डिजिटल स्किल : डिजिटल कौशल्ये सज्जता निर्देशांक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Digital Skill

डिजिटल परिवर्तनासाठी या क्षेत्रामध्ये ‘डिजिटल कौशल्ये सज्जता निर्देशांक’ (डिजिटल स्किल्स रेडिनेस इंडेक्स) महत्त्वाचा आहे.

डिजिटल स्किल : डिजिटल कौशल्ये सज्जता निर्देशांक

डिजिटल परिवर्तनासाठी या क्षेत्रामध्ये ‘डिजिटल कौशल्ये सज्जता निर्देशांक’ (डिजिटल स्किल्स रेडिनेस इंडेक्स) महत्त्वाचा आहे. यामुळे आपण बदलत्या परिस्थितीमध्ये नक्की कोणत्या टप्प्यावर आहोत हे स्पष्ट होण्यासाठी मदत होते. चौथ्या औद्योगिक क्रांतीने कौशल्यांची परिभाषा आणि रोजगार क्षमता मोठ्या प्रमाणात बदलली आहे आणि म्हणूनच या क्षेत्रातील विविध डिजिटल कौशल्यांची माहिती आपण घेतली. विकासाच्या उंबरठ्यावरील पाचव्या औद्योगिक क्रांतीने यामध्ये अनेक नवी परिमाणे दिली आहेत. त्यामुळेच कौशल्य बदलांचे महत्त्व अधोरेखित होते. सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानाद्वारे सक्षम केलेल्या डिजिटल वर्कफ्लोमध्ये संक्रमण करण्यासाठी विविध आस्थापनांतील कर्मचाऱ्यांच्या तयारीच्या पातळीद्वारे डिजिटल तयारी ही अनेक वेळा परिभाषित केली जाते.

सेल्सफोर्सच्या एका अभ्यासानुसार कमी, मध्यम आणि उच्च डिजिटल कौशल्याची तयारी दर्शविण्यासाठी प्रत्येक देशाला १०० पैकी गुण नियुक्त केले. आपल्या देशाचा १०० पैकी सर्वाधिक ६३ डिजिटल रेडिनेस स्कोअर होता. सर्वेक्षणातील ७२ टक्के उत्तरदाते म्हणाले, की ते कामाच्या भविष्यासाठी स्वतःला तयार करण्यासाठी सक्रियपणे डिजिटल कौशल्ये शिकत आहेत. जागतिक डिजिटल कौशल्य निर्देशांकाची गणना करण्याचे उद्दिष्ट हे कामाच्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या डिजिटल कौशल्ये ओळखणे यावरच प्रामुख्याने आधारित होते. या सर्वेक्षणात डिजिटल मार्केटिंग, इन्क्रिप्शन अॅण्ड सायबर सिक्युरिटी, ई कॉमर्स, एआय आणि कोलॅबरेशन टेक्नॉलॉजी हा स्पष्ट झालेला प्राधान्यक्रम जागतिक क्रमवारीपेक्षा थोडा वेगळा असल्याने या क्षेत्रातील ट्रेन्डींग दाखवते जे ‘डिजिटल स्किल्स रोजगार’ उपलब्धतेशी निगडित आहे.

चौथी औद्योगिक क्रांती घडवणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि नॅनोटेक्नॉलॉजी, थ्रीडी प्रिंटिंग, रोबोटिक्स, ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि क्वांटम कॉम्पुटिंग या तसेच तत्सम अन्य डिजिटल कौशल्यांचं रोजगार क्षमतांची परिवर्तनीयता आपण विविध लेखांमध्ये यापूर्वी पाहिलेली आहेच.

चौथ्या औद्योगिक क्रांतीची थीम सायबर-फिजिकल सिस्टिमद्वारे कनेक्टिव्हिटी भोवती फिरत असतानाच येऊ घातलेल्या पाचव्या औद्योगिक क्रांतीमध्ये, ज्याला इंडस्ट्री ४.० द्वारे शक्य झालेल्या प्लॅटफॉर्मसह संरेखित करून त्यामध्ये ‘माणूस आणि यंत्र’ यांच्यातील संबंधांना संबोधित केले जाते आहे अन्यथा रोबोट किंवा कोबॉट्स म्हणून ओळखले जाण्याचीच शक्यता व मर्यादा अधिक होती. पाचव्या औद्योगिक क्रांतीमध्ये नवीन सामाजिक-आर्थिक युग सुरू करण्याची क्षमता आहे. ती ‘विकसित’ आणि ‘अविकसित’मधील अंतर कमी करते. याच पार्श्वभूमीवर, ग्लोबल डिजिटल स्किल्स इंडेक्स २०२२ हा सुमारे १९ देशांतील तेवीस हजार कामगारांवर डिजिटल कौशल्यांबद्दल केलेल्या सर्वेक्षणावर आधारित आहे. यामध्ये कामाच्या भविष्यावर होणारा परिणाम, नोकरीच्या तयारीबद्दलची चिंता आणि सतत शिकण्याचे महत्त्व यांचा समावेश आहे.

या जागतिक निर्देशांकात तीन प्रमुख कौशल्यांमधील अंतर ओळखण्यात आले त्यामध्ये दैनंदिन कौशल्यातील अंतर, पिढीतील कौशल्यांमधील अंतर आणि नेतृत्व आणि कर्मचारी कौशल्यांमधील अंतर या तीन महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे त्यामुळेच या निर्देशांकाचे महत्त्व पुढील विकासात व रोजगार क्षमतांच्या सबलीकरणासाठी महत्त्वपूर्ण आहे. सोशल मीडिया, वेब नेव्हिगेशन, प्रॉडक्टिव्हिटी प्रोग्रॅम, स्मार्ट टेक्नॉलॉजी, डिजिटल कम्युनिकेशन, डेटा अॅनालायटिक्स ही दैनंदिन डिजिटल कौशल्ये सातत्याने अद्ययावत करण्याच्या प्राधान्यक्रमाबरोबरच करिअरसाठी नवकौशल्ये प्राप्त करण्याची आवश्यकता ५४ टक्के प्रतिसाद धारकांनी व्यक्त केलेली असून ही नवबदलांची सुरुवात आहे. तंत्रज्ञानाधारित ते तंत्रज्ञानयुक्त डिजिटल सेवा असा प्रवास हा कौशल्य बदलांचे अनेक संकेत देत असल्यामुळेच सातत्यपूर्ण अद्ययावत राहून नवसर्जनशीलता वाढवणे हेच या पुढील काळातील मोठे आव्हान आणि संधी उपलब्ध करणारे क्षेत्र राहणार आहे. येत्या ‘समृद्ध डिजिटल कौशल्य दशकाच्या’ (पाथ टु डिजिटल स्किल्स डिकेड) आत्मविश्वासपूर्ण मार्गक्रमणासाठी शुभेच्छा!

(समाप्त)

टॅग्स :educationjobSkillsdigital