दृश्‍य आकलनक्षमता

सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण डोळ्यांचा उपयोग करत असतो. बाहेरच्या प्रकाशावरून किती वाजले असावेत? याचा अंदाज घेतो. घड्याळात बघून तो अंदाज बरोबर आहे की नाही ते ठरवतो.
Visual perception
Visual perceptionsakal

सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण डोळ्यांचा उपयोग करत असतो. बाहेरच्या प्रकाशावरून किती वाजले असावेत? याचा अंदाज घेतो. घड्याळात बघून तो अंदाज बरोबर आहे की नाही ते ठरवतो. चहाच्या रंगावरून तो किती कडक आहे? याचा अंदाज घेतो. कप-बशीच्या रंगावरून ती नीट स्वच्छ धुतली गेली आहे ना ते तपासतो.

कपडे नीट इस्त्री झाले आहेत ना, ते पाहतो. कपड्यांची रंगसंगती ठरवतो. चालताना पायऱ्या नीट बघून उतरतो. वाहन चालवताना समोरून येणारी इतर वाहने चुकवतो. ज्या व जितक्या प्रकारे आपण डोळ्यांचा उपयोग करतो, त्यावरून आपण आंधळे असतो तर काय परिस्थिती झाली असती, याची कल्पना येते.

आपल्या शिकण्याची सुरुवात साधारणपणे वाचनाने होते. अक्षर किंवा शब्द वाचायला आपण शिकतो. ही वाचनक्षमता मुख्यतः दृश्य आकलनक्षमतेवर अवलंबून असते. दोन शब्द/अक्षरांमधील भेद ओळखता यावा लागतो. गणितात समांतर रेषा ओळखणे, त्रिकोणांचे प्रकार ओळखणे, तर भूगोलात नकाशा कळणे, खडकांचे प्रकार ओळखता येणे, विज्ञानात प्रयोगांच्या उपकरणांची मांडणी लक्षात येणे, जीवशास्त्रात आकृत्या काढताना अंतराचा अंदाज येणे आदी गोष्टींमधे आपले दृश्य गोष्टींचे आकलन चांगले असावे लागते. हे करतानाच आपल्याला काय जमते? व काय जमत नाही? हे लक्षात येते.

काही जणांकडे दृश्य प्रतिमा राखून ठेवण्याची जबरदस्त स्मरणशक्ती असते. गाड्यांचे क्रमांक, दूरभाष क्रमांक, चेहरे, कुठे काय ठेवले आहे हे आठवणे, श्लोक उलटसुलट म्हणता येणं, चित्रे काढताना दृश्य आठवणं हे सर्व चांगल्या दृश्य स्मरणशक्तीची लक्षणे आहेत. दुकानदाराला अक्षरशः हजारो वस्तू कुठे ठेवल्या आहेत हे लक्षात ठेवावं लागतं.

टॅक्सी ड्रायव्हरला अनेक रस्ते खाणाखुणा व खाचखळग्यांसह लक्षात ठेवाव्या लागतात. गड-किल्ल्यांच्या सहलीला गेलेल्यांनाही परतीच्या प्रवासासाठी संपूर्ण मार्ग नीट लक्षात ठेवावा लागतो. सर्व कुशल कामगार, इंजिनिअर्स, आर्किटेक्टस, वैद्य किंवा प्रयोगशाळेतील संशोधक यांना अनेक प्रकारची दृश्य माहिती लक्षात ठेवावी लागते.

काही जणांकडे एकाच वस्तूचे अनेक उपयोग करण्याचे कौशल्य असते. लहान मुले तर अनेक वस्तूंचा अनेक प्रकारे उपयोग करतात. कोणाकडे एकाच चौकोनी कागदाच्या वेगवेगळ्या प्रकारे घड्या करून निरनिराळ्या वस्तू करण्याचे - ओरिगामीचे कौशल्य असते. कल्पक व्यक्तींना एखादा आकार वेगवेगळ्या गोष्टींत दिसतो किंवा एका आकारांपासून अनेक गोष्टी बनवता येतात.

व्यंग्यचित्रकार सर्वांना माहिती असलेल्या प्रसंगातून व्यंग्य शोधून काढतो व चित्ररूपाने मांडतो. चित्रकार, शिल्पकार व वास्तूरचनाकार सगळ्यांना दृश्यकलेतील कल्पकता लागते. काही जण गणपतीची आरास, घराची सजावट खूप छान करतात. काही जणांना किल्ल्याची रचना, व्यासपीठाची रचना, नगराची रचना करण्याची चांगली कला असते. काही जण बॅग पॅक करण्यात हुशार असतात.

काढलेले चित्र, मिसळलेले रंग, जुळवलेले भाग बरोबर जमले आहे की नाही? हे तपासून पाहावे लागते. दूरदर्शनवरील दृश्यांची गुणवत्ता सुधारण्याकरिता पुष्कळच बारकाईने निरीक्षण व मूल्यमापन करावे लागते. सोन्या-मोत्यांची, कपड्यांची किंवा फर्निचरसाठी लागणाऱ्या लाकडाची पारख करणारे, उत्तमातील उत्तम शोधणारे असे कितीतरी रत्नपारखी असतात हे निव्वळ सवयीने होत नाही.

भूमिती, जीवशास्त्र, वनस्पतिशास्त्र, यंत्रविद्युतशास्त्र, स्थापत्यशास्त्र, वास्तुशिल्पशास्त्र, वैद्यकीयशास्त्र, टेक्सटाइल डिझाइनिंग, फॅशन डिझाइनिंग, नाट्य/चित्रपट दिग्दर्शक इत्यादी अनेक विषयात दृश्य माहितीचा वापर आवश्यक असतो. वरीलपैकी कोणकोणत्या बाबतीत तुम्ही स्वतः तरबेज आहात? कोणत्या गोष्टी तशा नीट जमत नाहीत? कधी असे स्वतःकडे वळून बघितले आहे का? नसेल तर आवर्जून बघा. स्वतःचे असे निरीक्षण करणे जीवनकार्य निवडण्यासाठी महत्त्वाचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com