ऑनलाइन शिक्षणाचा ‘डिप्लोमा’ला फटका; निकाल ४० टक्क्यांनी घसरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

online education

राज्यातील अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्राच्या पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमांना ऑनलाइन शिक्षणाचा फटका बसल्याचे समोर आले आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा ‘डिप्लोमा’ला फटका; निकाल ४० टक्क्यांनी घसरला

पुणे - राज्यातील अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्राच्या पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमांना ऑनलाइन शिक्षणाचा फटका बसल्याचे समोर आले आहे. नुकतेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे (एमएसबीटीई) उन्हाळी सत्राचा निकाल घोषित केला असून, उत्तीर्णांचे प्रमाण ४० टक्क्यांनी घसरल्याचे प्राथमिक पाहणीतून पुढे आले आहे.

तंत्रशिक्षण मंडळाकडून प्रामुख्याने दोन वर्षांचे पदविका अभ्यासक्रम चालविले जातात. मागील दोन वर्षे शिकवणी ऑनलाइन झाली, मात्र परीक्षा नेहमीच्या ऑफलाइन पद्धतीने झाली, याचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रथमच एवढ्या प्रमाणावर निकाल घसरला असून, जवळपास निम्मे विद्यार्थी अनुत्तीर्ण होणे धक्कादायक असल्याचे मत संस्थाचालकांनी व्यक्त केले. राजेश जाधव (नाव बदललेले) म्हणतो, ‘आयटी डिप्लोमाला मी प्रवेश घेतला आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्ष आमची शिकवणी ऑनलाइनच झाली. या आधीच्या परीक्षाही आम्ही ऑनलाइन पद्धतीने दिल्या. नेमकी उन्हाळी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने झाली. त्यावेळी अभ्यासालाही कमी वेळ मिळाला, त्यात प्रश्नपत्रिका जरा कठीणच होती.’

पदविका परीक्षा अनुत्तीर्ण झाल्याने अनेक विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. ऑनलाइन शिकवणी, प्रात्यक्षिकांच्या सरावाचा अभाव आणि बाहेरील प्रश्न यामुळे आधीच ग्रासलेले विद्यार्थी अधिक चिंतेत पडले आहे, असे निरीक्षण संस्थाचालकांनी नोंदविले आहे. संबंधित परीक्षा ऑनलाइन पद्धतीने तातडीने घेण्याची मागणी काही प्राचार्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बाबी

1) बहुतेक महाविद्यालयांचे पदविकांचे निकाल ३० ते ४० टक्क्यांनी घसरले

2) एक-दोन विषयांची फोटोकॉपी मागवून गुणांची पडताळणी करण्यात येत आहे

3) शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी प्रत्येक गुण महत्त्वाचा, त्यांना सर्वाधिक फटका

4) निकाल कमी लागण्याचे नक्की कारण काय, या बद्दल सर्वच साशंक

दोन वर्षानंतर विद्यार्थ्यांची ऑफलाइन परीक्षा झाली. ऑनलाइन शिकवणी आणि ऑफलाइन परीक्षा, यामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच फटका बसला आहे. सुमारे ४० टक्के विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्षच वाया जाण्याची शक्यता आहे. तंत्रशिक्षण मंडळाने अशा विद्यार्थ्याचा विचार करून तातडीने पुनर्परीक्षा घ्यावी.

- संस्थाचालक

आमच्या संस्थेच्या इतिहासात प्रथमच एवढा कमी निकाल लागला आहे. विशेषकरून यांत्रिकी आणि स्थापत्य शाखेतील निकाल मोठ्या प्रमाणावर घसरले आहे. केवळ आमच्याकडेच नाही, तर बहुतेक पदविका महाविद्यालयांमध्ये ३० ते ४० टक्क्यांनी निकाल घसरले आहे. यामागची कारणे नक्की काय आहेत. या बद्दल आम्ही साशंक आहोत.

- विद्या बॅकोड, प्राचार्य, पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निक