डिजिटल स्किल : डिजिटल सामाजिक उद्योजकता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Digital Skill

डिजिटल सोशल आंत्रप्रेन्युअरशिप हे असे एक करिअर क्षेत्र आहे, ज्याद्वारे व्यक्ती किंवा व्यक्ती समूह, स्टार्टअप्स आणि उद्योजक हे सामाजिक समस्यांना थेट संबोधित करणारे उपाय आणि उद्योग डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे विकसित करतात.

डिजिटल स्किल : डिजिटल सामाजिक उद्योजकता

डिजिटल सोशल आंत्रप्रेन्युअरशिप (डिजिटल सामाजिक उद्योजकता) हे असे एक करिअर क्षेत्र आहे, ज्याद्वारे व्यक्ती किंवा व्यक्ती समूह, स्टार्टअप्स आणि उद्योजक हे सामाजिक समस्यांना थेट संबोधित करणारे उपाय आणि उद्योग डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे विकसित करतात. सामाजिक उद्योजक ही अशी व्यक्ती आहे, जी व्यवसायाच्या संधी शोधते. ज्याचा समुदायावर, समाजावर किंवा जगात सकारात्मक प्रभाव विकासासाठी उपयोग होतो.

वापर डिजिटल टूल्सचा

विना-नफा संस्था, सहकारी संस्था, सामाजिक उपक्रम, समुदाय प्रकल्प, विशेष उद्देश व्यवसाय, विना-नफा कंपन्या आदींचा यामध्ये समावेश होतो. अशा प्रकारच्या संस्थांच्या कार्यपद्धतीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर सुरू झाला आहे. कोरोना पश्चात डिजिटल सामाजिक उद्योजकतेला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उद्योगाची उभारणी माहिती तंत्रज्ञानाद्वारे करण्यासाठी अनेक अद्ययावत डिजिटल कौशल्यांची नवतरूणांना आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या स्टार्टअप निर्मितीसाठी अन्य कौशल्यांसह ‘सोशल मीडिया आणि क्राउडफंडिंग’, डिजिटल मार्केटिंग, डिजिटल फायनान्स मॉडेलिंग, ई-व्हेंचर कॅपिटल स्रोत, क्लाऊड वेब प्रेझेन्स, ईआरपी सिस्टिम्स, ऑर्गनायझेशनल नेटवर्क प्लॅटफॉर्म, ई-कार्पोरेट सोशल रिस्पॉँसिबिलिटी आदी उपलब्ध डिजिटल टूल्सचा आणि विविध प्लॅटफॉर्मचा एकत्रित वापर अपरिहार्य झाला आहे त्यामुळेच या क्षेत्रातील नवकौशल्य धारकांची मागणी वाढत आहे.

ग्रामीण भागामध्ये अल्प उत्पन्न समुदायामध्ये बचत गटांद्वारे सहकारी तत्त्वावर डिजिटल सामाजिक उद्योजकतेचे प्रयोग अनेक ठिकाणी सुरू झाले असल्याने या क्षेत्रातील तरुण तंत्रज्ञान सक्षम व्यक्तींना अशा संस्थांमध्ये अनेक कार्य संधी उपलब्ध आहेत. गुगलने सामाजिक उद्योजकांसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर सोशल गुड्ससारखे ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहेत ज्यांचा वापर करण्यासाठी विशिष्ट प्रकारची कौशल्यांची गरज आहे. गुगल प्रायमर, गुगल फॉर स्मॉल बिझनेस, गुगल फॉर स्टार्ट अप आदी ऑनलाइन टूल्स सामाजिक उद्योजकतेसाठी उपलब्ध आहेत. असेच अन्य काही निवडक आंतरराष्ट्रीय संस्थांचीही ऑनलाइन टूल्स वापरात आहेत.

सामाजिक प्रश्‍न आणि भांडवल

आपल्या देशामध्ये तसेच जगभरात सामाजिक उद्योजकता प्रोत्साहनासाठी अनेक सोशल इनोव्हेशन हॅकेथॉन्समधून मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी ही सामाजिक प्रश्नाच्या सोडवण्यासाठी होते आहे. सामाजिक उद्योजक संकल्पना विकासासाठी क्युरेटर, आयडिया वॉच, माईंडमेनस्टर, आरस्टार्टअप, जर्मआयवो, लिन स्टार्टअप व्हॅलिडेशन, माईंडम्युप, आयडिया स्केल अशी काही निवडक ऑनलाइन टूल्सही मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतात.

सामाजिक, तसेच सेवा उद्योगांसाठी काही ऑनलाइन स्टोअर तसेच विक्री पोर्टल्सनी टूल किट्स विकसित केलेली आहेत. यांचाही वापर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. अशी टूल्स ऑनलाइन सामाजिक उद्योग विस्तारासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. विशिष्ट कार्यासाठी कोणत्या प्रकारचे ऑनलाइन टूल वापरायचे तसेच त्याद्वारे होणाऱ्या कौशल्य विकासाचा उपयोग कोणत्या प्लॅटफॉर्मद्वारे करायचा हेही आत्मसात करणे तितकेच गरजेचे झाले आहे. सामाजिक उद्योजकतेच्या विविध कार्यांसाठी संधी शोध, रोड मॅप डिझाईन, ई-मायक्रोफायनान्सिंग, ऑनलाइन रिसर्च, धोरणात्मक संरेखन आदींसाठी विशिष्ट कौशल्ये ऑनलाइन टूल्सद्वारे विकसित करणे ही सहज शक्य आहे. सामाजिक अर्थव्यवस्थेबरोबरच स्वास्थ, सहविकास आणि सामाजिक अभिसरणसाठी ‘डिजिटल सोशल आंत्रप्रेन्युअरशिप’ क्षेत्रातील कार्यरत आणि नवकौशल्यधारक युवकांची आज आवश्यकता आहे.