बहुतांश विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमात तात्पुरता प्रवेश घेतात. मात्र, आता प्रवेश सुरू होताच विद्यार्थी पदवी अभ्यासक्रम सोडून जात असल्याने यंदाही पारंपरिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहणार असल्याने महाविद्यालयांची धाकधूक वाढली आहे.

अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी राज्याच्या सीईटी सेलमार्फत एमएचसीईटी घेण्यात येते. मात्र, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून परीक्षा लांबल्याने प्रवेशाची प्रक्रियाही लांबली आहे. चार दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांनी एमएचसीईटी परीक्षा दिली. आता काही दिवसात त्याचा निकालाची घोषणा झाल्यावर प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आपल्या सुविधांसाठी अगोदरच एखाद्या नामवंत महाविद्यालयात विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतात. त्यामुळे बहुतांश महाविद्यालयांचे प्रवेश अल्पावधीत फुल्ल होतात.

विशेष म्हणजे, त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी भटकावे लागते. त्यासाठी विद्यार्थी संघटना निवेदन सादर करीत, २० टक्के जागा वाढही मागताना दिसून येतात. याचा फायदा घेत, महाविद्यालये जागा भरून घेतात. मात्र, अभियांत्रिकीसह इतर विषयांची प्रवेश परीक्षा सुरू होताच, विज्ञान आणि वाणिज्य या पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थी त्याकडे वळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांद्वारे प्रवेश रद्द करण्यात येतो. त्यामुळे नामवंत महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असल्याचे चित्र निर्माण होते.

गेल्यावर्षी शहरातील जवळपास सर्वच महाविद्यालयात हे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या प्रवेशाची अंतिम तारीख निघून गेल्याने या जागा महाविद्यालयांना भरता येणे अशक्य होते. त्यामुळे महाविद्यालयांना मोठा फटका बसत असल्याचे दिसून आले. हीच परिस्थिती यावर्षीही येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरवर्षी अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया लांबते. मात्र, प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत विद्यापीठाच्या प्रवेशाची अंतिम तारीख निघून जाते. एकदा तारीख निघाल्यावर प्रवेश करता येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याचे चित्र गेल्यावर्षी दिसून आले.

- डॉ. महेंद्र ढोरे, प्राचार्य, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय

loading image
go to top