भविष्य नोकऱ्यांचे : कृत्रिम बुध्दिमत्ता आणि समूह आरेखन

डॉ. आशिष तेंडुलकर
Thursday, 2 July 2020

भ्रमणध्वनीवर अनेक प्रणाली मोफत उपलब्ध असतात आणि आपल्या माहितीचा व्यावसायिक वापर यावर त्यांचा व्यवसाय अवलंबून असतो. असे करताना अशा प्रणालीने काही नीतितत्त्वे आणि बंधने पाळणे आवश्यक आहे.

चीनच्या ५९ भ्रमणध्वनी प्रणालींवर देशाच्या सुक्षेच्या कारणांवरून बंदी घातल्याची बातमी नुकतीच आली. आजच्या लेखामध्ये अशा प्रकारच्या प्रणाली कोणत्या प्रकारची माहिती भ्रमणध्वनीवरून गोळा करतात आणि त्याचा वापर करून विविध अंदाज कसे वर्तवतात याचा ऊहापोह करूया. 

या लेखमालेमध्ये आपण एक गोष्ट सातत्याने मांडत असतो ती म्हणजे, ‘विना विदा नाही कृत्रिम प्रज्ञा!’ या प्रणालीसाठी विदा किंवा आपली माहिती सहज उपलब्ध होते आणि त्यासाठी आपण त्यांना पूर्ण सहकार्य करतो. कसे? तर अशा प्रणाली आपल्या भ्रमणध्वनीमध्ये टाकताना आपण त्यांना भरमसाठ परवानग्या देऊन ठेवतो. त्याआधारे या प्रणाली आपल्या भ्रमणध्वनीमधून विविध प्रकारची माहिती त्यांच्या केंद्रीय संगणकाकडे पाठवत असतात. यामध्ये आपले लघुसंदेश, चलचित्र, छायाचित्रे, आपला ठावठिकाणा आणि वाचलेली माहिती या बाबींचा समावेश असतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

या केंद्रीय संगणकाकडे आपल्या खासगी माहितीचा केवढा प्रचंड साठा असेल! अशा प्रकारच्या माहितीवर संगणक आज्ञावलीच्या साहाय्याने प्रक्रिया करून ती माहिती कुंभामध्ये साठवली जाते. 

कृत्रिम बुद्धिमत्तेतील पर्यवेक्षी शिक्षण, गटवारी आदी तंत्रांचा वापर करून व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनविली जाते. याचा वापर करून विविध उत्पादनांच्या जाहिराती, चलचित्रांच्या शिफारशी, नवीन दोस्तांच्या शिफारशी अशा सेवा पुरविल्या जातात. 

आपल्या खासगी माहितीचा वापर करून आपले किंवा आपल्यासारख्या व्यक्तींच्या समूहाचे एक रेखाचित्र बनविले जाते आणि त्याचा वापर व्यावसायिक सेवा पुरविण्यासाठी केला जातो. आपल्यासारख्या चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेल की, अशा माहितीचा वापर समूहांना आपल्याला हवे तसे वागण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी होऊ शकतो. आणि हा खरा धोका आहे. 

आपण विचार कराल की, माझ्या एकट्याच्या माहितीने काय होणार? मात्र, आपल्यासारख्या अनेक लोकांची माहिती एकत्र करून त्यामधून अनेक ठोकताळे मांडता येतात, अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून. आपण कोणाशी बोलता किंवा कोणाची चलचित्रे पाहता यावरून आपल्या एकंदर आवडीनिवडीचा अंदाज बांधणे सहज शक्य होते. त्याचा वापर करून अनेक व्यावसायिक आणि इतर उद्दिष्टे सध्या करता येतात. आता हे आरेखन नेमके कसे करतात याचा आपण पुढील लेखात ऊहापोह करूया.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भ्रमणध्वनीवर अनेक प्रणाली मोफत उपलब्ध असतात आणि आपल्या माहितीचा व्यावसायिक वापर यावर त्यांचा व्यवसाय अवलंबून असतो. असे करताना अशा प्रणालीने काही नीतितत्त्वे आणि बंधने पाळणे आवश्यक आहे. 

खासगी माहितीचा वापर व्यावसायिक माहितीसाठी न करणे, प्रणालीच्या वापरासाठी लागणारी सोडून इतर कोणत्याही प्रकारची खासगी माहिती गोळा न करणे, खासगी माहिती काळजीपूर्वक साठवणे आणि त्याचा कोणताही दुरुपयोग होणार नाही याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. अशा प्रकारची काळजी घेऊन भ्रमणध्वनी प्रणाली बनविणाऱ्या अनेक कंपन्या बाजारात आहेत आणि त्यांची माहिती घेऊन त्या भ्रमणध्वनीवर  समाविष्ट करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr ashish tendulkar writes article about Artificial intelligence

Tags
टॉपिकस
Topic Tags: