मानससूत्र : नवीन नोकरीत रुजू होताना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jobs

अभिनंदन! उत्तम आणि अपेक्षित जागी नोकरीसाठी निवड झाली ना? मग ती कॅम्पस सिलेक्शनमधून असेल किंना स्वतः शोधून मिळवली असेल!

मानससूत्र : नवीन नोकरीत रुजू होताना

- डाॅ. जयश्री फडणवीस

अभिनंदन! उत्तम आणि अपेक्षित जागी नोकरीसाठी निवड झाली ना? मग ती कॅम्पस सिलेक्शनमधून असेल किंना स्वतः शोधून मिळवली असेल! आता आपली पुढील जबाबदारी आहे ती मिळालेली जबाबदारी, नोकरी उत्तम प्रकारे करत राहण्याची, आपल्या क्षेत्रात उत्तमपणे रुजण्याची. चला तर मग, करूया सुरुवात. उद्या पहिला दिवस. काय काय तयारी कराल? या दिवसाची, येणाऱ्या संपूर्ण आठवडाभराची?

उत्तम नियोजन करा. आपले ऑफिस कोठे आहे तो पत्ता नीट समजून घ्या, शक्य झाल्यास आधी एक फेरी मारा. अनेकदा सतत चाललेल्या रस्त्यांच्या कामामुळे मार्गात बदल केलेले असतात. गुगल मॅपवरून तुम्हाला ज्या वेळी जायचे आहे, त्या वेळच्या ट्रॅफिकचा अंदाज घ्या. थोडे वेळेच्या आधीच नीघा, कारण लवकर पोहोचणे फायद्याचेच ठरेल. कोण व्यक्ती कधी येतात, या ऑफिसला कोणते वरिष्ठ बसतात याची माहिती घ्या. त्यांचे लिंक्डइन, इन्स्टाग्राम अकाउंट्स बघा, म्हणजे ते अचानक पुढे येतील अथवा भेटतील, तेव्हा त्यांच्याबद्दल चार उत्तम गोष्टी तुम्हाला माहिती असतील. त्यांच्याशी काय बोलावे हा प्रश्न पडणार नाही आणि योग्य तेवढेच बोलल्याने तुम्हीही त्यांच्या लक्षात राहाल.

सुरुवातीचे काही दिवस ऑफिसला जाताना काय घालावे हा प्रश्न पडेल. पूर्वी अतिशय फॉर्मल कपडे घातले जात. उदा. टाय, फुल शर्ट, पॅँट, पॉलिश केलेले लेदर शूज; पण आता अनेक ऑफिसेसमध्ये ‘कॅजुअल फॉर्मल’ चालते.

स्वतःबरोबर आठवणीने एखादे नोट पॅड व पेन ठेवा. कोणतेही चर्चा सुरू असताना, मुद्दे लिहून घेतल्यास त्याचा गृहपाठ करताना खूप फायदा होइल.

ऑफिसला जाण्यापूर्वी काही प्रश्न डोक्यात आल्यास आपल्या रिक्रूटमेंट ऑफिसरला नक्कीच फोन करा. आपण ऑफिसमध्ये नवीन आहोत, त्यामुळे स्वतःची ओळख कशी करून देणार याचीही तयारी नक्कीच करा. वेळेवर गोंधळायला होइल. उदा. Good morning! I am... just joined today on the post of... Your good name? Thank you! Pleasure meeting you.

आपल्या ऑफिसमधील बिझनेस एटिकेट्स नक्कीच समजून घ्या. आपण म्हणतो ना, first impression... आणि हो! हसायला विसरू नका. एक सतत मंद स्मित आपल्या सुरवातीच्या काही दिवसात येणाऱ्या anxietyला अलगद दूर करेल- कारण तुम्ही हसता तेव्हा मेंदूतून एंडॉर्फिन आणि डोपामाइन ही हार्मोन्स स्रवतात आणि ताण दूर होण्यास मदत होते. ऑफिसला पोचलात, की स्वतःहून सगळ्यांच्या ओळखी करून घ्या. इथे येऊन आपल्याला आनंद झालाय हे आपल्या देहबोलीतून कळायला हवे. त्यांनीही पदे नीट समजून घ्या. येणाऱ्या भविष्यकाळात कोणाला कशासाठी भेटायचे ते कळेल.

तुमच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी नवीन नोकरीचे स्वरूप सांगताना एखादी गोष्ट कळली नाही, तुमच्याकडून नक्की कोणत्या स्वरूपाचे काम अपेक्षित आहे हे कळले नाही, तर पुनःपुन्हा प्रश्न विचारायला लाजू नका. असे केल्याने तुमच्या वरिष्ठांना; तसेच इतरांनाही तुमची नवीन शिकण्याची इच्छा आणि कुतूहल लक्षात येईल. एकदा काम सुरू केल्यावर, आपल्या कामाचा मागोवा घ्या. वरिष्ठ विचारोत अथवा न विचारोत, तुम्ही काय करताय ते नियमितपणे त्यांच्यापर्यंत email द्वारे नक्की पोहोचवा. सर्वांत शेवटचे आणि महत्त्वाचे, आपला वैयक्तिक फोन जरा लांबच ठेवा. लगेच सेल्फी काढून इन्स्टाग्राम, फेसबुकवर अपलोड करू नका. चला तर मग, जय्यत तयारी करा, जोशात कामाला लागा.

टॅग्स :educationjob