कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रकार

डॉ. आशिष तेंडुलकर
Thursday, 30 January 2020

येत्या काही वर्षांमध्ये मशीन लर्निंग अर्थात साधन शिक्षण हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक प्रकार खूप वापरला जाईल. या प्रकारात आपण संगणकाला ठरावीक कामे अचूकपणे करण्याचे प्रशिक्षण देतो.

भविष्य नोकऱ्यांचे
मागील लेखामध्ये आपण संगणकाला कृत्रिम बुद्धिमत्तेची तालीम कशी देतात, ते पहिले. येत्या काही वर्षांमध्ये मशीन लर्निंग अर्थात साधन शिक्षण हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक प्रकार खूप वापरला जाईल. या प्रकारात आपण संगणकाला ठरावीक कामे अचूकपणे करण्याचे प्रशिक्षण देतो. यामध्ये तालीम संचाचा वापर केला जातो. मात्र, त्यासाठी प्रशिक्षण घेत असलेल्या कामाचा तालीम संच उपलब्ध हवा.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तालीम संचामध्ये प्रत्येक उदाहरणांची वैशिष्ट्ये आणि शिक्का (लेबल) यांचा समावेश असतो. अशा तालीम संचामधून आपण संगणकाला पर्यवेक्षी साधन शिक्षण (Supervised machine learning) देऊ शकतो. हा साधन शिक्षणाचा पहिला प्रकार होय आणि तो ओळखणे फारच सोपे आहे. तालीम संचामध्ये प्रत्येक उदाहरणाला ठरावीक शिक्का असल्यास, आपणास पर्यवेक्षी साधन शिक्षण पद्धतीने संगणकाला त्या कामाचे प्रशिक्षण देता येते. 

शिक्का दोन प्रकारचा असतो. एकतर हा वास्तविक संख्येच्या (रिअल नंबर) स्वरूपात असतो किंवा वर्गवारीच्या स्वरूपात असतो. यावरून पर्यवेक्षी साधन शिक्षणाचे दोन भाग पडतात.  प्रतिगमन (Regression) किंवा वर्गीकरण (Classification). प्रतिगमन प्रकारात शिक्का वास्तविक संख्येच्या स्वरूपात असतो, तर वर्गीकरणामध्ये तो वर्गवारीच्या स्वरूपात असतो.  

तालीम संचामधील उदाहरणांबरोबर त्यांचा शिक्का उपलब्ध नसल्यास आपणास अपर्यवेक्षी साधन शिक्षणाचा (Unsupervised machine learning) वापर करावा लागतो. काही प्रकारच्या कामांसाठी थोड्या प्रमाणात शिक्क्यासहित आणि अनेक शिक्क्यांविरहित उदाहरणे उपलब्ध असतात. अशावेळी आपण तिसऱ्या प्रकारच्या साधन शिक्षणाचा वापर करतो, त्याला अंशतः पर्यवेक्षी साधन शिक्षण असे म्हटले जाते. 

लहान मुले जसे अनुभवातून शिकतात, तसेच तालीम संचातून आपण संगणकाला शिकविण्याचा प्रयत्न करत असतो. लहान मुलांच्या शिकण्याच्या पद्धतीने प्रेरणा घेऊन अजून एक कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रकार विकसित झाला तो म्हणजे - सामर्थ्यवर्धक शिक्षण (रिइन्फोर्समेंट लर्निंग). या प्रकारात फारच थोड्या उदाहरणासहित संगणकाला प्रशिक्षित करण्यासंबधातील सूत्रे वापरली जातात. 

थोडक्यात, आपण साधन शिक्षण या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रचलित प्रकारची ओळख करून घेतली.

साधन शिक्षणाचे तीन प्रकार
  पर्यवेक्षी 
  अपर्यवेक्षी 
  अंशतः पर्यवेक्षी. 

पर्यवेक्षी शिक्षणाचे दोन प्रकार
  प्रतिगमन
  वर्गीकरण. 

साधन शिक्षणाबरोबरच सामर्थ्यवर्धक शिक्षण हा पर्याय संगणकाला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदान करण्यासाठी वापरला जातो. पुढील भागात आपण या प्रत्येक प्रकाराची व्यवहारातील उदाहरणे पाहूयात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr ashish tendulkar article Types of artificial intelligence