भाषाकौशल्यांचे महत्त्व

माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्याने संपर्कासाठी, संवादासाठी, विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी तो भाषेचा उपयोग करतो.
Importance of language skills
Importance of language skillssakal

माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्याने संपर्कासाठी, संवादासाठी, विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी तो भाषेचा उपयोग करतो. निरक्षर व्यक्तीसुद्धा भाषेचा उपयोग करतात. प्राण्यांनाही भाषा असते. आपले विचार व्यक्त करण्यास, कृतीचा अर्थ सांगण्यास भाषेचा उपयोग होतो. प्रतीके व खाणाखुणांचा उपयोग करून; मात्र त्यापेक्षा अधिक व खोलवरचा अर्थ कळण्यासाठी शब्दरूपी भाषेचा उपयोग होतो. कधीकधी शब्दांशिवायही, उदा. चित्राद्वारे आशय व्यक्त होऊ शकतो. मात्र, शब्दांचा उपयोग सुलभ असतो.

निव्वळ पाठांतर नको

आपण फार मोठ्या प्रमाणावर वाचन करून अथवा संभाषणे-भाषणे ऐकून माहिती व ज्ञान मिळवत असतो. त्यासाठी शब्दबद्ध गोष्टींचा आशय चटकन कळणे आवश्यक असते. लेखनातील अथवा भाषणातील शब्दांचे अर्थ कळून मग पुढे विचार कळणे, विषयातील मांडणी कळणे, प्रश्न समजणे, घटना समजणे, तत्त्व अथवा सिद्धांत समजणे, चरित्र समजणे हे भाषिक आकलन चांगले असल्याचे लक्षण आहे. प्रश्नांचा अर्थ न कळताच पाठ केलेली उत्तरे जशीच्या तशी उतरवल्यामुळे प्रश्नाचा संदर्भच चुकून शून्य गुण मिळतात. म्हणूनच निव्वळ पाठांतरापेक्षा अर्थासह लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते.

शाब्दिक स्मरणाचे लक्षण

भाषण करत असताना अथवा लिहीत असताना योग्य शब्द सापडणे, एकासारखा दुसरा शब्द चटकन सापडणे इ. चांगल्या शाब्दिक स्मरणाचे लक्षण आहे. वाचत असताना दोन शब्द, दोन वाक्ये, दोन मुद्दे, दोन पाने यांतील आशय लक्षात ठेवून आपण पुढे-पुढे वाचत असतो. अर्थ न कळता व आधीचे लक्षात न घेता केलेले वाचन निरुपयोगी ठरते.

सर्वच विषयांत माहिती व माहितीचा क्रम त्यातील परस्परसंबंध लक्षात ठेवणे गरजेचे असते. भाषेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मनातील भावना, कल्पना अथवा विचार सांगावयाचे असतात. मनातील प्रश्न, सूचना, घटना किंवा प्रसंग, इतिहास अथवा भविष्य अशा अनेक गोष्टी प्रकट केल्या जातात. काही जणांचे शब्दप्रभुत्व लेखनाद्वारे प्रकट होते, तर काही जणांचे व्याख्यान, भाषणाद्वारे!

उत्तम लेखनाच्या अथवा भाषणाच्या कौशल्यासाठी शब्दांवरील प्रभुत्वाबरोबरच आशय, आशयाचा क्रम तर्कसुसंगत पद्धतीने मांडता यावा लागतो. जवळ असलेला शब्दसंग्रह खूप चांगला असूनही प्रत्यक्ष बोलत असताना समोर असलेल्या श्रोत्यांचा विचार करून चपखल शब्द वापरता यावा लागतो.

सर्वांत योग्य शब्द कोणता? यावर विचार करावा लागतो. शब्दकोडी सोडवत असतानादेखील अपेक्षित आशयाचा शब्द सापडावा लागतो. काहींना एखाद्या कल्पनेचा विस्तार करणे, एखाद्या विषयावर वेगवेगळ्या कथा निर्माण करणे किंवा कथेला एकदम कलाटणी देणे गोष्टी सहज जमतात, तर काहींना उत्तम नवीन गोष्टी सुचतात.

लेखक, कवी होताना...

लेखक किंवा कवी बनणे ही काही सोपी गोष्ट नव्हे. ‘आम्ही कोण म्हणुनि काय पुससी? आम्ही असू लाडके देवाचे!’ म्हणजेच आम्ही लेखक अथवा कवी हे देवाचे लाडके आहोत, असे केशवसूत त्यांच्या ‘आम्ही कोण?’ या कवितेत म्हणतात. लोकव्यवहारातील प्रसंग अथवा नैसर्गिक घटनांमधील मर्म ओळखून त्यांना शब्दबद्ध करता येणं किंवा मनात आलेल्या कल्पनांना, विचारांना, भावनांना शब्दबद्ध करता येणं या दोन्ही गोष्टी तितक्याच अवघड! शब्दप्रभुत्व, रचनाप्रभुत्व, आशयसंपन्नता, अभिनवता या चार गोष्टी लेखक/कवी बनण्याकरिता आवश्यक असतात.

वरीलपैकी कोणकोणत्या बाबतीत तुम्ही तरबेज आहात? कोणत्या गोष्टी तेवढ्या नीट जमत नाहीत? याचा विचार करा. एखादी कविता करून बघा किंवा गोष्ट अथवा लेख लिहून बघा. हस्तलिखिते, नियतकालिके, निबंध स्पर्धा, स्नेहसंमेलनात बसवायचे कार्यक्रम या सर्वांमध्ये, जिथे संधी घेता येईल तिथे अवश्य घ्या. स्वत-बद्दलची निरीक्षणे नोंदवा. काही गोष्टी सरावाने जमवता येतात. मात्र, काही गोष्टी प्रयत्न करूनसुद्धा फारशा सुधारत नाहीत. बौद्धिक क्षमतेच्या या पैलूबद्दल आत्मपरीक्षण करा! स्वत-चे असे निरीक्षण करणे जीवनकार्य निवडण्यासाठी महत्त्वाचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com