esakal | Maharashtra College Reopening |महाविद्यालये सुरू करताना...
sakal

बोलून बातमी शोधा

colleges

महाविद्यालये सुरू करताना...

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये येत्या बुधवारपासून (ता.२०) सुरू करण्याला उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. त्यानुसार विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालये सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोणती महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून होणार सुरू?

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयातील नियमित वर्ग प्रत्यक्ष (ऑफलाइन) सुरू होणार आहेत. विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे वर्ग ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाशी विचारविनियम करून विद्यापीठांना त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा लागणार आहे.

महाविद्यालयात या विद्यार्थ्यांना मिळणार ‘एंट्री’

१८ वर्षावरील ज्या विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, असेच विद्यार्थी/विद्यार्थिंनी महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार आहेत.

विद्यापीठांची जबाबदारी काय?

स्थानिक परिस्थितीचा विचार करून स्थानिक प्रशासनाशी विचारविनिमय करून विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू करण्याबाबत योग्य तो निर्णय संबंधित विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर घ्यायचा आहे. त्यानुसार महाविद्यालयांना सविस्तर मार्गदर्शक सूचना द्यायच्या आहेत.

प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय?

प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संबंधित महाविद्यालयांना ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.

वसतिगृहे कधी उघडणार?

वसतिगृहे टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याबाबत उच्च शिक्षण संचालक आणि तंत्र शिक्षण संचालक यांनी आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अध्यादेशात केली आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात मिळणार का प्रवेश!

ज्या विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही, त्यांच्याकरिता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख, महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करून घेण्याची सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिली आहे. तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे, असेही सांगितले आहे.

loading image
go to top