UPSC Exam : वर्णनात्मक परीक्षा पद्धतीमुळे यूपीएससीत यश मिळवण्याचा महाराष्ट्राचा टक्का वाढेल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) नुकतेच राज्यसेवा परीक्षेत अमुलाग्र बदल करताना बहुपर्यायी स्वरूपाकडून वर्णनात्मक परीक्षा पद्धत अवलंबली आहे.
UPSC
UPSCSakal
Summary

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) नुकतेच राज्यसेवा परीक्षेत अमुलाग्र बदल करताना बहुपर्यायी स्वरूपाकडून वर्णनात्मक परीक्षा पद्धत अवलंबली आहे.

स्वारगेट - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) नुकतेच राज्यसेवा परीक्षेत अमुलाग्र बदल करताना बहुपर्यायी स्वरूपाकडून वर्णनात्मक परीक्षा पद्धत अवलंबली आहे. यावर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांमध्ये बरीच मत मतांतरे झाली मात्र केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मात्र या बदलाचे स्वागत केले आहे .या बदलाने यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा परीक्षा सोपी जाईल त्याचबरोबर यूपीएससी मध्ये यश मिळवण्याचा महाराष्ट्राचा टक्काही वाढेल असा आशावाद या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे .

यूपीएससीबरोबरच २६ राज्यांतील लोकसेवा आयोगाची परीक्षा पद्धत सारखीच आहे. महाराष्ट्रात मात्र अजूनही जुनीच पद्धत अवलंबली जात होती. यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीतील दरी मिटावी यासाठी नवे बदल सुचविण्यात आले होते. बहुपर्यायी पद्धतीमध्ये प्रत्यक्ष कामाच्यावेळी आवश्यक आकलन क्षमता, बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता, विश्लेषणक्षमता, विषयाची समज आणि कार्यवाही, विचारांची स्पष्टता, संभाषण कौशल्य, बुद्धिमत्तेची प्रगल्भता तपासता येणे शक्य नाही. त्यामुळे वर्णनात्मक परीक्षा पद्धती आवश्यक असून यामध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा कस लागतो असे तज्ञांचे मत आहे.

यूपीएससीचा अभ्यास करताना राज्यसेवेचाही अभ्यास या बदलेल्या अभ्यास क्रमानुसार करण्यास सोपे जाते कारण अनेक विषय हे सारखेच आहेत आणि आत्ता यूपीएससी प्रमाणेच दृष्टिकोनात बदल करून राज्यसेवा परीक्षा द्यावी लागणार असल्याने यूपीएससीच्या अभ्यासावर ही राज्यसेवा परीक्षेत यश मिळवता येते हे गेली दहा वर्षे आधीच्या अनेक उदाहरणावरून स्पष्ट होते. यूपीएससीचा अभ्यास करताना प्रचंड लेखनाचा सराव लागत असल्याने तो आत्ता राज्यसेवेच्या परीक्षेसाठी कामी येईल असा आशावाद यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे .

वर्णनात्मक परीक्षा पारदर्शक व्हावी

वर्णनात्मक परीक्षेतही पारदर्शकता असावी यासाठी कॉम्प्युटर स्क्रीन असेसमेंट नावाची पद्धत सुचविली आहे. म्हणजे परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिका स्कॅन करून दोन वेगवेगळ्या तपासणीसांकडे पाठवली जाईल. दोघांनी दिलेल्या गुणांची सरासरी ग्राह्य धरली जाईल. पर्यायाने अधिक न्याय आणि पारदर्शक पद्धतीने मूल्यमापन होईल असे नेमलेल्या अभ्यास गटाने आयोगाला सुचवले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाबरोबरच २६ राज्यांच्या लोकसेवा आयोगांचा अभ्यास आम्ही केला. सर्वांगीण चर्चेनंतरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धतीची शिफारस आम्ही केली आहे.

- चंद्रकांत दळवी (अध्यक्ष त्रिसदस्य समिती अभ्यास गट)

राज्यसेवा आत्ता खऱ्या अर्थाने आमच्यासाठी सोपी झाली आहे. यूपीसी मध्ये इतिहास या पर्यायी विषयाचा मी गेली सात वर्षे सखोल अभ्यास केला आहे. त्यामुळे आता त्याचा फायदा राज्यसेवा परीक्षेमध्ये हाच पर्यायी विषय घेऊन चांगले मार्क मिळवण्यासाठी फायदा होणार आहे .

- नदीम सौदागर (यूपीएससी परीक्षार्थी)

यूपीएससीचा वर्णनात्मक परीक्षा पद्धतीचा अभ्यास करत असताना राज्यसेवेची बहुपर्यायी परीक्षा पद्धत असल्याने या परीक्षेमध्ये यश मिळवणे आम्हाला कठीण जात होते. मात्र, आता एमपीएससीनेही यूपीएससी प्रमाणे वर्णनात्मक परीक्षा पद्धत केल्याने आम्हाला यश मिळवण्यासाठी एमपीएससीने वाट सोपी केली आहे.

- संदीप घोरपडे (यूपीएससी परीक्षार्थी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com