प्रतीकांची भाषा

अक्षरे, अंक, संगीतातील लिपी, शब्द ही सर्व प्रतीके आहेत. त्यांना स्वतःचा असा अर्थ नसतो. ती कशाची तरी प्रतीके असतात, प्रतीकांमधून विशिष्ट अर्थ निर्देशित होतो.
language of symbols
language of symbolssakal

मागील भागात आपण डोळ्यांनी दिसणाऱ्या म्हणजेच दृश्य क्षमतेबद्दल जाणून घेतले. बऱ्याच वेळा डोळ्यांनी बघितलेले अथवा अन्य इंद्रियांद्वारे घेतलेले ज्ञान जसेच्या तसे (फोटोग्राफिक) स्मरणात ठेवण्याऐवजी काही चिन्हे अथवा खुणांमध्ये रूपांतर करून आपण लक्षात ठेवतो. एवढेच नाही, तर त्यांचा उपयोग करून विचार करतो.

अक्षरे, अंक, संगीतातील लिपी, शब्द ही सर्व प्रतीके आहेत. त्यांना स्वतःचा असा अर्थ नसतो. ती कशाची तरी प्रतीके असतात, प्रतीकांमधून विशिष्ट अर्थ निर्देशित होतो. रस्त्यावरील खुणा, बेरीज, वजाबाकी भागाकार, गुणाकार, रसायनांच्या खुणा, बोटीचे कप्तान वा वैमानिक यांना मिळणारे संकेत ही सर्व प्रतीके आहेत. वैज्ञानिक, विमान बोटीचे कप्तान, हिशोब ठेवणारे अकाउंटंटस् या सर्वांना प्रतीकांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करावा लागतो.

प्रतीके ही कोणते तरी अनुभव, प्रक्रिया, कृती यासाठी दिलेले सांकेतिक चिन्ह असते. प्रतीकांवरच मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेला गणितासारखा विषय डोक्यावरून जातो कारण वापरलेल्या प्रतीकांचा अर्थ पटकन लावता येत नाही. सांकेतिक लिपी कळायला, त्यावर प्रक्रिया करायला, रचना करायला वेळ लागतो. एखाद्या विशिष्ट अंकांनी काय समजते? एका प्रकारचे आकडे कोणते? दुसऱ्या प्रकारचे आकडे कोणते? दोन आकड्यात काय संबंध आहे?

पाढ्यांची रचना किती गमतीशीर असते! एखाद्या संख्येच्या आकड्यांची अदला-बदल केली, तर किमतीत कशी तफावत होते, असे सहज नजरेस आणून दिले, तर त्यास अनुभवात स्थान मिळते आणि अंक हे शब्दांसारखे सोपे होतात. गणित, रसायनशास्त्र, संगणक या क्षेत्रात प्रतीके मोठ्या प्रमाणावर वापरतात व त्यावर अनेक प्रक्रिया असतात.

प्रतीकांचा वापर

दृश्य अथवा श्राव्य अथवा अन्य प्रकारच्या अनुभव प्रतिमा जशाच्या तशा लक्षात ठेवणे खूप अवघड असते. त्यामुळे त्यांचे प्रतीकांमध्ये रूपांतर करणे व लक्षात ठेवणे सुलभ जाते. अशी प्रतीकरूपात साठवलेली माहिती लक्षात ठेवणे व ती चटकन आठवणे ही एक वेगळ्या प्रकारची बु‌द्धिमत्ता आहे.

मूलद्रव्यांच्या संयुगांच्या संज्ञा लक्षात ठेवणे, रासायनिक क्रिया लक्षात ठेवण्यासाठी तिचे समीकरण लक्षात ठेवणे, पाढे पाठ करणे, विद्युतशास्त्रातील खुणा लक्षात ठेवणे इत्यादी प्रतीकात्मक स्मरणाची उदाहरणे आहेत. सर्वांचीच या प्रकारची स्मरणशक्ती चांगली असते असे नाही. तुमच्या बाबतीत तुमच्या स्वतःचा काय अनुभव आहे?

तुम्हाला पाढे लक्षात राहतात का? गणित हा विषय आवडतो का? गणितातील समीकरणे सोडवता येतात का? रसायनशास्त्रातील संजा व रासायनिक समीकरणे लक्षात राहतात का? एवढेच नाही, तर आकड्यांशी खेळ करून नवीन समीकरणे मांडता येतात का? सुडोकू अथवा शब्दकोडी सोडवता येतात का?

स्पेलिंग तपासणे, आपल्या गरजेनुसार एखादा आकडा आहे का हे पाहता येण संगणकाला माहिती देताना सांकेतिकीकरणात कोणती अक्षरे वापरावीत हे ठरवता येणं, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला समजणे, करता येणे, त्याची योग्य अयोग्यता ठरवता येणे हे सर्व लक्षणे आपली प्रतीकांचा वापर करण्याची बुद्धी चांगली आहे हे सिद्ध करते.

स्वतःला ओळखा

अलीकडच्या काळात कृत्रिम बु‌द्धिमतेच्या वापरासाठीसुद्धा संकेतांचा मोठा उपयोग होतो. संकेतरूपी हावभाव वापरून अनेक सूचना संगणकाला दिल्या जातात. नवनवे हावभाव-संकेत तयार करणे व त्या द्वारे संगणकाला सूचना देणे यावर मोठे काम सुरू आहे. वरीलपैकी कोणकोणत्या बाबतीत तुम्ही स्वतः तरबेज आहात? कोणत्या गोष्टी तशा नीट जमत नाहीत ? कधी असे स्वतःकडे वळून बघितले नसेल, तर आवर्जून बघा. निरीक्षणे नोंदवा. काही गोष्टी सरावाने जमवता येतात. मात्र, काही गोष्टी प्रयत्न करूनसु‌द्धा फारशा सुधारत नाहीत. स्वतःचे असे निरीक्षण करणे जीवनकार्य निवडण्यासाठी महत्त्वाचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com